'कुत्रा पाळणाऱ्यांना मृत्यूचा आणि हृदयरोगाचा धोका कमी'

कुत्रं

फोटो स्रोत, Getty Images

कुत्रा पाळणाऱ्या लोकांना हृदयरोग आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी असतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. स्वीडनमध्ये 34 लाख लोकांच्या निरीक्षणातून हा निष्कर्ष पुढे आल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

40 ते 80 वयोगटादरम्यानच्या लोकांची आकडेवारी संशोधकांनी सरकारी कार्यालयातून मिळवली आणि त्या आधारावर हा अभ्यास केला. ज्या लोकांनी कुत्रा पाळलं आहे, त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो असं त्यांना आढळलं. विशेषतः शिकारी कुत्रे पाळणाऱ्यांना अत्यंत कमी धोका असतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.

कुत्रे पाळणारे लोक हे न पाळणाऱ्यांच्या तुलनेत अधिक 'अॅक्टिव्ह' असतात. कुत्रे पाळल्यावर लोक अधिक सक्रिय राहतात. किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोकांनाच कुत्रा पाळण्याची इच्छा होऊ शकते, अशी देखील शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

कुत्रे पाळणारे लोक अधिक आनंदी असतात आणि त्यांचा सामाजिक संपर्कही तुलनेनं अधिक असतो. कुत्र्यामुळे मालकाच्या मायक्रोबायोममध्ये बदल घडतात. त्यामुळं हृदयरोगाचा धोका कमी होतो. पोटात असणाऱ्या सुक्ष्मजीवांच्या समूहाला मायक्रोबायोम म्हणतात.

कुत्रे पाळणारे लोक वेगळ्या प्रकारच्या जीवाणूंच्या संपर्कात येतात. कुत्र्यामुळं घरात घाण निर्माण होते आणि त्यातून मायक्रोबायोमवर परिणाम होतो.

"जर तुम्ही एकटे राहत असाल आणि तुम्ही कुत्रा पाळला असेल तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो," असं उपासला विद्यापीठाच्या म्वेनिया मूबांगा यांचं असं म्हणणं आहे. कुत्रा न पाळणाऱ्यांच्या तुलनेत कुत्रा पाळणाऱ्यांना मृत्यूचा धोका 33 टक्क्यांनी कमी असतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण 11 टक्क्यांनी कमी होतं.

फोटो स्रोत, Getty Images

"एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं कुत्रा पाळल्यास हा धोका टळू शकतो," असं संशोधक म्हणतात. "जे लोक एकटे राहतात त्यांच्यासाठी कुत्रा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असतो. त्यामुळे तणाव कमी होतो," असं मूबांगा म्हणतात.

कुत्रा पाळायचा असल्यास स्वीडनमध्ये नोंदणी करणं आवश्यक असतं. 2001 पासून ही पद्धत अवलंबण्यात आली आहे. तसेच, रुग्णालयांना भेट दिल्यास त्यांची नोंद सरकारकडून ठेवली जाते.

फोटो स्रोत, Getty Images

संशोधकांनी 2001 ते 2012 या कालखंडातला डेटा अभ्यासला. त्यातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. टेरियर, रिट्रीव्हर, सेंट हाउंड्स अशा शिकारी जातींचे कुत्रे पाळले तर हृदयरोगाचा धोका कमी होतो, असं निरीक्षण 'नेचर' या प्रतिष्ठित जर्नलमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

"यापूर्वी देखील अशा प्रकारचं संशोधन झालं होतं, पण यावेळी झालेल्या संशोधनांमुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे कारण या संशोधनात वापरण्यात आलेली आकडेवारी खूप मोठी आहे," असं ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर माइक नॅपटन यांचं म्हणणं आहे.

त्यांचं म्हणणं आहे, "कुत्रे पाळण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याबरोबरचं हृदयरोगाचा धोका टळणं हे महत्त्वपूर्ण कारणदेखील त्यात सामील झालं आहे."

फोटो स्रोत, Getty Images

"पण खरं कारण हेच आहे की तुमच्याकडे कुत्रा असेल तर त्याच्यासोबत तुमचा वेळ मजेत जातो. तुमच्याकडे कुत्रा असो अथवा नसो, पण शारीरिदृष्ट्या सक्रिय राहणं हे फायदेशीर ठरतं," असं नॅपटन म्हणतात.

"रोगासंदर्भात असलेल्या अशा संशोधनांना काही मर्यादा आहेत. या संशोधनातून हे तर समजलं की कुत्रा पाळणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो, पण त्यांना हा धोका नेमका का कमी असतो त्याचं नेमकं कारण या अभ्यासातून समोर आलं नाही," अशी खंत वरिष्ठ संशोधक टोव्ह फॉल यांनी व्यक्त केली.

"कुत्रा सांभाळण्याचा निर्णय घेण्याआधी कुत्रा पाळणाऱ्या आणि न पाळणाऱ्या लोकांच्या शारीरिक स्थितीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कदाचित, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणारे आणि फिरायला जाणाऱ्या लोकानांच कुत्रा सांभळण्याची इच्छा होत असेल असं मला वाटतं," नॅप्टन म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)