इतना सन्नाटा क्यों है, भाई? या राजधानीत माणसंच नाहीत!

म्यानमारची नवी राजधानी नेपिडो
प्रतिमा मथळा म्यानमारची नवी राजधानी नेपिडो

इथल्या 20 पदरी मार्गांवर दोन विमानं एकाच वेळी शेजारीशेजारी उतरू शकतात. या शहरात 100पेक्षा जास्त आलिशान हॉटेल आहेत.

मखमली हिरवळ अंथरलेले डझनभर गोल्फ कोर्स तुमचं मन जिंकतात आणि काही किलोमीटर पसरलेल्या इथल्या प्राणिसंग्रहालयात पेंग्विन्स सुद्धा आहेत.

हे अगळंवेगळं शहर चार हजार चौरस किलोमीटर परिसरावर पसरलं आहे.

फक्त कमतरता एकच आहे, इथं शोधूनसुद्धा एक माणूसही सापडत नाही!

ही आहे म्यानमारची नवी राजधानी नेपिडो. हे शहर म्यानमारच्या सत्तेचा गड मानला जातो.

म्यानमारच्या या लखलखत्या राजधानीला उभं करण्यासाठी 26 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.

इथं कधी वाहतूक कोंडी होत नाही, ना गडबड गोंधळ!

शतकांपासून म्यानमारची मंडाले ही राजधानी होती. 1948या म्यानमारची राजधानी यांगूनला हलवण्यात आली.

पण 2000 मध्ये म्यानमारपासून फार दूरवर झालेल्या एका युद्धात म्यानमारच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना राजधानी बदलण्याचा आग्रह धरला.

...आणि राजधानी बदलली!

वरिष्ठ पत्रकार आणि अग्नेय आशियाचे जाणकार सुबीर भौमिक सध्या यांगूनमध्ये आहेत.

ते म्हणाले, "दुसरं इराक युद्ध सुरू होण्यापूर्वी वेगळं वातावरण होतं. बऱ्याच राष्ट्रांवर निर्बंध लागले होते. तेव्हा म्यानमारच्या लष्कराला वाटलं की जर म्यानमारवर हल्ला झाला, तर यांगून सहज कबीज करता येईल. शहर समुद्र किनाऱ्यावर असल्याने नौदलाला या शहरावर ताबा मिळवणं सहज शक्य आहे. त्यामुळे राजधानी बदलली पाहिजे, असा विचार पुढं आला.

प्रतिमा मथळा नेपिडो

इथलं लष्कर आणि सर्वसामान्य जनतेचा ज्योतिषावर मोठा विश्वास आहे. ज्योतिषांचं मत होतं की ही जागा चांगली आहे.

गेल्या दशकात राजधानी बदलणाऱ्या काही कमी देशांत म्यानमारचा समावेश आहे.

2006 नंतर नेपिडो राजधानी आहे. इथं सर्व मंत्रालयं, सुप्रीम कोर्ट, लष्कर प्रमुखांचं कार्यालय असं सारं काही बांधण्यात आलं. सत्ताधारी पक्षातल्या नेत्या आंग सान सू ची इथं स्थायिक झाल्या.

जेव्हा या नव्या शहराची स्थापना झाली, त्यावेळी अनेकांनी नेपिडोचा उल्लेख 'घोस्ट कॅपिटल' (म्हणजे भुताटकीची राजधानी) असा केला होता. कारण इथे सर्वसामान्य लोक राहायला आलेच नाहीत!

अनेक विश्लेषकांनी त्या वेळच्या लष्करी सत्ताधाऱ्यावर टीकाही केली होती. गरिबीशी लढणाऱ्या या देशाला हजारो कोटी रुपये एक नवं शहर बांधण्यावर खर्च करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न विचारला गेला.

तेव्हापासून म्यानमार सरकार या शहराबद्दल अधिकच सतर्क असतं.

कडक नियम

संसदेबाहेर चित्रीकरण करण्यासाठी आम्ही कॅमेरा कढलाच होता, तोपर्यंत पोलिसांनी आम्हाला शेजारच्या चौकीत येण्याचे आदेश दिले.

20 मिनिटांच्या चौकशीनंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की जरी आम्ही पत्रकारांच्या व्हिसावर असलो तरी आम्हाला इथं चित्रीकरण करता येणार नाही.

सरकारी कर्मचारी असो किंवा टॅक्सीवाले, सगेळच या शहरात आनंदी असल्याचं सांगतात.

म्यानमारमध्ये दशकानुदशकांच्या लष्करी सत्तेमुळे इथं माध्यमांचं अस्तित्व नसल्यासारखंच आहे.

2011नंतर या देशात राजकीय सुधारणांना सुरुवात झाली, त्यानंतर लोकांत माध्यमांप्रती जागृतीला सुरुवात झाली.

पण अजूनही लोक इथं मोकळेपणानं न बोलता प्रत्येक बाबीची स्तुती करताना दिसतात.

प्रतिमा मथळा म्यानमारची संसंद

इथल्या एका मोठ्या सरकारी कॉलनीबाहेर आम्हाला एक व्यक्ती भेटली.

तुन औंग आणि त्यांची पत्नी इथं एक हॉटेल चालवतात.

ते म्हणाले,"आम्ही म्यानमारच्या शान राज्यातील आहोत. चार वर्षांपूर्वी इथं कामाच्या शोधात आलो. आता व्यवसाय जमू लागला आहे. पण इथं चांगलं कॉलेज नाही. त्यामुळे आम्हाला मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात नातेवाईकांकडे पाठवावं लागलं आहे.

म्यानमारमधील विदेशी दूतावास आजही यांगून शहरात आहेत. परदेशी पाहुण्यांना ओसाड नेपिडोमध्ये जाण्याची इच्छा नाही. यांगून सर्वांत मोठं शहर तर आहेच, शिवाय देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे.

मिलिट्री म्युझियम

इथं नेपिडोमध्ये मात्र राजधानी बदलण्याचा निर्णय कुणाचा होता, हेच शोधण कठीण आहे.

शहरावर लष्कराचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. इथं एक मिलिट्री म्युझियम आहे. हे म्युझियम हजारो एकर जागेवर पसरलं आहे.

शस्त्रास्त्रांवर खर्च झाला आहेच, शिवाय कोट्यवधी रुपये खर्च करून म्यानमार आणि जगभरातील लष्करी विमानं इथे आणून ठेवण्यात आली आहेत. त्यात दुसऱ्या महायुद्धातील स्पिटफायर आणि व्हिएतनाम युद्धातील जंबो हेलिकॉप्टर यांचाही समावेश आहे.

पण वस्तुस्थिती अशी आहे की हे पाहण्यासाठी इथं फार कमी लोक येतात.

अर्थात नेपिडोमध्ये आमची भेट देशाची केंद्रीय मंत्री विन म्यात यांच्याशी झाली. नेपिडो हे शहर घोस्ट कॅपिटल नाही, असा दावा त्यांनी केला.

"2007मध्ये जर तुम्ही मला हा प्रश्न विचारला असता, तर मी हे मान्य केलं असतं. पण आता जे इथे येतात, ते इथलेच होऊन जातात. इथं प्रदूषण नाही, वाहतूक कोंडी नाही आणि घरांची समस्याही नाही."

पण शहरातील सर्वांत मोठा शॉपिंग मॉलसुद्धा अनेकदा रिकामाच दिसतो. इथं आत जाऊन फोटो घेण्यावर बंदी आहे, पण जगभरातील टॉप ब्रॅंड इथं हमखास मिळतात. सध्या तरी राजधानीसोबत पाठवलेले सरकारी नोकरचं इथले ग्राहक आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)