सावधान! जगभरात जमीन खचत आहे!

INDONASIA Image copyright Alamy
प्रतिमा मथळा जाकार्तामध्ये जलस्तर वाढतो आहे.

भारतातला पाण्याचा सगळ्यात मोठा स्रोत कोणता, तुम्हाला माहिती आहे? थांबा! कोणत्याही नदीचं किंवा तलावाचं नाव घेऊ नका.

कारण या प्रश्नाचं खरं उत्तर आहे भूजल. म्हणजे, जमिनीखालून काढलं जाणारं पाणी.

भारतात दररोज वापरलं जाणारं 85 टक्के पाणी हे भूगर्भातून काढलं जातं. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

आपण अतिशय वेगानं भूजलाचा उपसा करत आहोत. हे असंच सुरू राहिलं तर त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असं अभ्यासातून स्पष्ट होत आहे.

हा उपसा वाढल्यानं पाण्याचा स्तर तर खालावतोच, शिवाय आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी उपसल्यानं आणखीही नुकसान होतं.

त्याचा एक फटका म्हणजे जगभरातली जमीन खचू लागली आहे, म्हणजेच भूस्तर खाली चालला आहे.

अमेरिकेतल्या मायामीपासून इंडोनेशियाच्या जाकार्तापर्यंत सर्वत्र जमीन खचते आहे. त्यामुळे समुद्राचं पाणी किनाऱ्यावरील शहरात घुसू लागलं आहे.

इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ताचं उदाहरण घेऊया. हे शहर समुद्रालगत आहे. इथं भूभाग खचू लागल्यानं बरेचदा समुद्राचं पाणी शहरात घुसतं.

समुद्रात भरती आली की, शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरतं. याचा सामना करण्यासाठी इंडोनेशियानं समुद्रकिनारी भिंती बांधल्या आहेत. पण हा काही या समस्येवरील कायमचा उपाय नाही.

दरवर्षी जाकार्ता 17 सेंटीमीटर एवढ्या प्रमाणात खचत चाललं आहे. बरेचदा या समस्येचा संदर्भ ग्लोबल वॉर्मिंगशी जोडला जातो. पण अमेरिकेतल्या जियॉलॉजिकल सर्व्हेचे तज्ज्ञ मिशेल स्नीड यांनी मात्र ते चूक असल्याचं म्हटलं आहे.

समुद्राच्या पाण्याची पातळी तर वाढत आहेच, शिवाय जगात ठिकठिकाणी जमीन खचते आहे, हेही सत्यच आहे.

मात्र या दोन वेगवेगळ्या समस्या आहेत. जिथं या दोन्ही समस्या आहेत, त्या भागातील लोकांना दुहेरी समस्यांचा सामना करावा लागतो. जाकार्ता हे असंच या दुहेरी समस्यांचा सामना करणारं एक शहर आहे.

जाकार्ताप्रमाणेच मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी आणि अमेरिकेतील सॅन जोआचिन येथील भूभागही वेगानं खचतो आहे.

भू गर्भातील पाण्याचा उपसा

नेदरलॅंडच्या उट्रेख्त विद्यापीठाचे जिऑलॉजिस्ट गाइल्स अॅर्केन्स यांच्या मते, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची समस्या जगभरात भेडसावते आहे. पण भूस्खलनाचे प्रकार ही स्थानिक समस्या असून प्रत्येक देशानं त्यावर आपापल्या परीने उपाय शोधले आहेत.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा भूस्खलन ही स्थानिक समस्या आहे.

शांघाय आणि टोकियो या शहरांनी या समस्येवर नियंत्रण मिळवलं आहे. त्यासाठी त्यांनी भूगर्भातून पाणी उपसा करण्यावर कडक निर्बंध आणले आहेत. तसं करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जातो.

शिवाय, शहराच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उपायही केले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, भूस्तरातली हलचाल हजारो वर्षांपासून सुरूच आहे. हिमयुगानंतर ग्रीनलॅंड आणि कॅनडातही भूस्खलन होत आहे.

त्यामुळे अटलांटिक महासागरात काही ठिकाणी जमीन वर उचलली गेली आहे. त्याचा वेग दर वर्षी एक किंवा दोन मिलीमीटर एवढाच आहे. त्यामुळेच त्याचा परिणाम जाणवत नाही.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा मेक्सिको सिटीतही भूस्खलन होत आहे.

पण मेक्सिको सिटी, सॅन जोआचिन आणि व्हर्जिनियाचा हॅम्पटन रोड इथं मात्र पाण्याचा उपसा वेगानं सुरू राहिल्यानं भूस्खलन सुरूच आहे.

जमिनीतून काहीही खणलं की तेवढा भाग मोकळा होतो. पाणी काढल्यानं त्या भागातील मातीही आक्रसते.

"पावसाचं पाणी जमिनीत झिरपतं, खरं. पण ज्या वेगानं पाण्याचा उपसा होतो, त्या वेगानं तो खड्डा बुजत नाही. त्यामुळे जमीन खचते", असं इटलीच्या पादुआ विद्यापीठाच्या सिमॅान फियाशी यांनी स्पष्ट केलं.

50 वर्षांत पाणी संपण्याची भीती

भारतात एकूण वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी 85 टक्के पाणी हे भूगर्भातून उपसलं जातं. युरोपात हे प्रमाण 75 टक्के आहे.

अमेरिकेत सिंचनासाठी भूगर्भातील पाणीच वापरलं जातं. 2010 मध्ये दररोज किमान 50 अब्ज गॅलन पाणी उपसलं गेलं.

जेवढ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतो, तेवढ्या प्रमाणात पुनर्भरण होत नसल्यानं भूस्खलन होऊ लागलं आहे.

कॅलिफोर्नियाच्या सॅन जोआचिनमध्ये भूस्खलनास हीच परिस्थिती कारणीभूत आहे.

मेक्सिको सिटीची कथाही वेगळी नाही. शहराच्या सव्वा दोन कोटी लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील 41 टक्के पाण्याची पुरवठ्या दरम्यान गळती होते.

या गतीनं मेक्सिको सिटीत पाण्याचा उपसा होत राहिला, तर पुढच्या 50 वर्षांत भूजल संपण्याची भीती आहे. मेक्सिको सिटीच्या काही भागात दर वर्षी 30 सेंटीमीटर म्हणजेच एक फूट एवढ्या गतीनं भूस्खलन सुरू आहे.

भूस्खलनामुळे मेक्सिको सिटीला अनेक संकंटांचा सामना करावा लागत आहे. भूमिगत जलवाहिन्या फुटू लागल्या आहेत. त्यामुळेही पाणी वाया जात आहे. त्यामुळे आणखी पाणी उपसले जात आहे. म्हणूनच भूस्खलनाची गतीही वाढली आहे. त्याचा शहरातील जुन्या बिल्डिंगलाही धोका जाणवू लागला आहे.

नेदरलॅंडचे जियोलॉजिस्ट गाइल्स अॅर्केन्स यांनी, भूस्खलनाचा फटका नेमका किती बसला याविषयी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचं सांगितलं.

पण ज्या भागात पाणी झिरपण्याची गती जास्त आहे, तिथं भूस्खलनाचं प्रमाण जास्त असल्याचं लक्षात आलं आहे.

टोकियो शहर याचं महत्त्वाचं उदाहरण आहे. या शहरात 1968मध्ये दरवर्षी 24 सेंटीमीटरच्या वेगानं भूस्खलन होत होतं. त्यावेळी दररोज 33 कोटी गॅलन पाण्याचा उपसा होत होता. त्यावर बंधन आणली गेली.

त्यामुळे 2000च्या सुमारास भूस्खलनाच्या वेगाला चाप बसला. हे प्रमाण दरवर्षी 0.4 सेंटीमीटरवर आलं.

अर्थात सर्वत्र हा फॉर्म्युला वापरणं शक्यच नाही. कारण ज्या भागात मुळातच पाण्याचे पर्याय कमी आहेत, तिथं भूजलाचा उपसा सुरूच राहणार.

कॅलिफॉर्नियाला वाचवण्यासाठी...

अमरिकेतील सॅन जोआचिन या शहरानं आणखी एक पर्याय समोर आणला. तिथल्या नियोजनकर्त्यांनी पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे भूजलाचा उपसा कमी होण्यास मदत होईल, असा त्यांचा अंदाज आहे.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा सॅन जोआचिन

सध्या या योजनेवर काम सुरू आहे. दरम्यान, सॅन जोआचिनमध्ये भूस्खलनामुळे पूल खचू लागले आहेत. त्यामुळे कॅलिफोर्नियाला वाचवण्यासाठी जलद गतीनं पावलं उचलण्याची गरज आहे.

भराव टाकणार कसा?

शांघायमध्येही अशाच स्वरुपाच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. तिथं ठिकठिकाणांहून पाणी आणून शहरातले तलाव काठोकाठ भरण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला आणि भूस्खलनाची गतीही मंदावली आहे.

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात हॅम्पटन रोड या भागातही हाच फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथं भूजलाचा उपसा झाल्यानं भूस्खलन सुरू झाले आहे.

त्याचा वेग वर्षाला 3 मिलीमीटर एवढा आहे. इथल्या प्रशासनानं सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पोटोमॅक नदीत सोडण्याचं ठरवलं आहे.

अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेचे वैज्ञानिक डेव्हीड नेल्म्स म्हणतात, हा पर्याय सगळीकडे उपयोगी पडेलच असं नाही.

जमिनीत माती आणि वाळू असे दोन थर असतात. पाण्याचा उपसा झाला की, हे दोन्ही थर एकत्र होतात. भूजलाची पातळी जरी वाढली तरी त्यामुळे मातीचा एक थर तयार होईल. पण सुकलेल्या मातीला मुळ रुपात आणणं कठीण असतं, असं नेल्म्स यांनी स्पष्ट केलं.

भारतानं जगभरातल्या या उदाहरणांपासून काही शिकण्याची गरज आहे. आपल्याकडे भूजलाचा सर्वाधिक उपसा केला जातो. वर्षागणिक कमी होत असलेला पाऊस आणि आटणाऱ्या नद्या यामुळे आपल्यावर पाण्याचं संकट घोंगावत आहे.

आपण आताच सावध झालो नाही तर खूपच उशीर होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)