डॉ. अमर कोटणीसना का मिळतो चीनमध्ये एवढा आदर?

डॉ कोटणीस Image copyright AFP
प्रतिमा मथळा चीनच्या सैनिकांवर उपचार केल्यामुळे डॉ कोटणीस आदरणीय आहेत.

चीनमधला कोणताही बडा नेता भारतात आला की तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो... मुंबईच्या कोटणीस कुटुंबाची. काहीच जणांनी ज्याचं नाव ऐकलं असेल अशा डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा आज 75वा स्मृतिदिन. कोण होते डॉ. कोटणीस, ज्यांना चीनमध्ये इतका मान दिला जातो?

दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्टरनं आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते.

डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचं नाव. जपान आणि चीनमधलं युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगची लागण झाली होती.

त्यांना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशानं भारतीय वैद्यक मिशननं एक टीम चीनला पाठवली. त्या टीममध्ये डॉ. कोटनीस हे एक होते. ते आपलं काम अतिशय मन लावून करत असत.

त्यांनी केलेल्या सेवेमुळं अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचले. युद्धभूमीवर प्लेगची भीषण लागण झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डॉक्टर लोक घाबरत असत पण कोटणीस कधी घाबरले नाहीत.

त्यांनी किमान 800 जणांवर उपचार केले असावेत असं म्हणतात. तिथल्या भीषण परिस्थितीमुळं त्यांच्यासोबत भारतातून आलेले डॉक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्याया समर्पण भावामुळेच त्यांचा चीनमध्ये आदर केला जातो.

वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी 1946 साली डॉ. कोटणीस यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं.

"सैन्यानं एक चांगला सहकारी आणि देशानं एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया," असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते.

चीनमध्ये असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या क्यो क्विंगलन नावाच्या एका नर्सच्या प्रेमात ते पडले. काही वर्षांपूर्वी त्यांचं डालियन या शहरात निधन झालं. त्यांना एक मुलगा होता. पण वैद्यकीय शिक्षण घेत असताना वयाच्या 24 व्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला.

डॉ. कोटणीस यांचं मूळ गाव सोलापूर. त्यांनी मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं.

भारतात मात्र त्यांची आठवण कुणी फारशी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डॉ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता.

चीनमध्ये आजही आदरणीय

चीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीननं त्यांच्या नावाचं पोस्टाचं तिकीट छापलं आहे. हंबे या भागात त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. या शतकातील 'चीनचे सर्वांत जवळचे परदेशी मित्र' असं सर्व्हेक्षण 2009 मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. या यादीमध्ये नाव डॉ. कोटणीस यांचंही नाव होतं. डॉक्टरांचा आजही चीनमध्ये खूप आदर केला जातो असं चायना डेली या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

डॉ. कोटणीस यांच्या लोकप्रियतेचं कारण काय आणि 1950 सालापासून आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना चीनचे नेते का भेट देतात?

"1962 साली भारत आणि चीनचे संबंध बिघडले. पण कधीकाळी दोन्ही देशांनी परदेशी राजवटीविरुद्ध आणि वसाहतवादाविरुद्ध लढा दिला आहे. या भेटीमागे हा देखील समान धागा आहे," असं चीनविषयक धोरणांचे अभ्यासक श्रीकांत कोंडापल्ली यांचं म्हणणं आहे.

"भारत आणि चीन एकाच वेळी वसाहतवाद आणि साम्राज्यवादाशी लढत होते. कोटणीस कुटुंबीयांची भेट घेऊन चीनी नेते दोन्ही देशांत असलेल्या एकतेच्या भावनेची पुन्हा आठवण करून देतात." असंही कोंडापल्ली म्हणतात.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा डॉ कोटणीस यांची बहीण मनोरमा यांनी चीनला भेट दिली होती.

1924 साली रविंद्रनाथ टागोर यांनी चीनला भेट दिली होती. तेव्हा तेथील सौंदर्य, शहाणपण, आणि मानवता या तीन गोष्टींची त्यांनी स्तुती केली होती. दोन देशांमध्ये अदृश्य, आत्मिक आणि आनंददायी संबंधांची गरज त्यांनी बोलून दाखवली होती.

1940 साली म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सात वर्षं आधी आणि चीनच्या क्रांतीनंतर सात वर्षांनी माओ यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं, "चीनी आणि भारतीय लोकांचा उद्धार म्हणजे सर्व शोषितांचा उद्धार करणं आहे."

1942 साली महात्मा गांधी यांनी चँग काय शेक यांना एक पत्र लिहिलं, पत्रात ते लिहितात, "तुमच्याबद्दल आणि तुमच्या स्वातंत्र्य युद्धाबदद्ल कायमच आस्था होती. हा संदर्भ आणि आपल्या संवादामुळे मला चीनच्या समस्या आणखी चांगल्या समजल्या."

प्रा. कोंडापल्ली सांगतात की, ते जेव्हा डॉ. कोटणीस यांना आदरांजली वाहतात तेव्हा भारत आणि चीनच्या सौहार्दपूर्ण संबंधांची आठवण होते.

त्यानंतर आता जग फार बदललं आहे.

चीन आणि जपान या जगतल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारताचे दोघांशीही आर्थिक संबंध आहे. भूतकाळातील काही बाबी आणि सीमाप्रश्नामुळे जपान आणि चीन यांचे संबंध कायम ताणलेले असतात. भारत आणि चीन यांच्यातसुद्धा सीमावाद आहे.

तरीही डॉ. कोटणीस यांची आठवण आहेच.

(2013 साली प्रकाशित झालेल्या या लेखाचे पुर्नप्रकाशन करीत आहोत. )

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics