राम मंदिर अयोध्या : बाबरी मशीद पाडली आणि पाकिस्तानात हिंदूंची मंदिरं तोडण्यात आली!
- शीराझ हसन
- बीबीसी उर्दू प्रतिनिधी, इस्लामाबाद

फोटो स्रोत, Getty Images
लाहोरचं जैन मंदिर. 8 डिसेंबर, 1992 ला पाडण्यात आलं.
जेव्हा बाबरी मशीद या राम मंदिरासाठी पाडली गेली तेव्हा त्याचे पडसाद पाकिस्तानात उमटले. तिकडे हिंदूंची मंदिरं तोडण्यात आली.
जसं भारतात मुस्लीम अल्पसंख्य आहेत, तसेच पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्य आहेत. आणि त्यांनी तिथं मंदिरंही उभारलेली आहेत.
6 डिसेंबर, 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. देशभर दंगली सुरू झाल्या आणि त्याचे पडसाद लगेचच पाकिस्तानात उमटले.
फोटो स्रोत, SHIRAZ HASSAN/BBC
लाहोरच्या जैन मंदिरची सध्याची अवस्था
तिकडे त्यानंतर वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 100 मंदिरांचं नुकसान करण्यात आलं. काही मंदिरं जमीनदोस्त झाली.
अर्थातच, या सगळ्याच मंदिरांमध्ये पूजाअर्चा होत होती, असं नाही. बहुतांश मंदिरं बंदच होती. यांपैकी काही मंदिरांमध्ये 1947च्या फाळणीनंतर पाकिस्तानात आलेल्या लोकांनी आश्रय घेतला होता.
8 डिसेंबर, 1992 ला लाहोरमधलं एक जैन मंदिर पाडण्यात आलं. आता त्या जागी मंदिराचे अवशेष आहेत.
या मंदिरांत राहणाऱ्या लोकांशी मी संवाद साधला.
फोटो स्रोत, SHIRAZ HASSAN/BBC
रावळपिंडीच्या कृष्ण मंदिराचा कळस पाडण्यात आला.
त्या लोकांनी सांगितलं की, 1992च्या डिसेंबरमध्ये जेव्हा ही मंदिरं पाडायला जमाव चालून आला तेव्हा आम्ही त्यांना मंदिर न पाडण्याची विनंती केली. "हे आमचं घर आहे... त्यावर हल्ला करू नका!" असं आम्ही त्यांना सांगितलं.
रावळपिंडीच्या एका कृष्ण मंदिरात आजही काही हिंदू पूजा करतात. बाबरीच्या घटनेनंतर या मंदिराचा कळस पाडण्यात आला.
सरकारनं लक्ष घातलं असतं तर हा कळस पुन्हा उभारता आला असता.
फोटो स्रोत, SHIRAZ HASSAN/BBC
रावळपिंडीचं कल्याण दास मंदिर
रावळपिंडीच्याच कल्याण दास मंदिरात दृष्टिहीन मुलांसाठी सरकारी शाळा सुरू करण्यात आली आहे. 1992मध्ये याही मंदिरावर जमावानं हल्ला केला होता.
पण शाळा चालवणाऱ्यांनी जमावाला परावृत्त केलं आणि हे मंदिर बचावलं.
फोटो स्रोत, SHIRAZ HASSAN/BBC
झेलममधील मंदिर
पाकिस्तानातल्या झेलम शहरातही एक मंदिर आहे. या मंदिरावर जेव्हाही कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यात तो हल्लेखोर जखमी तरी झाला किंवा ठार झाला, असं स्थानिक लोक सांगतात.
मग 1992 मध्येही काही लोकांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जण मंदिरावर चढले आणि तिथून पडून जखमी झाले.
त्यानंतर मात्र या मंदिराकडे कोणी फिरकलं नाही.
फोटो स्रोत, SHIRAZ HASSAN/BBC
लाहोरचं बंसीधर मंदिर
लाहोरच्या अनारकली बाजारातलं बंसीधर मंदिर ही 1992मध्ये हल्लेखोरांचं लक्ष्य झालं होतं. त्यात या मंदिराचं किरकोळ नुकसान झालं.
फोटो स्रोत, SHIRAZ HASSAN/BBC
लाहोरचं शितला देवी मंदिर
लाहोरच्या शितला देवी मंदिरावरही बाबरीचं पडसाद उमटलं होतं. या मंदिरात आजही फाळणीच्या वेळी आलेले आश्रित राहत आहेत.
1992 मध्ये जमावानं या मंदिराचंही थोडं नुकसान केलं होतं.
हे वाचलंत का?
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)