चीनचं 'मूल्य शिक्षण' : महिलांची जागा तळातलीच!

चिनी मुलगी Image copyright Getty Images

चीनमध्ये महिलांना 'मूल्य शिक्षणाचे' धडे देणाऱ्या केंद्रांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढली आहे. या केंद्रांमध्ये महिलांना तुमचं करिअर आणि स्त्रीत्व यात गल्लत करू नका, असा सल्ला दिला जातो. त्यांना जबरदस्तीनं नोकरांप्रमाणे वागवलं जातं.

पण या कथित मूल्यशिक्षणाच्या संस्था नेमक्या आहेत तरी कशा आणि त्यांची निर्मिती का झाली आहे?

उत्तर चीनमधल्या फुशून शहरातील एका पारंपरिक सांस्कृतिक संस्थेत महिलांना 'मूल्य शिक्षणाचे' विशेष धडे देण्याची बातमी फुटली आणि संपूर्ण चीनमधून रोषाचा प्रतिध्वनी उमटला.

या केंद्रात महिलांना 'मूल्य शिक्षण' नावाच्या विषयांतर्गत दिलेले संदेश हे पुढीलप्रमाणे होते.

  • करिअर करू इच्छिणाऱ्या महिलेचं पुढे काही खरं नाही.
  • महिलांनी समाजातल्या केवळ खालच्या स्तरामध्येच आपली जागा शोधावी आणि त्यातून कधी वर येण्याचा प्रयत्न करू नये.
  • महिलांनी नेहमी त्यांच्या कुटुंबातल्या वडील, नवरा आणि मुलगा यांच्या आज्ञेत रहावे.
  • नवरा जेव्हा तुम्हाला मारहाण करत असेल किंवा तुमच्याशी भांडत असेल तेव्हा त्याला प्रतिकार करू नये.
  • जर एखाद्या महिलेनं तीन किंवा अधिक व्यक्तींशी शरीर संबंध ठेवले तर तिला आजार होऊन तिचा मृत्यू होतो.

फुशून शहराच्या स्थानिक प्रशासनानं याची तत्काळ दखल घेतली आणि या केंद्राकडून देण्यात येणारं शिक्षण सामाजिक मूल्यांच्या विरोधात असल्याचं मत फुशून शहराच्या शिक्षण विभागानं एका पत्रकाद्वारे नोंदवलं.

मात्र, चीनच्या माध्यांमांकडून आणि सोशल मीडियातून याविषयी दबाव वाढल्यानंतर फुशून शहराच्या प्रशासनानं या सहा वर्षं जुन्या संस्थेला केंद्र बंद करण्याचा आदेश दिला आहे.

...ते खूप वाईट होतं

फुशून केंद्रात जाऊन आलेल्या १७ वर्षीय जिंग हिनं केंद्र बंद झाल्याचं ऐकल्यावर आनंद झाल्याचं बीबीसीला सांगितलं. जिंग १३ वर्षांची असताना खूप खोडकर होती. म्हणून तिच्या आईनं तिला काही शिक्षण मिळावं या हेतूनं या संस्थेत पाठवलं होतं.

Image copyright PEAR VIDEO

जिंगला त्या संस्थेतले दिवस अजूनही आठवतात. ती म्हणाली, "प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी मला हातांनं टॉयलेट स्वच्छ करण्यास सांगितलं. आणि तो अनुभव खूप वाईट होतं."

महिलांनी त्यांच्या आयुष्यात अशीच कामं केली पाहिजेत असंही तिला सांगण्यात आलं. तसंच महिलांचा जन्म हा पुरुषांची सेवा करण्यासाठीच झाला आहे असाही सल्ला तिला देण्यात आला.

जिंगला या सगळ्यापेक्षाही महिलांकडून त्या संस्थेत अशी कामं करून घेण्यात येतात आणि तिला टॉयलेट स्वच्छ करताना ग्लोव्ज का दिले नाहीत; हे प्रश्न आजही सतावत आहेत.

तसंच या संस्थेत प्रशिक्षणादरम्यान अजून एक प्रथा पाळण्यात येते. सगळ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या पालक आणि पूर्वजांकडे आपल्या चुकांबद्दलची माफी मागण्यास सांगण्यात येतं.

या एकूण प्रशिक्षण काळात प्राचीन काळापासून वाचनात असलेल्या सिद्धांतांचं वाचन, घरगुती कामं करण्याच्या पद्धती आणि विविध विषयांवरील गटचर्चा यांचा समावेश आहे.

"आजारातून बऱ्या झालेल्या' महिलांचे व्हीडिओ आम्हाला दाखवले गेले. ती या प्रशिक्षणातील सगळ्यांत विचित्र बाब", असं जिंगनं सांगितलं.

व्हीडिओतील महिला म्हणत होती की, "मी एकपेक्षा जास्त पुरुषांशी शरीर संबंध ठेवले होते. त्यामुळे मला काही आजार झाले होते. पण, जेव्हा मी या केंद्रात मूल्य शिक्षणाचे धडे घेतले, तेव्हा जणू चमत्कार झाला आणि माझे सारे आजार बरे झाले."

Image copyright PEAR VIDEO

जिंगनं पुढे सांगितलं की, "या केंद्रातील हे सात दिवसीय प्रशिक्षण हे सामान्य माणसांसाठी नाही. तिथे ज्या पद्धतीनं 'ब्रेनवॉश' केलं जातं ते मला अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे प्रशिक्षणाच्या चौथ्या रात्री मी कुंपणावरून उडी मारून पळून आले."

ग्रामीण भागात जास्त प्रसार

चीनमधील बिजिंग आणि शांघायसारख्या बड्या शहरांमधील सुशिक्षित आणि पांढरपेशा लोकांना अशी प्रशिक्षण केंद्रं किंवा संस्था म्हणजे धक्कादायक वाटत असतील. मात्र, चीनमधील लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अशा कालबाह्य मूल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पाहायला मिळतात.

मे महिन्यात चीनमधल्या जीऊजीयांग शहरातल्या एका अशाच केंद्रात महिलांच्या व्हर्जिनिटीचं म्हणजे कौमार्यरक्षणाचं महत्त्व याबाबत माहिती देण्यात येत होती. यात महिलांनी कमी कपडे घालणं, हे चुकीचं असून ती वाईट बाब असल्याचं सांगण्यात आलं.

२०१४ मध्ये डोंगाऊन शहरातील एका केंद्रात झालेल्या सत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्यांचे गर्भाशय आणि स्तन आधी काढून टाकावे असे सांगण्यात आले.

२००५ मध्ये दक्षिण चीनमधल्या शेंझेन शहरात एका महिलेनं वेश्या व्यवसायास बळी पडण्याऐवजी एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारणं पत्करलं. जीवापेक्षाही व्हर्जिन असणं हा पर्याय तिनं निवडला याबाबत तिचं कौतुक करण्यात आलं.

गेल्या हजारो वर्षांतल्या चीनमधल्या सरंजामी वाटचालीत महिलांना या केंद्रामध्ये दिलेल्या संदेशांप्रमाणे वागवणं ही महिलांच्या आयुष्यातली आचारसंहिताच होती.

वडील, नवरा आणि मुलगा यांचंच ऐकणं, कोण्या एकासाठीच आपली व्हर्जिनिटी राखणं आणि महिलांकडे बुद्धीमत्ता नाही हे समजून चालणं अशा पद्धती त्याकाळी चीनमध्ये प्रचलित होत्या.

Image copyright PEAR VIDEO

तसंच पूर्वीच्या काळी चीनमध्ये या गोष्टी शाळांमध्ये शिकवल्या जात आणि या गोष्टींचा वापर करून महिलांचा आवाजही दाबला जात असे.

चीनचे नेते माओ यांनी "महिलांनी अर्ध आकाश व्यापून टाकलं आहे" हे सुप्रसिद्ध विधान १९४९ मध्ये पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना केल्यानंतर केलं होतं. त्यानंतरच चीनमध्ये महिलांच्या उदयाला सुरुवात झाली.

मात्र, प्राचीन काळात अस्तित्वात असलेल्या सरंजामी वृत्तीच्या संकल्पना सध्याच्या केंद्रांमार्फत पुन्हा डोकं वर काढू लागत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानं अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पैसा कमावण्यासाठी...

विचारसरणी हेच या केंद्रांच्या किंवा संस्थांच्या निर्मितीमागचं प्रमुख कारण नाही. यासाठी फुशून शहारातील संस्थेचं उदाहरण बोलकं आहे.

कारण, या संस्थेला फुशून सिव्हिल अफेअर ब्युरोनं 'पब्लिक वेल्फेअर मास ऑर्गनायझेशन' म्हणून परवानगी दिली होती. शाळा किंवा शाळेप्रमाणे प्रशिक्षण वर्ग चालवण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.

पण, संस्थाचालकांनी याकडे दुर्लक्ष करत याचे शाळेत आणि प्रशिक्षण केंद्रात रुपांतर करत चीनमधल्या विविध शहरांत शाखा उघडल्या. संस्था बंद होण्याआधी १० हजार विद्यार्थी त्यांच्या विविध केंद्रांवर शिकत होते.

केंद्राच्या एका जाहिरातीच्या व्हीडिओमध्ये विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या डोनेशनवर संपूर्ण संस्था चालवली जाते, असं मुख्याध्यापक कँग जिनशेंग यांनी सांगितलं होतं. तसंच काही पारंपरिक पोशाखांच्या विक्रीचा जोडधंदाही संस्थेकडून चालवला जातो.

ज्या कुटुंबांमध्ये पालकांना त्रास देणारी मुले आहेत त्यांचं वर्तन आम्ही बदलू आणि त्यांना पारंपरिक संस्कृतीची ओळख करून देऊ असा दावा या संस्थेनं केला होता. तसंच त्यासाठी बऱ्याच जाहीरातीही प्रसिद्ध केल्या होत्या.

Image copyright Getty Images

डोंगाऊन शहरातही अशाच एका कंपनीनं इव्हेंटसाठी परवानगी मिळाली. मात्र, नंतर त्याचं शाळावजा प्रशिक्षण केंद्रात रूपांतर केलं गेलं आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यास सुरुवात केली. अखेर २०१४ मध्ये स्थानिक प्रशासनानं त्यांची मान्यता रद्द केली.

अशा संस्था या पैसे कमावण्याच्या नावाखाली हे उद्योग करत असल्याचं पुढे आल्यावर त्यांच्या कायदेविषयक योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिक प्रशासनानं त्यांच्या मान्यता रद्द केल्या.

मात्र, अशा अनेक संस्था आजही सुरू आहेत. इतकंच नव्हे तर फुशून शहरातली ती संस्था बंद झाली असली तरी तिच्या अन्य शाखा राजरोसपणे सुरुच आहेत.

'सहकार्य गट'

अशा पुराणमतवादी संकल्पनांना चीनमधल्या बाजारात खरंच किंमत आहे का?

अशा संस्थांमध्ये येणाऱ्या महिला विद्यार्थिनींचं शिक्षण कमी असतं अन्यथा अनेकींना वैवाहिक आयुष्यात अडचणी आलेल्या असतात. अशा महिलांना आपल्यासारख्याच अडचणी आलेल्या अन्य महिलांना भेटून हायसं वाटतं.

अशा वेळी जेव्हा त्यांना सांगितलं जातं की महिलांना पुरुषांपेक्षा समाजात एकंदरीत किंमत कमीच आहे, अशावेळी त्यांना आपल्या समस्येवर हाच तोडगा असल्याची जाणीव होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेली एक महिला सांगत होती की, "शांत आणि आदरपूर्वक कसं वागायचं हे जरा शिकून घे, असं माझ्या नवऱ्यानं मला सांगितल्यानं मी या केंद्रात आले."

या संस्थांमध्ये एकत्र आल्यानं, आपापली कहाणी एकमेकींना सांगितल्यानंतर या महिलांना एका 'सपोर्ट ग्रूप'ची स्थापना केली. आणि यातल्या अनेकींनी आपापल्या संस्थेत कार्यकर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

चीनमधील महिला विषयक अभ्यासक आणि रुरल वुमन मॅगझिनच्या संपादक झी लिहुआ यांनी सांगितलं की, "धोरणकर्त्यांकडून याप्रकरणी प्रथम मदत मिळाली पाहिजे. शिक्षणाची कमतरता, कायदेशीर मदत नसल्यानं त्यांना अशा संस्थांकडे पर्याय म्हणून जावं लागतं."

Image copyright PEAR VIDEO

"याचबरोबर महिलांना ग्रामीण भागात लैंगिक अत्याचाराच्या घटनांनाही सामोरं जावं लागत आहे. त्यावर त्यांना कोणतंही उत्तर मिळत नाही. त्यामुळे महिलांनी अशा संस्थांकडे जाण्यात काही अर्थ नाही, त्यांनी कायदेशीर मदत घेऊन शिक्षणाचा मार्ग स्वीकरायला हवा", असंही लिहुआ यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, "इतिहासाला पुन्हा शिरजोर होऊ देण्यात काय हशील? एकूणच चीनचा समाज लिंगभेदाच्या पुढे गेला आहे आणि अजून पुढे जायला हवा. अशा संस्थांच्या गोष्टींवर हसून पुढे जाणंच योग्य ठरेल."

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)