काम कशाने जास्त होतं - अतिकाम की कमी काम?

समुद्र किनाऱ्याचा फोटो Image copyright Mira / Alamy Stock Photo

जेव्हा मी वॉशिंग्टनमधून रोमला आले, तेव्हा तिथल्या प्राचीन इमारती आणि जुने चर्च यांपेक्षा एक बाब माझ्या नजरेत आली, ती म्हणजे काहीही काम न करणारे लोक!

खिडक्यांतून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांना पाहाणाऱ्या वृद्ध स्त्रिया, सायंकाळी फिरत रस्त्यावर भेटणाऱ्या सर्वांशी बोलणारे कुटुंब हे दृश्य नेहमी माझ्या नजरेस पडलं आहे.

कार्यालयांतील वातावरणही वेगळं होतं. टेबलवर घाईघाईत सॅंडविच खाणारे कर्मचारी यापेक्षा लंचच्यावेळी रेस्टॉरंटमध्ये पुरेसं जेवण घेण्यासाठी होणारी लोकांची गर्दी, हेच चित्र नजरेस पडत होतं.

17व्या शतकात पर्यटकांनी इटलीमधील या निवांतपणाची नोंदी केल्या आहेत. दुपारी घरी जेवणासाठी गेलेले मित्र थेट रात्री 8 वाजताच ऑफीसला कसे पोहचतात, याचे किस्सेही सांगितले जातात.

आपार कष्ट आणि काही न करण्यातला गोडपणा यांमध्ये समन्वय साधण्यावरचा विश्वास नेहमीच मला विचारात पाडतो. कारण काहीही न करण्याला नेहमीच उत्पादकतेच्या विरोधात मानलं गेलं आहे.

कल्पक, बौद्धिक आणि औद्योगिक अशा कोणत्याही प्रकारच्या उत्पादकतेचा संबंध नेहमीच वेळेचा पुरेपूर उपयोग करण्याशी जोडण्यात आला आहे.

आपण आपले दिवसांचे तास अधिकाधिक कामाने भरत असताना, अथक काम म्हणजे उत्पादकतेचा सर्वोच्च बिंदू नाही, असं अनेकांना वाटतं. उलट हे एकमेकांच्या विरोधातच आहे.

संशोधकांना काय वाटतं?

संशोधक विचार करत आहेत की आपण फ्रेश असताना केलेलं काम हे 14 तास घालवून केलेल्या कामापेक्षा निकृष्ट असतं असं नाही. उलट अशा प्रकारची कार्यपद्धती ही कल्पकता आणि ज्ञानग्रहण क्षमता यांना कमी लेखणारी आहे.

Image copyright Raphaela Tesch / Alamy Stock Photo

तसंच अशा प्रकारची कार्यपद्धती आपल्याला शारीरिकदृष्ट्या आजारीही बनवते.

जॉश डेव्हिस यांचं मत

'टू ऑसम अवर्स' या पुस्तकाचे लेखक जॉश डेव्हिस म्हणतात, "मानसिक कामाची तुलना पुशअप्सशी करा. 10 हजार पुशअप्स करायचे असतील, तर ते एका दमात करणं सोप की थोड्याथोड्या पुशअप्सनंतर विश्रांती घेऊन करणं सोपं?"

"मेंदू हा स्नायूच असतो. सतत काम करून चुकीचं वातावरण निर्माण केलं तर आपण काहीही साध्य करू शकणार नाही," असं ते म्हणतात.

करा किंवा मरा

अनेकांना असं वाटतं की मेंदू हा स्नायू नसून कंप्युटर आहे. सतत काम करणारं यंत्र! पण हे सत्य नाही. विश्रांती न घेता काम करणं धोकादायकही असतं, असं काही तज्ज्ञांच मत आहे.

'ऑटोपायलट'चे लेखक अॅंड्र्यु स्मार्ट म्हणतात, "जेव्हा आपण सतत मानसिक काम करतो, तेव्हा शरीर विश्रांतीची मागणी करत असतं. म्हणून सतत काम करणं धोकादायक असतं."

शरीरावर होणारे परिणाम

एका पाहणीत सततच्या कामामुळं हृदय रोगाची शक्यता 40टक्केंनी वाढते. तर दुसरीकडे धुम्रपानामुळे हृदयरोगाचं प्रमाण 50 टक्केंनी वाढतं.

जास्त तास काम करणाऱ्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता जास्त असते. तसेच 7 ते 8 तास काम करणाऱ्यांच्या तुलनेत 11 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांना कधी तरी नैराश्येचा सामना करावा लागलेला असतो.

Image copyright Getty Images

जपानमध्ये यातून 'कराशी' हा ट्रेंड दिसून येतो. कराशी म्हणजे, अतिकामामुळे येणारा मृत्यू होय.

दीर्घ सुटीची गरज

हेलसिंकीमध्ये व्यवसायिकांचा 26 वर्षं अभ्यास करण्यात आला आहे. ज्या व्यवसायिकांनी आणि नोकरदारांनी आयुष्याच्या मध्यावर कमी सुट्या घेतल्या, अशांत अकाली मृत्यूचे प्रमाण तसेच वार्धक्यात अनारोग्य अधिक असल्याचं लक्षात आलं आहे.

सुटी आणि पगारवाढ

खरं तर सुट्यांचा आर्थिक लाभही होतो. अमेरिकेतील 5000 पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात असं दिसून आलं आहे, की वर्षाला 10पेक्षा जास्त पगारी रजा घेणाऱ्यांना पगारवाढ आणि इतर लाभ मिळण्याची शक्यता जास्त असते.

उत्पादकतेचा जन्म

कार्यक्षमता आणि उत्पादकता हे नवं वेड आहे. पण विचारवंत बर्ट्रांड रसेल याच्याशी सहमत नाहीत.

ते म्हणतात, "थोडा निवांतपणा आनंददायी असतो. पण 24 तासांपैकी फक्त 4 तास काम असेल, तर उरलेल्या वेळेच काय करायच हे पुरुषांना माहीत नसतं. कशाच्या तरी बदल्यात काहीतरी केलंच पाहिजे, असं पुरुषांना वाटत असतं."

हेन्री मिलर यांनी लिहिलं आहे, "माणसांना भेटा, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्या. दारू प्यायची असेल तर प्या. मानवी संवेदना जिवंत ठेवा."

Image copyright Getty Images

अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक असलेले बेजांमिन फ्रॅंकलिन यांचाही बराचसा वेळ काही न करण्यात जात असे. दोन तासांचा लंचब्रेक, निवांत सायंकाळ आणि रात्रीची पूर्ण झोप असा त्यांचा शिरस्ता होता. त्यांचा पेशा प्रिंटरचा होता. पण ते काम ते सतत करत नसत.

त्यापेक्षा लोकांना भेटणे आणि छंद यांना ते मोठा वेळ देत असत. मूळ कामापासून दूर जाण्यामुळे त्यांनी अनेक नव्या गोष्टी घडवल्या.

जागतिक आकडे काय सांगतात?

अमेरिकेतील कामाचे आठवड्याचे सरासरी तास 38.6 तास आहेत. ही वेळ नॉर्वेपेक्षा 4.6 तासांनी जास्त आहे. पण जीडीपी जर पाहिला तर नॉर्वेतील कर्मचाऱ्यांचं जीडीपीमधील योगदान ताशी 78.70 डॉलर इतकं आहे. तर अमेरिकेत हेच प्रमाण 69.60 डॉलर इतकं आहे.

इटलीमध्ये कामाचे आठवड्याचे सरासरी तास 35.5 इतके आहेत. तर हेच तास टर्कीमध्ये 47.9 तास आहेत. पण इटलीमधील उत्पादकता 40 टक्केंपेक्षा जास्त आहे. युनायटेड किंगडममध्ये आठवड्याचे सरासरी कामाचे तास 36.5 तास इतके आहेत.

म्हणजेच काय, तर एक कॉफीब्रेक तितकाही वाईट नसतो.

ब्रेन व्हेव

आपले कामाचे तास दिवसाला 8 तास का आहेत, याही मागे कारण आहे. कामाचे तास कमी केल्याने उत्पादकता वाढते, असा कंपन्यांचा अनुभव आहे.

औद्योगिक क्रांतीवेळी कामाचे तास 10 ते 16 तास होते. फोर्ड कंपनीने यात सर्वप्रथम बदल करून ते 8 तासांवर आणले. यामुळे कंपनीची उत्पादकता इतकी वाढली की 2 वर्षांतच कंपनीचा नफा दुप्पट झाला.

10 तासांपेक्षा 8 तास काम करणं अधिक उत्तम असेल, तर कामाचे तास अजून थोडे कमी केले तर?

40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी आठवड्याला 25 तास इतके काम बौद्धिक क्षमतेसाठी चांगल असतं. स्वीडनमध्ये दररोज 6 तासांच्या कामांचा प्रयोग करण्यात आला होता. याचा कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर आणि आरोग्यावर चांगला परिणाम झाला असल्याचं दिसून आलं आहे.

यूकेमध्ये 2000 पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात असं दिसून आलं आहे, की लोक 8 तासांपैकी फक्त 2.53 तास इतकावेळच 'उत्पादक' असतात. उरलेल्या वेळेत सोशल मीडिया, बातम्या वाचणे, सहकर्मचाऱ्यांशी कामाव्यतिरिक्त गप्पा मारणे, खाणे आणि नवी नोकरी शोधणे यात घालवतात.

सलग काम किती तास?

स्टॉकहोम युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्रज्ञ के अॅंड्रेस इरिक्सन यांनी एखाद्या कामात कौशल्य मिळवायचं असेल, तर आपल्याला अधिक ब्रेकची गरज असते, असं म्हटलं आहे.

"सर्वसाधारण विश्रांती न घेता लोक सलग एकच तास काम करू शकतात. नामवंत लेखक, संगीतकार, खेळाडू त्यांच्या कलाकृतीसाठी दिवसाला फक्त 5 तासच देत असतात," असं ते म्हणतात.

इतर अभ्यासांतून असं लक्षात आलं आहे की, काम करत असताना लहान ब्रेक घेणं कामावर लक्षकेंद्रीत करणं हे उच्च क्षमतेचं काम करण्यासाठी उपयुक्त ठरते. उलट ब्रेक न घेण्यानं कार्यक्षमता बिघडते, असं दिसून आलं आहे.

सक्रीय विश्रांती

जेव्हा आपण काहीच करत नसतो, त्या स्थितीला 'विश्रांती' हा शब्द काही संशोधकांना अयोग्य वाटतो.

आपण जेव्हा काही काम करत नसतो, तेव्हा मेंदूचा Default Mode Network कार्यरत असते. तेव्हा मेंदू भविष्याचा विचार आणि आठवणींच जतन करतो. मेंदूचा हाच भाग तुम्ही इतरांना पाहाताना, इतरांबद्दल विचार करताना, नैतिक निर्णय घेताना आणि तुम्ही इतरांच्या भावनांवर प्रक्रिया करत असताना कार्यरत असतो.

मेंदूचा हा भाग जर कार्यरत नसेल तर काय होऊ शकतो, याची आपण कल्पना करू शकतो.

एखाद्या परिस्थितीचा खोलवर विचार करण्यात याचा लाभ होतो, अशी माहिती युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाज ब्रेन अॅंड क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूटमधील संशोधक मेरी हेलेन इम्मोर्डिनो यांगा यांनी दिली. कल्पकतेचा जन्म DMNमध्ये होतो.

मंकी माईंड

जे ध्यानधारणा करतात त्यांना माहीत असेल काही न करणं, हे सर्वात कठीण काम असतं. काही न करण्यानं आपण अस्वस्थ होतो.

काल्पनिक परिस्थिती आणि गृहीत फलनिष्पती यांचा विचार करणं हे सुद्धा फायद्याचं असतं, असं त्या सांगतात.

जर आपण सुंदर फोटो पाहत असू तर DMN कार्यरत नसेल. पण हा फोटो सुंदर का आहे, याचा विचार केला तर DMN कार्यरत होतो.

Image copyright Alamy

सतत कार्यरत राहाण्यामुळे होणारे नुकसान दुरुस्तही करता येते. लहान मुलांसोबत खेळणं, बाहेर चालायला जाणे अशांनी कल्पकता वाढते.

ध्यानधारणेचा कल्पकता, मूड, स्मरणशक्ती, एकाग्रता यासाठी चांगला लाभ होतो. ज्या कामांवर 100 टक्के एकाग्रतेची गरज नसते, अशा कामांतही याचा फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे.

भीतीची भावना

आपल्या टेबलपासून 15 मिनिट दूर जाणं किंवा रात्री इनबॉक्समधून लॉग ऑफ करणं अनेकांना भीतीदायक वाटतं. आपल्या गैरहजेरीत सर्व काही कोलमडेल, असं आपल्याला वाटतं असतं.

पण हे सगळं चुकीचं आहे, असं लाईफ कोच जेन रॉबिन्सन सांगतात. त्या याची तुलना आगीशी करतात. "आपण व्यवसाय सुरू करतो आणि वर्षानंतर आपण सुटीवर जातो किंवा काम सांभाळण्यासाठी कुणाला तरी कामावर घेतो. पण त्याच्यावर आपला विश्वास नसतो. 'आग विझेल की काय' असं आपल्याला वाटत असतं," असं त्यांचं मत आहे.

पण आपल्याला जास्त काम करायाचं असेल तर कमी काम करण्यात आपल्याला आरामदायी वाटलं पाहिजे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)