अमेरिकन सिनेट निवडणुका : ट्रंपविरोधी लाटेची चाहूल?

डग जोन्स Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विजय साजरा करताना डग जोन्स

"इस्लाम हा 'खोटा धर्म' आहे, समलैंगिकता बेकायदेशीर केली पाहिजे, डार्विनचा सिद्धांत चुकीचा होता"... अमेरिकेतल्या अलाबामा मधली सिनेट निवडणूक हरलेल्या रॉय मूर या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यानं केलेली ही विधानं आहेत. मूर यांना ट्रंप यांनी पाठिंबा दिला होता.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डग जोन्स यांनी रिपब्लिकन पक्षाची अलाबामातली 25 वर्षांची सद्दी मोडत ट्रंप यांच्या उमेदवाराविरोधात हा ऐतिहासिक विजय मिळवला. अलाबामा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या लोकप्रियतेची कसोटी म्हणून या लढतीकडे पाहिलं जात होतं. रिपब्लिकन नेतृत्वाच्या विरोधात जाऊन ट्रंप यांनी रॉय मूर यांना पाठिंबा दिला होता.

गर्भपात, समलैंगिकता यांना विरोध करणाऱ्या सनातनी विचारांच्या रॉय मूर यांनी अलाबामा सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.

कार्यकर्त्यांसह विजय साजरा करताना दिलेल्या भाषणात डग जोन्स म्हणाले, "प्रतिष्ठा आणि सन्मान याबद्दलची ही निवडणूक होती. सर्वसामान्य सौजन्य आणि मर्यादांची ही लढत होती."

कॅपिटॉल हिलवरची गणितं बदलणार?

रॉय मूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणूकीचे अनेक आरोप झाल्यानंतर या निवडणुकीच्या प्रचाराला कलाटणी मिळाली. अनेक महिलांनी मूर यांनी त्या किशोरवयात असताना त्यांच्याबरोबर लैंगिक गैरवर्तणूक केल्याचे आरोप केले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रॉय मूर

मूर यांनी या आरोपांचं खंडन केलं आणि आपण इतकी वर्षं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना हे आरोप कसे केले गेले नाहीत असाही उलटप्रश्न विचारला.

निकाल जाहीर झाल्यानंतरही रॉय मूर यांनी पराभव स्वीकारला नाही. आपल्या भाषणात बायबलमधले संदर्भ देत ते म्हणाले की, "मतगणना पूर्ण झाल्यानंतर जर दोन्ही उमेदवारांच्या मतांच्या टक्केवारीत अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी फरक आढळून आला तर आम्ही पुनर्मोजणीची मागणी करू."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप

जोन्स यांच्या सिनेट विजयामुळे रिपब्लिकन पक्षासाठी कॅपिटॉल हिलवरचं गणितही बदलू शकतं. सिनेट मधलं पक्षीय बलाबल आता 51-49 (रिपब्लिकन-डेमोक्रॅट) असं आहे.

ट्रंप यांच्या अडचणीत वाढ

ट्रंप यांचा 'टॅक्स रिफॉर्म प्लॅन' अशातच सिनेटमध्ये मतदानासाठी येणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे टेनेसीमधले सिनेटर बॉब कॉर्कर या कर सवलत विधेयकाविरुद्ध मतदान करतील असा कयास आहे. याहून अधिक फाटाफूट आता रिपब्लिकन पक्षाला धोक्याची ठरू शकेल.

याआधीच 'ओबामाकेअर' ही आरोग्यसुविधा रद्द करून त्याजागी दुसरी योजना आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न फसला. कर सवलत विधेयक पास न झाल्यास आश्वासन पूर्ण न होऊ शकत नसल्याची नामुष्की ट्रंप यांच्यावर ओढवणार.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात केलेल्या एका मोठ्या आश्वासनाची पूर्तता करू शकत नसल्याचं पहिल्याच वर्षात ट्रंप यांच्या खात्यावर नकारात्मक गुण नोंदले जातील.

मूर यांच्याविरुद्ध लैंगिक छळवणुकीचे आरोप झाल्यानंतर अनेक रिपब्लिकन नेत्यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली. अलाबामाचे आत्ताचे सिनेटर रिचर्ड शेल्बी यांनीही मूर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पण ट्रंप यांनी मूर यांना भरघोस पाठिंबा दिला. ट्विटरवरून त्यांच्यासाठी प्रचार केला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मूर यांच्याविरुद्ध लैंगिक छळवणुकीचे आरोप झाले.

या निवडणुकीमुळे रिपब्लिकन पक्षातली दुफळी उघडपणे लोकांसमोर आली.

रिपब्लिकन पक्षातली यादवी उघड्यावर

रॉय मूर यांना पाठिंबा देऊन ट्रंप यांचे सहकारी सिनेट मेजॉरिटी लीडर, म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे नेते असलेल्या मिच मॅकॉनल यांना खुजा ठरवू पाहत होते असा समज आहे. प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्वाला शह देण्याच्या रणनीतीतला हा 'टीम ट्रंप'चा एक डाव होता असंही मानलं जातं आहे.

लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर मूर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी असं मॅकॉनल यांनी सुचवलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मिच मॅकॉनल.

या पराभवानंतर अनेक रिपब्लिकन नेत्यांनी 'राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या सहकाऱ्यांनी अलाबामासारख्या राज्यात रिपब्लिकन उमेदवार पाडण्याची अशक्यप्राय गोष्ट करून दाखवली' अशा स्वरुपाची टीका केली.

ट्रंपविरोधी लाट?

बीबीसीचे वॉशिंग्टन करस्पाँडंट अँथनी झर्कर लिहितात, 'वर्षभरापूर्वी यासारख्या निकालाची कल्पना करणंही शक्य नव्हतं, मंगळवारी मतदान सुरू झालं तेव्हाही असा निकाल लागेल ही शक्यता कमीच वाटत होती. आता सिनेटमधलं रिपब्लिकन बहुमत घटणार, डेमोक्रॅटिक पक्षाला 2018 च्या निवडणुकांत सिनेटमध्ये पुन्हा वर्चस्व मिळवता येईल.'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विजय साजरा करताना डग जोन्स.

'इतर रिपब्लिकन नेते द्विधा मनस्थितीत असतानाही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी मूर यांना दिलेल्या भरघोस समर्थनाचा नागरिकांनी निषेध केला आहे असा यातून अर्थ घेता येऊ शकेल. नोव्हेंबरमध्ये व्हर्जिनीया आणि न्यू जर्सी मधल्या गव्हर्नरपदाच्या शर्यती जिंकल्यानंतर डेमोक्रॅटिक समर्थकांना आता अशी आशा असेल की ट्रंपविरोधी लाट तयार होते आहे.' असंही झर्कर म्हणतात.

पण मूर यांच्या उमेदवारीतच इतके दोष होते की कदाचित आत्ताच फार तर्क करणं चुकीचं ठरेल असंही झर्कर म्हणतात.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)