रशिया तुमचं इंटरनेट बंद करू शकतं

रशिया Image copyright Getty Images

खोल समुद्र तळातून गेलेल्या इंटरनेट केबल कापण्याच्या बेत रशिया आखत आहे, असं UKच्या एका ज्येष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.

युकेचे हवाई दल प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सर स्टुअर्ट पीच यांनी स्वतः एका जाहीर कार्यक्रमात रशिया या इंटरनेट केबल कापण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. रशिया खरंच असं कृत्य करेल का? रशिया किंवा इतर कुठल्या राष्ट्रानं असं पाऊल उचलल्यास नेमकी काय परिस्थिती ओढावेल?

इंटरनेट केबल नेमकं करतात काय?

इंटरनेट केबल जगभरातले सगळे देश आणि खंडांमध्ये संपर्क यंत्रणा प्रस्थापित करतात. जगभरात अशा ४२८ केबल असून त्यांची लांबी तब्बल ११ लाख किलोमीटर आहे. या केबल संपूर्ण पृथ्वीभोवती समुद्र तळातून एकप्रकारे गुंडाळल्या सारख्या आहेत.

मुख्य केबलच्या आत फायबर ऑप्टीक्स केबल असतात. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा लहरींच्या स्वरूपात जगभर प्रवास करत असतात.

या अत्यंत महत्त्वाच्या केबलवर तंत्रज्ञान आणि जगाच्या संपर्क यंत्रणेचा मोठा भार असला तरी त्या अत्यंत नाजूक केबल्स आहेत.

फायबर ऑप्टीक्स केबलवर स्टील केबलचं आणि नंतर प्लास्टीक केबलचं आवरण आहे. पण, बहुतांश केबल्सची जाडी ही फक्त ३ सेंटीमिटरच आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे तसंच जहाजांच्या अँकरमुळे देखील या केबल्सचं नुकसान होऊ शकतं. इजिप्तजवळच्या पोर्ट ऑफ अलेक्सझांड्रीयामध्ये असा प्रकार पूर्वी घडला आहे. ज्यामुळे युरोप, अफ्रिका आणि आशियामधल्या संपर्क यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्या होत्या.

नेमकी भीती कसली?

बीबीसीचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ जोनाथन बिअल यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "समुद्र तळावर पसरलेल्या या महत्त्वाच्या केबल एकतर रशियाकडून कापल्या जाऊ शकतात किंवा नष्ट केल्या जाऊ शकतात."

Image copyright OLGA MALTSEVA/AFP/Getty Images

"रशियाचं अत्याधुनिक नौदल आणि मुख्यत्वे त्यांच्या पाणबुड्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ते माहितीच्या महाजालावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असल्याचं युकेच्या संरक्षण विभागानं आणि गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे."

यासाठी रशियाच्या पाणबुड्या या नॉर्थ अॅटलांटीक परिसरात आणि विशेषतः G I UK भागात म्हणजेच ग्रीनलँड, आईसलँड आणि युनायटेड किंग्डम या देशांच्या भूभागांच्या मध्यभागी असलेल्या समुद्रात गस्त घालत आहेत. तसंच त्यांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत.

या भागात पाणबुड्या, युद्धनौका आणि विमानांच्या माध्यमातून ब्रिटन तसंच नाटो राष्ट्र सतत गस्त घालण्यात कमी पडत असल्याचं सर स्टुअर्ट पीच यांनी सांगितलं.

Image copyright EPA

"आम्ही आमच्या लष्करी साधनसामुग्रीत वाढ करत आहोत. कारण, इथली परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे." असं नाटो राष्ट्रांच्या लष्करी दलांचे माजी प्रमुख अॅडमिरल जेम्स जी स्टॅविरिड्स यांनी सांगितलं आहे.

केबल कापल्या तर काय होईल?

माहितीच्या महाजालाला धोका पोहचवण्याचा रशियाचा उद्देश तसा नवा नाही. असं रशियाच्या युद्धानितीचे अभ्यासक आणि चॅटम हाऊस थिंक टँकचे सदस्य केअर गाईल्स यांचं म्हणणं आहे.

"या केबल्स कापल्यामुळे होणारं नुकसान रशियाला देखील होणार आहे. पण, यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी रशिया प्रयत्न देखील करत आहे. पण, असं झाल्यास त्यामुळे होणारं नुकसान हे खूप मोठं असणार आहे." असं गाईल्स म्हणाले.

गाईल्स यांनी पुढे सांगितलं की, "असा प्रकार घडल्यानंतर कोणाला फेसबुकवर लॉग-इन सुद्धा करता येणार नाही. मात्र, फेसबुकवर लॉग-इन न करता येणं ही यामधली खूपच छोटी बाब आहे. पण, मोठे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचं भवितव्य या केबल्सवर अवलंबून आहे. त्यामुळे त्या तुटल्या तर होणारं आर्थिक नुकसान मोठं असेल."

Image copyright Getty Images

गाईल्स यांनी रशियाच्या याबाबतच्या तयारीबद्दल बोलताना सांगितलं की, "रशिया स्वतःला या धोक्यातून वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. रशिया या व्यवस्थेला समांतर व्यवस्था उभी करू पाहत आहे. तसंच ही यंत्रणा पूर्णतः ठप्प झाल्यास रशियावर त्याचा काय परिणाम होईल याचाही अभ्यास त्यांच्याकडून सुरू आहे."

फक्त रशियाच नाही तर इतर देशांना देखील या केबल्समध्ये विशेष रस आहे. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेनं या केबल्ससोबत एक वेगळी यंत्रणा जोडली होती. ज्याद्वारे अमेरिकेनं रशियाच्या लष्करी सज्जतेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

यातून रशिया काय साध्य करणार?

माहितीच्या महाजालावर नियंत्रण मिळवण्याचा यामागे रशियाचा मुख्य हेतू आहे. नागरी संपर्क यंत्रणा कमकुवत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचं गाईल्स यांना वाटतं.

गाईल्स यांनी सांगितलं की, "रशिया जमिनीवर काय करतो आहे हे आपल्याला उपग्रहांमार्फत दिसतं. मात्र, त्यांचं समुद्राच्या तळाशी काय चाललं आहे हे आपल्याला कळत नाही. क्रिमिआतील अनुभवातून रशियानं एक गोष्ट आत्मसात केली आहे. संपर्क यंत्रणा काबीज करायची असेल तर महागड्या सायबर यंत्रणेची आवश्यकता नाही. किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचीही आवश्यकता नाही."

ते पुढे म्हणाले की, "टेलिकम्युनिकेशन यंत्रणा आणि त्याची संसाधनं जर ताब्यात घेतली किंवा त्याचंच नुकसान केलं तर संपर्क यंत्रणेवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. हे रशियाला कळून चुकलं आहे."

"रशियाचं सध्या चौफेर लक्ष आहे. अमेरिका आणि पूर्व युरोपातल्या राष्ट्रांशी पुढेमागे मतभेद झाले तर रशिया या नव्या युद्धपद्धतीचा वापर करू शकते," अशी भीतीही गाईल्स यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)