सर्व्हे : पंचविशीतील तरुण कंडोम वापरायचं का टाळताहेत?

कंडोम

सेक्स करताना अनेक तरुण कंडोम वापरण्याचं टाळतात. आम्हाला ते आवडत नाही, असं ते म्हणतात पण त्यामुळं इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

तरुणांमध्ये लैंगिक आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी ब्रिटनच्या आरोग्य विभागानं एक नवी मोहीम सुरू केली आहे. 25 वर्षांच्या तरुण-तरुणींनी शरीर संबंधांवेळी कंडोम वापरावेत यासाठी ब्रिटनमध्ये जोरात प्रचार सुरू आहे.

सेक्सबद्दल बोलायचं टाळणं किंवा त्याच्या जागरुकतेबाबत चर्चा टाळणं हे फक्त विकसनशील देशामध्येच होतं असं नाही. तर प्रगत देशामध्येही दिसून येत असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. म्हणून तर लैंगिक आरोग्य हा विषय केंद्रस्थानी ठेऊन राबवण्यात आलेली ही गेल्या आठ वर्षांमधली पहिली सरकारी मोहीम आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि YouGov यांनी संयुक्तरित्या केलेल्या एका सर्वेक्षणात एक धक्कादायक बाब समोर आली.

16 ते 24 या वयोगटातील 50 टक्के तरुणांनी नव्या जोडीदारांसोबत शारीरिक संबंधांदरम्यान एकदाही कंडोम वापरलं नाही, असं निरीक्षण या सर्व्हेत मांडण्यात आलं आहे.

फोटो कॅप्शन,

दारूच्या नशेत मला कंडोम वापरायचं लक्षातच राहात नाही, असं जॉर्डन म्हणतो.

या सर्व्हेतील 10 पैकी एका व्यक्तीनं एकदाही कंडोम वापरलं नसल्याचं म्हटलं आहे. तरुणांच्या या सवयींमुळं लैंगिक आजारांचा (सेक्शुअल ट्रांसमिटेड इन्फेक्शन-STI) धोका वाढला असल्याचं म्हटलं आहे.

STI मुळं वंधत्वाचं प्रमाण वाढत आहे, इंद्रियांची जळजळ होणं, वृषणांवर सूज येण्याच्या केसेस डॉक्टरांकडं येत असल्याचं म्हटलं आहे.

फोटो कॅप्शन,

लीडिया म्हणते, दारुच्या नशेमुळे सुरक्षित संबंधांबाबत खबरदारी पाळणं शक्य होतंच असं नाही.

या सर्व्हेमध्ये 16 ते 24 वयोगटादरम्यान असलेल्या 2000 तरुण-तरुणींनी सहभाग घेतला.

तुम्ही कंडोम का वापरत नाही? असं विचारलं असता तरुणांनी एक कारण प्रामुख्यानं दिलं. कंडोम वापरल्यामुळं सेक्स करतानाचा आनंद कमी होतो असं उत्तर बहुतेकांनी दिलं.

व्रेक्सहॅममध्ये राहणाऱ्या जॉर्डनचं म्हणणं आहे की, तो बऱ्याचदा कंडोमचा वापर करतच नाही. नव्या जोडीदारासोबतही त्यानं कंडोम वापरलं नसल्याचं बीबीसी न्यूजबीटला सांगितलं. "दारूच्या नशेत मला काँडम वापरायचं लक्षातच राहात नाही," असं त्यानं सांगितलं.

दारूच्या नशेत असल्यामुळे नवीन जोडीदारासोबत कंडोम न वापरल्याची कबुली या निम्म्या जणांनी दिली आहे.

जॉर्डनची प्रेयसी म्हणते, "जेव्हा तिनं मद्यपान केलेलं नसतं तेव्हा ती खूप काळजी घेते. पण आम्ही जेव्हा कंडोम न वापरता सेक्स करतो तो अनुभव अधिक चांगला असतो."

फोटो कॅप्शन,

एली म्हणते, गर्भधारणा झाली तर त्याची जबाबदारी मुलाची, तशी लैंगिक आजार झाला तरी पुरुषानं जबाबदारी स्वीकारायला हवी.

अर्थात या गोष्टीमुळे अपराधीपणाची भावना निर्माण झाली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यानंतर त्या दोघांनीही लैंगिक रोगाची तपासणी करण्यासाठी क्लिनिककडे धाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

इतर गर्भनिरोधक साधनांच्या वापरामुळे देखील कंडोमचा वापर कमी होत असल्याचं म्हटलं जात आहे.

"माझा ज्या पुरुषांशी संबंध आला आहे, त्यांना आजार होण्यापेक्षा मी गरोदर राहीन की काय, अशी भीती अधिक वाटत होती," अशी कबुली 20 वर्षांच्या एली या विद्यार्थिनीनं दिली आहे.

"या संबंधातून बाळ झालं तर ती त्यांची जबाबदारी असते. तसं लैंगिक आजार झाला तर ती देखील आपली जबाबदारी आहे हे समजून घेऊन पुरुषांनी वागायला हवं," अशी एलीची अपेक्षा आहे.

"जर एखादी मुलगी गर्भनिरोधक गोळ्या खात असेल तर कंडोम वापरण्याची गरज काय?" असं जॉर्डन म्हणतो.

फोटो कॅप्शन,

जेस्से यानं बीबीसी न्यूजबीटशी बोलताना कंडोम न वापरल्यानं त्रास झाल्याचं कबूल केलं.

पण ही बाब दिसते तितकी सोपी नाही. तज्ज्ञ म्हणतात, 2016 मध्ये 16 ते 24 वयोगटादरम्यान असलेल्या किमान 1 लाख 40 हजार जणांना गनोरिया आणि क्लेमेडिया सारखे रोग झाल्याचं एका अहवालात समोर आलं आहे.

जेस्से या 24 वर्षांच्या युवकानं आपली व्यथा बीबीसी न्यूजबीटला सांगितली. तो म्हणतो, "मी कंडोम वापरत नसल्यामुळं मला हे दोन्ही रोग झाले होते. या रोगांमुळं मला खूप त्रास सहन करावा लागला. लघवीच्या वेळी मला खूप जळजळ होत असे."

फोटो कॅप्शन,

STI टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे कंडोम वापरणं, असं डॉक्टर सारा कायत सांगतात.

"अजून एक गोष्ट मला करावी लागली ती म्हणजे मला माझ्या जोडीदारांना याबाबत सांगावं लागलं. त्यावेळी मला खरंच अवघडल्यासारखं झालं. मला वाटलं की जर हे रोग मला झाले असतील तर त्यांना देखील याचा धोका आहे. म्हणून त्यांना हे सांगण आवश्यक होतं," असं तो म्हणतो.

"क्लेमेडियासारख्या रोगांची लक्षणं तर कळत देखील नाहीत. मला त्या रोगांची लक्षणं जाणवली पण अनेक जण असे आहेत त्यांना तर रोग झाला आहे हे देखील लक्षात येत नाही," असं जेस्से म्हणतो.

"यापुढं, मी कुण्या नव्या जोडीदारासोबत सेक्स केलं तर मी नक्की कंडोमचा वापर करणार," असं जेस्से म्हणतो.

ही समस्या आणखी बिकट झाली आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कारण गनोरिया रोगावर आता प्रतिजैविकांची (अॅंटीबायोटिक्स) ची मात्रा लागू होत नसल्याचं अलीकडच्या काळात लक्षात आलं आहे. भविष्यात हा रोग असाध्य होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

"STI टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे कंडोम वापरणं," असं डॉक्टर सारा कायत यांचं म्हणणं आहे.

"अनेक रोगांची लक्षणं दिसत नाही ही फार भयंकर बाब आहे. अशा रोगांमुळं वंधत्व येतं, कंडोम वापरा आणि धोका टाळा असं मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगते," असं सारा म्हणतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)