चीनमध्ये लोकवर्गणीतून मृत्यूचा खेळ?

स्टंट करणारे वू याँगनिंग Image copyright WEIBO

चीनमध्ये सध्य एका 'रुफटॉपर'च्या मृत्यूचा मुद्दा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. या मृत्यूमुळे चीनमधल्या सोशल मीडिया साईट्स वादाच्या भौऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या थेट लाईव्ह व्हीडिओ प्रक्षेपण सुविधेला मृत्यूचा सापळा बोललं जात आहे.

एखादी गगनचुंबी इमारत कोणत्याही आधार आणि दोराविना चढणं हे साहस चीनच्या वू याँगनिंग यांच्यासाठी नित्याची बाब. केवळ चढणंच नव्हे तर इमारतीच्या टोकाला केवळ बोटांच्या आधारे लोंबकळून स्वतःच चित्रीकरण करण्यातही वू याँगनिंग आघाडीवर असायचे. मात्र, हेच साहस करताना ६२व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला.

अनेक दिवसांपासून वू यांच्या या स्टंटचे व्हीडिओ सोशल मीडियावर न आल्यानं त्यांच्या हजारो चाहत्यांनी चिंता व्यक्त केली.

कारण, वू याँगनिंग हे नियमित Huoshan आणि Kuaishou या वेबसाईटवर आपल्या साहसाचे व्हीडिओ टाकत असत. मात्र, त्यांचे व्हीडिओ येणं बंद झालं होतं.

अखेर चीनमध्ये 'रूफटॉपर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या वू याँगनिंग यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला प्रथम त्यांच्या मैत्रिणीनं आणि नंतर तिथल्या स्थानिक प्रशासनानं दुजोरा दिला.

चांगशा शहरातल्या एका इमारतीवर चढण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल गेल्याचा व्हीडिओ या आठवड्यात सोशल मीडिया व्हायरल झाला. त्यांच्या अखेरच्या प्रयत्नाचा हा व्हीडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

याँगनिंग यांच्या मृत्यूनंतर इंटरनेटवरील 'कॅश फॉर क्लिप्स'ची काळी बाजू समोर आली आहे. पैसे देऊन असे थरारक व्हीडिओ बघण्याची लोकांची बळावलेली वृत्ती याँगनिंग यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचीही आता चर्चा होऊ लागली आहे.

याची कारणं वू याँगिनंग यांनी आतापर्यंत प्रसारित केलेल्या व्हीडिओंच्या आकडेवारीत लपली आहेत. याचा शोध बिजींग न्यूज या वृत्तवाहिनीनं घेतला. Huoshan या वेबसाईटवर वू यांनी ५०० हून अधिक स्टंटचे व्हीडिओ थेट प्रक्षेपित केले होते.

त्यांचे व्हीडिओ त्यांच्या लाखो चाहत्यांनी पाहिले आहेत. हे व्हीडिओ पाहण्यासाठी वेबसाईटवर या चाहत्यांनी पैसेही भरले होते. एवढ्या व्हीडिओंचे मिळून त्यांना ५ लाख ५० हजार युआन म्हणजेच ५३ लाख ३२ हजार ७५० रुपये मिळाले होते.

यंदाच्या जून महिन्यात Huoshan वेबसाईटनं त्यांचे व्हीडिओं प्रमोट केले होते. चीनमधील राष्ट्रीय माध्यमांमध्ये या घटनेचे त्यानंतर तीव्र पडसादही उमटले.

"मृत्यूच्या जवळ जाऊन स्टंट करून त्याचं थेट प्रक्षेपण करायचं आणि वेबसाईटसारख्या मध्यस्थ संस्था त्यावरून पैसे मिळवणार; हे चुकीचं आहे. त्यामुळे मृत्यूभूमी आणि वेबासाईटमध्ये फरक तो काय?" अशी चर्चा द पेपर नावाच्या एका वृत्तपत्रातल्या लेखात करण्यात आली आहे.

Image copyright HUOSHAN.COM

"नफ्याच्या प्रयत्नात अशा वेबसाईट समाजात आपण घातक संदेश पोहोचवत असल्याचे विसरत आहेत." असं चीनमधील वृत्तवाहिनी सी सी टीव्हीनं आपल्या वृत्तात सांगितलं.

मात्र, वू याँगनिंग यांना स्टंट करण्यासाठी प्रोत्साहीत केल्याच्या वृत्ताला Huoshan वेबसाईटनं नकार दिला. त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, "आम्ही एखाद्या खेळाडू किंवा अॅथलिटला नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. कारण, त्यांना त्यांची कला दाखवण्याची संधी त्यामुळे मिळते. आम्ही स्टंट करण्यासाठी कुणाला सांगत नाही तसंच कोणता करारही केलेला नाही."

तसंच अशा व्हीडिओंचं प्रसारण करणाऱ्या Kuaishou या वेबसाईटनं देखील वू यांच्यासोबत कोणताही करार न केल्याचं जाहीर केलं आहे. या दोन्ही वेबसाईटवर वू यांचे व्हीडिओ थेट प्रक्षेपित केल्याचं बीबीसीनं तपासलं आहे.

'मृत्यूसाठी लोकवर्गणी'

वू याँगनिंग यांच्या मृत्यूला केवळ वेबसाईट्सचा पुढाकारच नव्हे तर त्यांच्या थेट प्रक्षेपित झालेल्या व्हीडिओंचे प्रेक्षकही जबाबदार आहेत. केवळ चीनच नव्हे तर असं प्रोत्साहन मिळाल्यानं जगभरात अनेकांनी इमारतींवरून लोंबकळण्याचे स्टंटं केले आहेत.

गेल्या वर्षी रशियातही काही 'रुफटॉपर्सनी' असे स्टंट करून आपला जीव गमवला आहे. परंतु, चीनमधली ही समस्या वेगळी आहे, कारण यामागे मोठी आर्थिक गणितं आहेत. असे थेट व्हीडिओ प्रक्षेपित करणारे त्यांच्या प्रेक्षकांकडून ऑनलाईन वर्गणी घेतात.

चीनमधल्या अनेक वेबसाईट प्रेक्षकांना वर्चुअल गिफ्ट पाठवण्याची विनंती करतात, नंतर ज्याचं रुपांतर रोख पैशांमध्ये करून घेता येतं.

द पेपर वृत्तापत्रातल्या लेखात 'हा विकत घेतलेला मृत्यू' असा उल्लेख घेण्यात आला आहे. तर, एका वृत्तवाहिनीवर बोलताना या विषयीचे अभ्यासक झिन्हू म्हणाले, "ज्यांनी-ज्यांनी पैसे भरून वू यांचा व्हीडिओ पाहिला आहे, त्यांनी लोकवर्गणीतून हा मृत्यू पुरस्कृत केला आहे."

प्रतिमा मथळा चीनमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वेबसाईटवरील दृश्य

तर, विबो नेटवर्कवरच्या एका मायक्रोब्लॉगरनं सांगितलं की, "व्हीडिओ बघून वू यांना प्रोत्साहीत करणं. म्हणजे एखाद्याला स्वतःच्या आत्महत्येसाठी चाकू खरेदी करण्यास प्रोत्साहीत केल्यासारखं आहे. असे व्हीडिओ लाईक आणि क्लिक करू नका एवढंच आपण केलं पाहिजे."

वाईल्ड वेस्ट

चीनमध्ये सध्या इंटरनेट व्हीडिओ उद्योग जगतात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत आहेत. १० लाखांहून अधिक नागरिक असे व्हीडिओ चीनमध्ये थेट प्रक्षेपित करतात. तर ७० कोटींहून अधिक जण हे व्हीडिओ थेट पाहत असतात.

इंटरनेटवरच्या बंधनांसाठी चीन कुप्रसिद्ध देश असला तरी या थेट प्रक्षेपित होणाऱ्या व्हीडिओंवर मात्र त्यांचं कोणतंही बंधन नाही. त्यामुळेच अनिर्बंध अशा या वृत्तीला वाईल्ड वेस्ट असंही संबोधलं जात आहे.

समाजाचं लक्ष वेधून घेण्यासाठी लोक अनेक प्रकारची जोखीम उचलताना दिसतात. जीवंत गोल्डफिश खाणे, नग्नावस्थेत नृत्य करणे, इमारतीवर लोंबकळणे असे अनेक प्रकार लोक करताना दिसतात. आणि असे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारीत करणाऱ्यांना Huoshan वेबसाईटनं कोट्यवधी रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं.

प्रतिमा मथळा चीनमध्य सरकारनं अनेक थेट प्रक्षेपित करणाऱ्या व्हीडिओंवर सरकारनं बंदी घातली आहे.

या उद्योगाला लगाम लावण्यासाठी गेल्या वर्षी सरकारनं आक्षेपार्ह व्हीडिओ प्रसारीत करण्यावर बंदी घातली होती. तसंच वेबसाईट्सना असे व्हीडिओ न दाखवण्यासाठी सरकारनं सूचितही केलं होतं.

मात्र, वू यांच्या मृत्यूनंतर सरकारचे हे प्रयत्न तोकडे पडत असल्याचं बोललं जात आहे. चीनमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या द पीपल्स डेली या वृत्तपत्रानं जीव घेणारे हे व्हीडिओ थांबवले पाहिजेत असं स्पष्टपणे म्हटलं आहे.

( या वृत्तासाठी अधिक माहिती वै झोऊ यांनी दिली आहे.)

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)