येमेनच्या आखाड्यात सौदी-इराणचा संघर्ष

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : येमेनमधला संघर्ष निर्माण करतंय मानवी संकट

सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधवर रॉकेट हल्ला केल्याचा दावा मंगळवारी येमेनच्या हौदी बंडखोरांनी केला आहे.

सौदी अरेबियानं सुद्धा त्यांच्याकडे येणार एक क्षेपणास्त्र रोखल्याची बाब स्वीकारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून येमेनमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धातलं हे एक महत्त्वाचे वळण आहे.

हल्ल्याची पार्श्वभूमी

मध्य पूर्वेतल्या सर्वांत गरीब देशांत येमेनचा समावेश होतो. सत्तेसाठी सुरू असलेल्या संघर्षात इथल्या सशस्त्र गटांनी एक-एक करून आपले मित्र बदलले. यामुळे मग कथित जिहादी संघटनांना येमेनमध्ये पाय पसरण्यास संधी मिळाली.

2015 सालापासून येमेनमध्ये लढा देत असलेल्या फौजांमध्ये एकीकडे राष्ट्रपती अब्द रब्बू मंसूर हादी यांची सेना आहे. तर दुसरीकडे हौदी बंडखोर आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या गटांचा समावेश आहे.

राष्ट्रपती अब्द रब्बू मंसूर हादी यांच्या सत्तेला आंतरराष्ट्रीय समर्थन आहे. सौदीच्या नेतृत्वाखाली एक आंतरराष्ट्रीय आघाडीवरची सेना हौदी बंडखोरांशी तिथं लढा देत आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

हौदी बंडखोर सरकार समर्थित सुरक्षा दलासोबत संघर्ष करत आहेत.

इराणकडून हौदी बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवली जात आहे, असं सौदी नेतृत्वाला वाटतं.

याच आठवड्यात माजी राष्ट्रपती अली अब्दुल्ला सालेह यांनी सौदी आघाडीसोबत चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सालेह हौदी बंडखोरांच्या बरोबर लढत होते आणि येमेनचा संघर्ष सुरू करणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा समावेश केला जातो.

पण सोमवारी एका भीषण लढाईत सालेह यांचा मृत्यू झाला आणि चर्चेच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला. सालेह यांचा मृत्यू त्याच हौदी बंडखोरांशी लढताना झाला ज्यांच्या साहाय्यानं ते लढत होते.

हौदी बंडखोर सालेह यांच्याकडे धोकेबाज (गद्दार) म्हणून बघायला लागले होते.

संघर्षाची सुरूवात

येमेनच्या संघर्षाची पाळंमुळं 2011 साली झालेल्या अरब क्रांतीमध्ये असलेली दिसून येतात.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

मागील आठवड्यातील संघर्षामुळे सना शहरात 100हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

याच अरब क्रांतीच्या लाटेत तत्कालीन राष्ट्रपती अली अब्दुल्ला सालेह यांना सत्ता सोडावी लागली आणि उपराष्ट्रपती अब्द रब्बू मंसूर हादी यांच्या हाती सत्तेची कमान आली.

सत्तेतल्या बदलामुळे येमेनमध्ये राजकीय स्थिरता वाढीस लागेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही.

यासोबतच येमेनमध्ये एक संघर्ष सुरू झाला. ज्यात एकीकडे माजी राष्ट्रपती सालेह यांची फौज होती, तर दुसरीकडे सध्याचे राष्ट्रपती हादी यांची फौज. हौदी बंडखोरांनीही मग एका गटाद्वारे या संघर्षात भाग घेता.

येमेनवर 30 वर्षं राज्य करणाऱ्या सालेह यांनी राष्ट्रपती हादी यांची सत्ता उलथवण्यासाठी हौदी बंडखोरांशी हातमिळवणी केली.

2014 पासून सालेह यांची फौज आणि हौदी बंडखोरांचं येमेनची राजधानी सनावर नियंत्रण होतं.

पण, यावर्षी डिसेंबरच्या सुरूवातीला या आघाडीत फूट पडली आणि याचं पर्यावसन सालेह यांच्या मृत्यूत झालं.

हौदींची ताकद

हौदी बंडखोर हे येमेनमधील अल्पसंख्याक शिया झैदी मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करतात.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

हौदी बंडखोरांनी सना येथील सालेह यांच्या घरावर हल्ला केला.

2000 साली हौदी बंडखोरांनी तत्कालीन राष्ट्रपती सालेह यांच्या फौजेविरोधात अनेक लढाया केल्या. पण यातला बहुतेक संघर्ष उत्तर येमेनचा मागास भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या सादाच्या सीमेपर्यंतच मर्यादित राहिला.

पण हौदी यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलेल्या सालेह यांची साथ मिळाली, तेव्हा 2014च्या सप्टेंबर महिन्यात सनावर त्यांनी नियंत्रण मिळवलं.

तिथून मग त्यांनी येमेनमधलं दुसरं मोठं आणि महत्त्वाचं शहर आदेनकडे कूच केली.

हौदी बंडखोरांच्या वाढत्या प्रभावामुळे 2015 साली सौदी अरेबियाने हादी सरकारला ताकद पुरवण्यासाठी सैनिकी कारवाई सुरू केली.

हौदी बंडखोरांना शियाबहुल इराणचा पाठिंबा मिळतो, असं सौदी अरेबियाला वाटतं. इराणचे सौदीसोबतचे संबंध तणावाचे राहिले आहेत.

हौदी बंडखोरांना पाठिंबा दिल्याचा आरोप सौदी सरकार इराणवर करतं. तसंच अरब देशांत प्रभाव वाढण्यासाठी इराण असं करत असल्याचं सौदीचं म्हणणं आहे. येमेनची सर्वाधिक सीमा सौदी अरेबियाला लागून आहे.

सौदीचे साथीदार

येमेनमधल्या हौदी बंडखोरांना हरवणं हे सौदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या फौजेचं ध्येय आहे. त्यांच्या फौजांमध्ये जास्त करून अरब जगातल्या सुन्नी बहुल देशांचा भरणा आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

हौदी बंडखोरांना रोखण्यासाठी सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी बनवली आहे.

यात कतार, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, बाहरीन, इजिप्सत आणि जॉर्डन यांचा समावेश आहे. याशिवाय मोरोक्को, सुदान आणि सेनेगल देशाच्या फौजांचा सुद्धा या संयुक्त फौजांमध्ये समावेश आहे.

यातले काही देश फक्त हवाई हल्ल्यात भाग घेतात, तर काही देशांनी जमिनीवर लढण्यासाठी फौज पाठवली आहे.

सौदी अरेबियाच्या नेतृत्वातल्या आंतरराष्ट्रीय आघाडीच्या या फौजेला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांसकडून सुद्धा मदत मिळत आहे.

येमेनमधल्या अल-कायदा आणि कथित इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर अमेरिकेनं नियमितपणे हल्ले केले आहेत.

यावर्षीच्या सुरूवातीला येमेनमध्ये फौजेची एक तुकडी तैनात केल्याची कबुली अमेरिकेनं दिली होती.

असं असलं तरी, इराण मात्र हौदी बंडखोरांना मदत करण्याच्या आरोपांचा इन्कार करत आहे. पण इराणमधून येमेनला पुरवण्यात येणारा शस्त्रसाठा दोन महिन्यांत तीनदा पकडण्यात आल्याचं अमेरिकेच्या फौजेनं 2016 साली सांगितलं होतं.

हौदी बंडखोरांना मदत करण्यासाठी इराणनं सैनिकी सल्लागार पाठवले असंही काही अहवाल सांगतात.

आतापर्यंत काय घडलं?

2015 सालच्या जानेवारीपर्यंत हौदी बंडखोरांनी सनावरील नियंत्रण अधिकच मजबूत केलं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

येमेनची राजधानी सना सप्टेंबर 2014 पासून हौदी बंडखोरांच्या ताब्यात आहे.

त्यांनी राष्ट्रपती भवन आणि इतर प्रमुख केंद्रांवर नाकाबंदी केली. परिस्थिती अशी झाली की, राष्ट्रपती हादी त्यांच्या निवासस्थानी नरजकैद झाले. एका महिन्यानंतर राष्ट्रपती हादी आदेनला पळून गेले.

हौदी आणि सालेह यांची फौज मात्र संपूर्ण देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती.

2015 साली हादी येमेन सोडून गेले. दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी येमेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण त्याचा काहीही ठास परिणाम झालेला दिसत नाही.

गेल्या काही महिन्यांत हादी यांच्या फौजेनं हौदी बंडखोर आणि सुन्नी फुटारवाद्यांना आदेनमध्ये घुसण्यापासून रोखलं आहे.

ऑगस्ट महिन्यात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालच्या फौजांनी आदेनवर नियंत्रण मिळवलं आणि त्यासोबतच येमेनच्या दक्षिण प्रांतातल्या हौदी बंडखोरांना हुसकावून लावलं.

दरम्यान अल्-कायदाच्या कट्टरवाद्यांनी येमेनमधल्या संघर्षमय परिस्थितीचा फायदा घेतला. त्यांनीही हादी यांच्या फौजेविरोधात हल्ले करण्यास सुरूवात केली.

हौदी बंडखोरांचं सना आणि दक्षिणेकडच्या ताईज शहरावरचं नियंत्रण कायम आहे. तिथून ते सौदी अरेबियाच्या सीमेवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत.

हौदी आणि सालेह यांचे संबंध का बिघडले ?

हौदी बंडखोर आणि सालेह समर्थकांमधले संबंध बिघडत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर येत होतं. सनामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हिंसक घटना घडल्या होत्या.

फोटो स्रोत, AFP

सालेह 2 डिसंबरला टीव्हीवर दिसून आले. दोन्ही गटांत चर्चा करण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी आपण इच्छुक आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं.

सालेह यांच्या प्रस्तावाकडे सौदीकडून सकारात्मक नरजेनं पाहण्यात आलं. पण, हौदी बंडखोरांना मात्र सालेह यांची ही भूमिका पटली नाही. आणि त्यांनी सालेह यांच्यावर दगाबाजीचा ठपका ठेवला.

तसंच सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात लढण्याचा हौदी बंडखोरांनी निर्णय घेतला.

"यात काहीही हैराण करण्यासारखं नाही. सालेह यांचा इतिहास पाहता तिथले नेते स्व:हितासाठी केव्हाही आपली भूमिका बदलू शकतात," असं बीबीसीच्या अरबी सेवांचे पत्रकार एडगार्ड जल्लाड सांगतात.

"सुरुवातीला हौदी बंडखोर आणि सालेह यांची आघाडी नाजूक स्थितीत होती. येमेन कधी काळी सौदीचा मित्रही राहिलेला आहे, ही बाब इथं ध्यानात घेण्यासारखी आहे,"

फोटो स्रोत, EPA

सालेह यांच्या मृत्यूनंतर या क्षेत्रातला तणाव अधिकच वाढेल आणि संघर्षाचं हे संकट संपवणं अधिकच अवघड होईल, असं जाणकारांचं मत आहे.

या संघर्षामुळे सर्वात जास्त नुकसान नागरिकांचं झालं आहे. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात 8600 लोकांनी जीव गमावला आहे.

हे वाचलं का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)