पिट बुल पाळताय? सावधान! व्हर्जिनियात कुत्र्यांनी घेतला मालकिणीचा जीव

बैथनी स्टीफन्सचा तिच्या कुत्र्यासोबतचा फोटो Image copyright CBS
प्रतिमा मथळा बैथनी स्टीफन्सचा तिच्या कुत्र्यासोबतचा फोटो

व्हर्जिनियामध्ये दोन पाळीव कुत्र्यांनी त्यांच्या मालकिणीवर हल्ला करून तिला ठार केले आहे. हे दोन्ही कुत्रे पिट बूल जातीचे होते. पिट बूल जातीचे श्वान आक्रमक आणि रागीट स्वभावाचे मानली जातात.

महाराष्ट्रातही या जातीचे श्वान पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पिट बूलसारखी आक्रमक स्वभावाची कुत्री पाळताना जास्त काळजी घ्यावी लागते, असं मत श्वानप्रेमींनी व्यक्त केलं आहे.

चार दिवसांपूर्वी बेथनी स्टीफन्स (22) ही तरुणी तिच्या 2 कुत्र्यांना घेऊन फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी सुरुवातीला या घटनेची माहिती जाहीर केली नव्हती. पण या घटनेच्या अनुषंगाने अफवा उठू लागल्याने, पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

गुचलँड काउंटीचे शेरीफ जिम अॅग्नीव म्हणाले, "हे कुत्रे या तरुणीच्या शरीराचे लचके तोडत होते. असं दिसत की, या कुत्र्यांनी आधी तिला खाली पाडलं. त्यात ती बेशुद्ध पडली असावी. त्यानंतर या कुत्र्यांनी तिला फाडून काढलं. या तरुणीच्या गळ्यावर खोलवर जखमा झालेल्या आहेत," असं त्यांनी सांगितले.

या तरुणीच्या कुटुंबीयांच्या परवानगीने या कुत्र्यांना ठार करण्यात आलं आहे. या कुत्र्यांचं वजन 45 किलो इतकं होतं. ही कुत्री बेथनीच्या वडिलांच्या घरी ठेवण्यात आली होती. या कुत्री लहान असल्यापासून तिनं सांभाळली होती. ज्या कुत्र्यांनी लहानपणापासून संभाळलं आहे, ते मालकावर कसा हल्ला करू शकतात, असा प्रश्न बैथनीच्या मित्रांनी उपस्थित केला आहे

पिट बुल तापट असतात का?

कोल्हापुरातले डॉग ट्रेनर बाजीराव पाटील म्हणाले, "या जातीची कुत्री तापट असतात, यात काही शंका नाही. पण याचा अर्थ पिट बुल म्हणजे हल्ला करणारा कुत्रा असं मात्र नाही. मुळात कुत्रा आपण कसा सांभाळतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे."

अशा जातीच्या कुत्र्यांना ते लहान म्हणजे अगदी 2 महिन्यांचे असल्यापासूनच प्रशिक्षण द्यावं लागते, म्हणजे त्यांना नियंत्रणात ठेवता येतं. कुत्रा पाळताना फॅशन म्हणून पाळू नये. कुत्र्यांना स्वतः वेळ द्यावा लागतो, असंही ते म्हणाले.

"सातत्यानं बांधून ठेवणं, पिंजऱ्यात ठेवणं, माणसांच्या सहवासात न ठेवणं अशांमुळे ही कुत्री अधिकच तापट होतात", असं त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आणि विशेष करून कोल्हापुरात पिट बुल पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असं त्यांनी सांगितले.

पिट बुलनी केलेल्या हल्ल्यांची संख्या जास्त आहे, असं श्वान प्रशिक्षक वीरधवल पाटोळे यांनी सांगितले. ते म्हणाले, "पिट बुल म्हणजे तो हल्ला करणारच असं नसतं. भटकी कुत्रीही हल्ला केल्याची उदाहरणं आहेतच".

"पिट बुलसारख्या कुत्र्यांची शक्ती जास्त असते, त्यामुळे त्यांचा हल्ला गंभीर रूप घेऊ शकतो," असं पाटोळे म्हणाले.

पिट बुलसारखे काही श्वान नैसर्गिकपणेच अधिक तापट असतात, त्यामुळे ते संतापले तर त्यांचावर नियंत्रण ठेवणं कठीण असतं, असं त्यांनी सांगितलं.

"कुत्रा हल्ला करण्यामागे कारणं असतात, असं ते म्हणतात. कुत्रा आजारी असेल, उपाशी असेल किंवा काही कारणांनी त्याला चिथावणी दिली तर तो हल्ला करतो. पिट बुलसारखे श्वान एकलकोंडे होणार नाहीत, याची दक्षता घेणं आवश्यक आहे", असं ते म्हणाले.

तसंच या कुत्र्यांच्या अंगातील उर्जा खर्च होण्यासाठी त्यांना भरपूर व्यायाम होणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)