गर्भधारणेनंतर 24 वर्षांनी बाळाचा जन्म : गोठवलेल्या भ्रूणापासून अपत्यप्राप्ती

इम्मा Image copyright NATIONAL EMBRYO DONATION CENTER
प्रतिमा मथळा नोव्हेंबर महिन्यात इम्माचा जन्म झाला. हे भ्रूण 24 वर्षांपूर्वी गोठवण्यात आलं होतं.

अमेरिकेत 24 वर्षांपूर्वी गोठवण्यात आलेल्या भ्रूणापासून (Embryo) मुलीचा जन्म झाला आहे. In Vitro Fertilisation (IVF)च्या शोधानंतर गर्भधारणा आणि प्रत्यक्ष बाळाचा जन्म यामधील हा कदाचित सर्वाधिक कालावधी असेल.

अमेरिकेतील एका कुटुंबाने 1992 ला गर्भदान केलं होतं. त्या गोठवलेल्या गर्भापासून 24 वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला आहे.

मार्च महिन्यात हा गर्भ टिना गिब्सन या तरुणीच्या गर्भाशयात सोडण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात टिना यांनी मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव इम्मा असं ठेवण्यात आलं आहे. या मुलीची प्रकृती उत्तम आहे. गंमत म्हणजे जेव्हा हे गर्भदान करण्यात आलं तेव्हा टिना यांचं वय फक्त 1 वर्ष होतं.

टिना यांचं वय सध्या 26 आहे. टिना म्हणाल्या, "जागतिक रेकॉर्डचं काही माहीत नाही. पण मला फक्त मूलं हवं होतं."

नॅशनल एंब्रियो डोनेशन सेंटर यांनी हे भ्रूण उपलब्ध करून दिलं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भ्रूण गोठवून ठेवता येतात. म्हणून अशा भ्रूणांना 'स्नो बेबीज' असं म्हटलं जातं.

ज्या जोडप्यांना आणखी मुलं नको आहेत, ज्यांना मुलं झाली आहेत, अशा जोडप्यांना ही संस्था भ्रूणदान करण्यासाठी प्रेरित करत असते. जेणे करून इतर दांपत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकेल.

टिना यांचे पती गिब्सन यांना वंध्यत्वाची समस्या आहे, म्हणून त्यांनी या संस्थेशी संपर्क साधला होता.

या भ्रूणाची धारणा ऑक्टोबर 1992मध्ये झाली होती. तर टीना यांचा जन्म हे भ्रूण अस्तित्वात यायच्या दीड वर्ष आधीचा आहे. हे भ्रूण आतापर्यंत सर्वाधिक काळ गोठवून ठेवण्यात आलेलं भ्रूण ठरलं आहे.

गिब्सन यांनी इम्मा म्हणजे त्यांच्यासाठी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे.

टिना आणि गिब्सन यांचा या मुलीशी जैविकरित्या कोणाताही संबंध नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)