पाहा फोटो : त्यांनी टिपलं, त्यांनी जिंकलं!

टेनिस,
फोटो कॅप्शन,

टेनिसपटू अमांडा अनिसिमोव्हा

फोरहँडचा फटका कसा मारावा याचा हा डेमो म्हणता येईल, असा हा फोटो टिपला आहे अल बेलो यांनी. अनेक वर्षे खेळांचं वृत्तांकन केल्यामुळे नक्की काय टिपायचं याची चोख जाण अल बेलो यांना आहे. टेनिस प्रशिक्षणादरम्यान फोरहँडचा फटका कसा मारावा हे शिकवलं जातं. हा फोटो समोर ठेवला तर प्रशिक्षकांना वेगळं काही सांगण्याची गरजच भासणार नाही. मियामी ओपन स्पर्धेदरम्यान अमांडा अनिसिमोव्हा टेलर टाऊनसेंडविरुद्ध फोरहँडचा फटका खेळताना.

फोटो कॅप्शन,

लिओनार्ल्डो डि कॅप्रियो आणि इमा स्टोन ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान

ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी व्यासपीठामागे केवळ तीनच फोटोग्राफर्सना उपस्थित राहण्याची परवानगी असते. ख्रिस्तोफर पोक हे या तीन भाग्यवंतांपैकी एक.

म्हणूनच लिओनार्डो डी कॅप्रियो आणि इमाा स्टोन यांच्यातले ऋणानुबंध लेन्सद्वारे चित्रित करण्याची संधी पोक यांच्यासमोर होती. त्यांनी या संधीचं सोनं केलं. इमा यांना या सोहळ्यात ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कृष्णधवल फोटोमुळे जुन्या 50च्या दशकातला ऑस्कर सोहळ्याचा अनुभव हा फोटो देतो.

फोटो कॅप्शन,

रोहिंग्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

रोहिंग्यांच्या प्रश्नानं किती गंभीर रुप धारण केलं आहे, याचा प्रत्यय देणारा हा फोटो. बांगलादेशातल्या कॉक्स बाजारमध्ये अन्नधान्याचं वितरण करणाऱ्या ट्रकवर उडालेली झुंबड जगण्याचं प्रखर वास्तव स्पष्ट करते.

भुकेसारख्या मूलभूत गोष्टीसाठी संघर्ष कराव्या लागणाऱ्या लहान मुलाच्या डोळ्यातला अश्रूचा ओघळ आपल्या मनाचा ठाव घेतो. आजूबाजूची गर्दी अशीच समदु:खी. त्या गर्दीतून वाट काढत जेवण मिळवण्यासाठीची धडपड आपल्याला अस्वस्थ करून सोडते. केव्हिन फ्रायर यांचा हा फोटो रोहिंग्या प्रश्नामुळे चिघळलेल्या परिस्थितीचं द्योतक आहे.

फोटो कॅप्शन,

ऑस्ट्रेलियातल्या प्रसिद्ध बोंडी समुद्रकिनाऱ्यावरचं हे दृश्य.

निसर्गाची मुक्त उधळण म्हणजे काय याचा प्रत्यय देणारा फोटो. निसर्गाच्या कॅनव्हासवरचं शुभ्रधवल लाटांचं नर्तन, समुद्राचं स्फटिकासारखं निळंशार पाणी आपल्याला मोहात पाडतं. त्याचवेळी माणूस निसर्गासमोर किती लहान आहे हे सिद्ध करणारा फोटो. लाटेवर स्वार होऊन सर्फिंग करणारा क्रीडापटू पडतो तो क्षण रायन पीअर्स यांनी अचूकपणे टिपला आहे.

फोटो कॅप्शन,

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातील आंदोलक.

क्रौर्य या शब्दाचा परिणाम जागवणारा फोटो टिपला आहे चिप सोमोडव्हिला यांनी. अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात आंदोलक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. बेसबॉल बॅटनं एकमेकांना फोडून काढण्याचा प्रकार सुरू असताना जीव धोक्यात घालून चिप यांनी हा फोटो टिपला आहे.

फोटो कॅप्शन,

आइस हॉकी सामन्यादरम्यानचं दृश्य.

न्यू जर्सीत झालेल्या पिट्सबर्ग पेंग्विन्स संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पॅट्रीक हॉर्नक्विस्टने न्यू जर्सी डेव्हिल्स संघाविरुद्ध गोल केला तो क्षण. गोल अर्थात अचूक लक्ष्यभेद टिपण्याची ब्रुस बेनेट यांची हातोटी प्रतीत होते. टेलिव्हिजन प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही असा क्षण ब्रुस यांनी गोल पोस्टमध्ये रिमोट कॅमेरा बसवून हा फोटो काढला.

फोटो कॅप्शन,

मँचेस्टर दुर्घटनेनंतर आयोजित कॉन्सर्ट.

इंग्लंडला यंदा मँचेस्टर दुर्घटनेनं हादरवलं. या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी वन लव्ह मँचेस्टर कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर केवळ केव्हिन माझूर या फोटोग्राफरला अनुमती होती.

अॅरियना ग्रांडे या गायिकेला सादरीकरणादरम्यान अश्रू आवरता आले नाहीत. अन्य फोटोग्राफर्सकडे अॅरियनाची पाठ आहे. केवळ केव्हिनलाच अॅरियनाला भावुक करणारा क्षण टिपता आला.

फोटो कॅप्शन,

नववधू सेल्फी

एखादं पोट्रेट वाटावं इतका जिवंत फोटो. फिलीपाईन्समधल्या मारावी या शहरातल्या केटी मलांग मिकायुंग या नववधूचा घरच्यांबरोबरचा हा फोटो. मे महिन्यापासून कथित इस्लामिक स्टेटच्या कट्टरवाद्यांनी या शहराचा ताबा मिळवला होता. मुक्तपणा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची भावना तंतोतंत चितारणारा हा फोटो जेस अझनर यांनी टिपला आहे.

फोटो कॅप्शन,

अमेरिकेत झालेल्या अंदाधुंद गोळीबारावेळी जीव वाचवण्यासाठी पळणारे नागरिक

डेव्हिड बेकर यांच्याकडे रुट 91 हार्वेस्ट कंट्री म्युझिक फेस्टिव्हलचे फोटो काढण्याची जबाबदारी होती. मात्र त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि मूळ काम बाजूला ठेवलं. अंदाधुंद गोळीबारापासून वाचण्यासाठी जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या नागरिकांचा फोटो डेव्हिड यांनी जीव धोक्यात घालून टिपला. फोटोतून डेव्हिड घटनास्थळापासून किती जवळ आहेत याचा अंदाज येऊ शकतो.

फोटो कॅप्शन,

कान्स फेस्टिव्हिलदरम्यान गायक रिहाना अवतरली तो क्षण.

कान्स फेस्टिव्हलदरम्यान गायिका रिहाना हजर झाली तो क्षण टिपला आहे त्रिस्टान फूविंग्ज यांनी. हा क्षण असंख्य फोटोग्राफर्सनी टिपला. पण रेड कार्पेटवर आलेला प्रकाश आणि रिहानाची नजर यांचा मिलाफ झाला तो हा क्षण.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)