व्यक्तिमत्व विकास : मोहक व्यक्तिमत्त्व कसं विकसित कराल?

  • टिफनी वेन
  • बीबीसी
जॉर्ज क्लुनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

विश्वास निर्माण करण्यासाठी हावभाव महत्त्वाचे असतात.

अनेकदा असं होतं की, एखादी व्यक्ती अनोळखी चेहऱ्यांनी भरलेल्या एखाद्या हॉलमध्ये येते. पण तिथून जाताना 10 नवे मित्र जोडून, दुसऱ्या दिवशीची एखादी लंच डेट पक्की करूनच तिथून बाहेर पडते. व्यावसायिक जगतातल्या आतल्या गोटातल्या व्यक्तींशी ओळखी वाढवण्याचं आश्वासनही त्या एका समारंभात त्या व्यक्तीनं मिळवलेलं असतं.

मोहक व्यक्तिमत्वाच्या काही नशिबवान व्यक्तींना हे सहज जमतं, पण इतर अनेकांना यासाठी फार परिश्रम करावे लागतात. अर्थात लोकांचं मन जिंकणं ही कला जरी असली तरी, यामागे एक शास्त्रही आहे.

खरं तर आपण लोकांवर कसा प्रभाव टाकतो, याची सुरुवात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याच्या आधीच झालेली असते. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला भेटताना लोक त्याच्या दिसण्यावरून त्याच्याबद्दलचं मत तयार करत असतात.

प्रिन्सटनमधील मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक अलेक्झांडर टोड्रोव्ह यांनी दाखवून दिलं आहे की, एखाद्या व्यक्तीकडे एक दशांश सेकंद इतका कमी वेळ पाहूनही लोक ती व्यक्ती किती आवडण्यासारखी आहे, विश्वासार्ह आहे, सक्षम आहे याबद्दल आपलं मत तयार करत असतात.

एखाद्या व्यक्तीच्या स्वभावातला दरारा व्यक्तीच्या शारीरिक ठेवणीवर अवलंबून असू शकतो, त्याचप्रमाणे विश्वासार्हता आणि आकर्षकपणा हे बहुतांशी चेहऱ्याच्या हावभावावर अवलंबून असतात, असं टोड्रोव्ह म्हणतात.

या संपूर्ण विषयावर त्यांनी त्यांच्या 'Face Value: The Irresistible Influence of First Impressions' या पुस्तकात सविस्तर विवेचन केलं आहे.

एखाद्या व्यक्तीबद्दल अशा पद्धतीने गडबडीत अंदाज बांधणं योग्य नाही, हे माहीत असलं तरी आपण हे सातत्यानं आणि नकळतपणे करत असतो. पण याचे काही गंभीर परिणाम असू शकतात का? उदाहरणार्थ, तुम्ही कोणाला मत द्यायचं यावर याचा काही प्रभाव पडतो का?

एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की चेहऱ्याच्या हावभावावरून अमेरिकेच्या निवडणुकांच्या निकालांचा अंदाज करता येऊ शकतो. तसंच चेहऱ्याच्या हावभावांचा सक्षमतेशी काय संबंध आहे याचा अभ्यास करून बल्गेरिया, फ्रान्स, मेक्सिको आणि ब्राझीलमधील निवडणुकांच्या निकालांचा अंदाज करता येईल, असाही एका अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

एखाद्याच्या चेहऱ्यावरून आपण जे अंदाज बांधतो, त्याचा प्रभाव आपल्या आर्थिक निर्णयांवरसुद्धा होत असतो.

चेहरा हसरा ठेवा

चेहऱ्याची ठेवण काही बदलता येत नाही. पण आपलं हास्यानं चेहऱ्यावरचे हावभाव मात्र बदलणं शक्य आहे. टोड्रोव्ह यांनी डेटावर आधारित मॉडेलच्या साहायाने अल्गोरिदम बनवले आहेत. त्यावरून चेहरा अधिक विश्वासार्ह कसा बनवता येईल, याची मांडणी केली आहे.

टोड्रोव्ह यांच्या मते, चेहरा हसरा ठेवल्यानं व्यक्ती अधिक विश्वासार्ह बनते. टोड्रोव्ह म्हणतात, "हसरा चेहरा अधिक विश्वासार्ह आणि समाजशील मानला जातो."

सुरुवातीलाच आपली छाप वाईट पडली, असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यात बदल होण्याचीसुद्धा संधी असते.

ज्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत, त्यांच्याबद्दल जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्यांच्यावर चांगला प्रभाव पाडू शकतो. आपण जर एखाद्या व्यक्तीला प्रभावित करू शकलात तर त्यांचं पहिल्या भेटीत तुमच्याविषयी बनलेलं मत बदलू शकतं, असं टोड्रोव्ह म्हणतात.

'The Charisma Myth' या पुस्तकाच्या लेखिका ओलिव्हिया फॉक्स केबेन यांनी मोहकतेची व्याख्या 'आवडणारे' आणि एखाद्याशी संवाद साधायला किती छान वाटतं, यावरून केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

एक स्मित खूप काही करू शकतं.

ज्या व्यक्ती इतरांना आवडतात त्या व्यवसायातही यशस्वी होतात. उत्तम सामाजिक कौशल्य असणाऱ्या व्यक्ती अधिक यशस्वी होताना दिसतात. हे कर्मचाऱ्यांबद्दलही खरं ठरतं.

सिअॅटल युनिव्हर्सिटीमधील व्यवस्थापन विषयाच्या प्रा. सुझेन जॅन्साज म्हणतात, "व्यवस्थापनातील जुनी आणि श्रेणीबद्ध व्यवस्था जवळपास संपुष्टात आली असल्याने, व्यक्ती-व्यक्तीतील संबंधांच्या कौशल्यांना मोठं महत्त्व आलं आहे. टीममध्ये काम करणं आणि हे करत असताना तुम्ही पदाधिकारी असलात काय किंवा तुमच्याकडे कोणतं पद नसतानाही इतरांना प्रभावित करण्याचे कौशल्य आवश्यक आहे."

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या मोहकतेसाठी तुम्ही स्वतःला प्रशिक्षितही करू शकता.

मानसशास्त्रज्ञ आणि एफबीआयचे निवृत्त अधिकारी जॅक शेफर यांनी 'Like Switch' हे पुस्तक लिहिलं आहे. ते यासाठी जॉनी कार्सन यांचं उदाहरण देतात. कार्सन हे 'द टूनाईट शो'चे अँकर होते. पण विशेष म्हणजे त्यांचा मूळचा स्वभाव मितभाषी होता. स्वतःला समाजाभिमुख करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं.

भुवया उंचावणे

मोहकतेसाठी आपण अजून काय केलं पाहिजे?

शेफर म्हणतात, "मोहकतेची सुरुवात अगदी भुवयांच्या साध्या हालचालींनी होते. चांगली सुरुवात केल्यानंतर तुम्ही मोहकतेच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाता. यावेळी स्वतःबद्दल न बोलता दुसऱ्याबद्दल बोला."

मैत्री करण्याचा सोनेरी नियम म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल चांगलं वाटू दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांना आवडू लागता.

"पण हे करत असताना ते काय सांगत आहेत, यात तुम्ही मनापासून रस घेतला पाहिजे," असं केबेन सांगतात.

"आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा अधिकाधिक जाणून घेतो तसतशी ती माणसं अधिकाधिक लोभस वाटू लागतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात आपण मनापासून रस घेऊ लागतो," असं त्या म्हणतात.

"आपल्याला एखाद्याच्या संवादात रस आहे हे दाखवण्यासाठी त्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवली पाहिजे," असं त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात रस घ्या.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांशी संबंध जोडणारं एखादं विधान करणंही महत्त्वाचं असतं," असे शेफर म्हणतात.

"मला लिफ्टमध्ये एक मुलगा दिसला, तो आनंदी दिसत होता. त्याला मी विचारले, फार आनंदी दिसतोस. त्याने सांगितलं तो गेले काही दिवस ज्या परीक्षेची तयारी करत होता त्यात त्याला यश मिळालं. त्याने त्याच्या तयारीविषयी माहिती दिली. एकूण संभाषणात त्याला स्वतःबद्दल छान वाटत होतं."

"तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत असता त्या व्यक्तीविषयी तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुम्ही अधिक प्रभावी ठरू शकता," असं ते म्हणतात.

थेट स्तुती करण्यापेक्षा लोकांना स्वतःची स्तुती करण्याची संधी द्या, असं ते म्हणतात. समजा जर मला तुमचं वय कळलं तर मी म्हणेन तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी बीबीसीसाठी लिहिता? इतक्या कमी वयात फार कमी व्यक्तींना अशी संधी मिळते. मी जर असं म्हटलं तर तुम्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या पाठ थोपटून घेण्याची संधी मिळते.

"नेटवर्किंगच्या परिस्थितीत अनेकांना भीती वाटते. पण अशावेळी समोरच्या व्यक्तीशी त्याच्याशी संबंधित विषयांवर बोलू शकता. उदाहरणार्थ तुमच्याबद्दल मी हे चांगलं ऐकलं. मला ऐकूण आनंद झाला, असं तुम्ही म्हणू शकता," असं जान्साज सुचवतात.

समानता शोधा

मतभिन्नता जरी असली तरी समानता शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं त्या म्हणतात. लोकांना मोहित करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण ज्यांच्याशी चर्चा करतो त्यांच्याशी चर्चेसाठी समान दुवा शोधणं.

जेव्हा तुम्हाला त्यांचं मत पटत नाही, तेव्हा प्रत्युत्तर देण्याची तयारी न करता समोरची व्यक्ती काय बोलते आहे, याकडे लक्ष द्या. म्हणजे जरी तुम्हाला त्याचं बहुतांश मत पटलं नाही तरी काही मुद्द्यांवर किमान तत्त्वतः तरी तुमचं मतैक्य होऊ शकतं, असं शेफर म्हणतात.

शेफर सांगतात, "सर्वसाधारण व्यक्तींना रस असलेल्या गोष्टींबद्दल माहिती ठेवणं आवश्यक आहे. तसंच समान धागा शोधणंही महत्त्वाचं असतं."

देहबोलीवर लक्ष ठेवा

शेफर म्हणतात, "इतरांना आपण आवडण्यासाठी त्या व्यक्तीची देहबोली तुमच्यात परावर्तित झाली पाहिजे."

"जेव्हा आपण संवाद साधत असतो, तेव्हा एकमेकांची देहबोली परावर्तित करत असतो. यातून आपल्यातील रॅपो दिसून येतो. हीच क्लृप्ती आपण वापरू शकतो," असं ते सांगतात.

समजा तुम्ही तुमची जागा बदललीत आणि समोरच्या व्यक्तीनं जर जागा बदलली तर समजा ट्युनिंग जमतं आहे.

शेफर यांनी 'हान्सेल आणि ग्रेटेल' तंत्रही सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

भुवयांची सूचक हालचाल उपयुक्त ठरते.

मोहक व्यक्तिमत्व कसं विकसित कराल?

ते म्हणतात, "आपण संवाद साधताना एक चूक करतो. आपण स्वतःबद्दल जास्त बोलतो. त्यापेक्षा आपण स्वतःबद्दल थोडी थोडी माहिती देणं जास्त योग्य ठरतं. यातून तुमच्याविषयीची उत्सुकताही टिकून राहते. आणि नाती जिवंत राहतात."

अंदाजाच्या स्वरूपाची प्रश्न उपयुक्त ठरतात. समजा जर आपण विचारले तुमचं वय 25 किंवा 30 वाटतं. तर समोरची व्यक्ती आपलं वय 25 आहे की 30 ते सांगेल किंवा त्यात दुरुस्ती करून स्वतःचं वय किती ते सांगेल. सर्वसाधारणपणे आपण आपल्या आयुष्याची खासगी माहिती दिली तर समोरची व्यक्तीही तशीच माहिती देत असते.

शेफर म्हणतात, "संशोधनातून असं दिसून आलं आहे की एखादी व्यक्ती त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जितकं लवकर बोलेल तितकं तुमच्यातील नातं पुढे सरकतं."

"यात कशातही यश आलं नाही तरी एखाद्या व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवणं सुद्धा फायद्याचं ठरतं," असं ते सांगतात.

त्यांनी त्यांच्या पुस्तकात एफबीआयच्या कोठडीत असलेल्या एका परदेशी गुप्तहेराची माहिती दिली आहे. शेफर त्याच्या कोठडीत बसून सुरुवातीला फक्त वृत्तपत्र वाचत बसत. नंतर या गुप्तहेराची भीती मोडली, त्यातून उत्सुकता निर्माण झाली आणि मग संवाद सुरू झाला. काही दिवसांनी शेफर यांना जी माहिती हवी होती, ती मिळाली.

तर, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अनोळखी चेहऱ्यांनी भरलेल्या हॉलमध्ये जाणार असाल तेव्हा थोडा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीबद्दल अधिकाधिक लोकांना जाणून घ्यावंसं वाटतं, अशी व्यक्ती तुम्हीच असाल.

हे वाचलं का?

हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)