चीनमधलं हे हॉस्पिटल पळवून लावेल 'माझ्या नवऱ्याची बायको'!

तरुण स्त्री Image copyright Alamy

चीनमध्ये एक नवीन उद्योग सध्या जोरात आहे. Mistress Dispelling असं त्याचं नाव आहे. त्याचा अर्थ नवऱ्याच्या प्रेमिकेला घालवणं असा होतो.

काळ्या रंगाचा ड्रेस आणि गॉगल घातलेली एक मध्यमवयीन बाई मंद उजेड असलेल्या एका कार्यालयात येते. तिला तिची ओळख लपवायची आहे. तर आपण तिला 'अबक' म्हणूया.

पण विकिंग लव हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनुभवांबदद्ल बोलण्यासाठी ती तयार आहे. नवऱ्याच्या प्रेमिकेला त्याच्यापासून दूर करणारं हे शांघायमधलं सगळ्यांत प्रसिद्ध हॉस्पिटल आहे.

अतिशय शांत आवाजात तिनं माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ती सांगत होती की आता आधीपेक्षा तिच्या नवऱ्याशी असलेले तिचे संबंध कसे आणखीच दृढ झाले आहेत. "मला आता छान वाटतं आहे, हे काहीतरी वेगळं आहे," ती अतिशय उत्साहात सांगत होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा या विकिंग लव हॉस्पिटलमध्ये लाखो ग्राहक आले आहेत.

तिनं काही आठवड्यांपूर्वीच विकिंग लव हॉस्पिटलमध्ये समुपदेशन घेतलं होतं. एक उत्तम, सकारात्मक आयुष्य जगणं तसंच एक उत्तम बायको होणं अशा अनेक गोष्टींसाठी तिनं मार्गदर्शन घेतलं होतं.

मिंग ली या विकिंग हॉस्पिटलच्या सहसंस्थापक आहेत. त्या स्त्रियांना यशस्वी लग्नाचं रहस्य, नवऱ्याचं लक्ष भरकटू न देणं अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन करतात. तसं तर अनेकदा लक्ष भरकटलेल्या महिलाच या हॉस्पिटलमध्ये समुपदेशनासाठी येतात हे उल्लेखनीय आहे.

आधीपेक्षा नाती दृढ

अबक सांगतात, "मला जेव्हा माझ्या नवऱ्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळलं तेव्हा मी त्याच्याशी भांडले. मी त्याला विचारलं, का? मी तुझ्यासोबत इतकी वर्षं घालवल्यानंतर सुद्धा तू असं का केलं? पहिल्यांदा त्याला अपराधी वाटलं. पण त्याला भांडणानंतर माझ्याशी बोलायचंच नव्हतं. मग मी मदत घेण्याचा निर्णय घेतला."

शेवटी तिनं नवऱ्याच्या आयुष्यात आलेल्या महिलेला घालवण्यासाठी पैसे मोजण्याचा निर्णय घेतला. आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसासोबत प्रेमप्रकरणं करण्यापेक्षा आयुष्यात चांगल्या गोष्टी करता येतात, हे तिला सांगण्यासाठी अबकनं या हॉस्पिटलची मदत घेतली. घटस्फोटाऐवजी या पर्यायाची निवड तिनं केली.

ती सांगते, "आम्ही दोघांनी खूप भोगलं. मला हिंमत हारायची नव्हती. वेगळं होण्याचा मी कधीही विचार केला नव्हता. मी आता पन्नास वर्षांची होते आहे. त्यामुळे लग्नाच्या बाजारात आता मला तशीही फारशी किंमत राहणार नाही."

मिंग ली आणि सहसंस्थापक शु झिन हे हॉस्पिटल गेल्या 17 वर्षांपासून चालवत आहेत. आतापर्यंत लाखो ग्राहकांनी त्यांच्याकडे सेवा घेतली आहे.

शु झिन सांगतात, "आमच्याकडे नवऱ्याच्या प्रेयसिला घालवण्याचे 33 उपाय आहेत. लग्नात अनेक प्रक्रारच्या समस्या असतात. विवाहबाह्य संबंध ही त्यातलीच एक महत्त्वाची समस्या आहे. हे अतिशय गंभीर आहे. हे कुटुंबासाठी आणि समाजासाठी घातक आहे."

Image copyright Alamy

झिन त्यांच्याकडे असलेल्या चार तंत्रांची माहिती देतात. पहिलं म्हणजे ते प्रेमप्रकरण करणाऱ्या मुलीला तिसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडायला सांगतात, नवऱ्याच्या बॉसला त्याला दुसऱ्या शहरात पाठवायला सांगतात, मित्रांना किंवा पालकांना हस्तक्षेप करायला सांगतात. तसंच नवऱ्याच्या वाईट चारित्र्याबद्दल सांगतात किंवा त्याला एखादा अनुवांशिक आजार असल्याचं सांगतात.

या चारच पद्धती आहेत. इतर 29 काय आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना विचारलं.

"आहेत, पण ते आमचं ट्रेड सिक्रेट आहे. आम्ही त्याच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये बोलू शकत नाही," ते सांगतात.

चीनी प्रसारमाध्यमांमध्ये या हॉस्पिटलमध्ये लाचखोरी आणि बळजबरीनं काम करून घेत असल्याचे आरोप होत आहेत. पण अशा कोणत्याही पद्धतींमध्ये ते अडकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

इतरही मार्गांचा अवलंब

डाय पेंग जून हे गृहस्थ सुद्धा अशीच एक गुप्तहेर संघटना शांघायमध्ये चालवतात. त्यांच्याकडे गुप्तहेरांची एक टीम आहे. जी तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीकडून नवऱ्याची मुक्तता करण्यासाठी मदत करते. त्यांना चीनमध्ये मिस्ट्रेस म्हणतात.

"आमच्याकडे एक अतिशय उत्तम मार्ग आहे. आम्ही त्यांच्याशी मैत्री करतो. त्यांची खासगी छायाचित्रं किंवा व्हीडिओ मागवतो आणि आमच्या ग्राहकांना देतो," डाय पेंग जून सांगतात.

प्रतिमा मथळा डाय हे मोहजाल टाकण्यात तज्ज्ञ आहेत.

वेगळ्या शब्दात सांगायचं तर हे एक प्रकारचं मोहजाल आहे. जेव्हा आम्ही नवऱ्याला सांगतो की त्याची प्रेयसी त्याच्याशी एकनिष्ठ नाही. तेव्हा तो तिला सोडतो आणि आपल्या कुटुंबाकडे परत येतो.

डाय सांगतात ही एक प्रकारची लोकसेवा आहे. कारण चीनमध्ये सगळ्या श्रीमंत पुरुषांचं प्रेमप्रकरण असतंच असं समजलं जातं.

माओ त्से तुंग यांच्या पुढाकारानं या परंपरेला बेकायदेशीर ठरवण्यात आलं होतं आणि विवाह कायद्यात स्त्रियांनासुद्धा समान हक्क मिळतील अशी तरतूद करण्यात आली होती. त्यांचं 1976 साली निधन झालं आणि त्यानंतर बाजारात तेजी आली. त्यामुळे श्रीमंत आणि शक्तिशाली चीनी पुरुष आणि पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पुन्हा जुन्या पद्धतीचा स्वीकार केला.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणात शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात ज्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, त्यांच्यापैकी 95 टक्के लोकांची प्रेयसी होती.

घटस्फोटित असणं लज्जास्पद

डाय यांनी मला त्यांच्या एका माणसाशी माझी भेट घालून दिली. त्याचं नावसुद्धा डाय आहे. ही व्यक्ती ज्या मुलीबरोबर प्रेमप्रकरण आहे तिला विविध आर्थिक आणि आकर्षक प्रलोभनं दाखवून उद्युक्त करण्याचं काम करतो. बहुतांशी वेळा ती प्रेयसी या प्रलोभनांना बळी पडते आणि मग ती डाय यांच्याबरोबर शारीरिक जवळीक करण्याससाठी तयार होते. त्यांचं काम झालं की ते हवे असलेले फोटो घेतात आणि निघून जातात.

प्रतिमा मथळा मांग ली या स्त्रियांना नवऱ्यांचं लक्ष भरकटू न देण्याचा सल्ला देतात.

ते सांगतात, "आम्ही योग्य ती काळजी घेतो. आम्ही जे मूळ जोडीदार आहे त्यांची काळजी घेतो. जे ग्राहक सांगतात तेच आम्ही करतो. पण प्रेमप्रकरण करणाऱ्या स्त्रिया त्यांची मर्यादा ओलांडतात."

हा सगळा प्रकार किती मोठ्या प्रमाणात पसरला आहे हे सांगणं कठीण आहे. पण, सतरा वर्षांत विकिंग कंपनीनं एक लाखापेक्षा अधिक केसेस हाताळल्या आहेत. ही कंपनी लवकरच शांघाय स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी करणार आहे.

लेखक आणि सामाजिक विषयाचे अभ्यासक झांग लिज्जा सांगतात की, ही संकल्पना चीनमधल्या घटस्फोटांच्या कायद्याचा आधार घेऊन सांगता येईल. ते म्हणतात की घटस्फोटाचे सगळे कायदे पुरुषांच्याच हिताचे आहेत आणि स्त्रीचं घटस्फोटित असणं हे लाजिरवाणं समजलं जातं.

विवाहबाह्य संबंध ट्युमरसारखे

अबक यांच्या म्हणण्यानुसार नवऱ्याच्या प्रेयसिला घालवणं हा एकच उपाय त्यांच्याकडे होता.

त्यांच त्यांच्या नवऱ्यावर अजूनही प्रेम आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना ती सांगते, "अर्थातच माझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्या अनेक गोष्टी मला आवडतात. लग्न कसं टिकवावं हे आता मला कळलं आहे."

"प्रेम प्रकरण करणारी मुलगी ही एखाद्या ट्युमरसारखी असते. या ट्युमरला लगेच काढून टाकायला पाहिजे. जेव्हा जोडीदारांमधलं नातं सक्षम होतं. तो क्षण म्हणजे गाडी चालवायला शिकण्यासारखा असतो आणि आम्ही त्यांना योग्य पद्धतीनं गाडी चालवायला शिकवतो," असं मिंग ली सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)