चेर्नोबेल : जगातल्या सगळ्यांत भयानक ठिकाणी सुटीसाठी जाल का?

  • इलान दत्ता विलियम्स
  • बीबीसी प्रतिनिधी, युक्रेन
चर्नोबिल
फोटो कॅप्शन,

प्रिपिएटची सध्याची स्थिती.

सुमारे 31 वर्षांपूर्वी झालेल्या अणुऊर्जा अपघातानंतर किरणोत्साराची भीती असल्यानं चेर्नोबिल शहर मनुष्यविरहित करण्यात आलं होतं. त्याच चेर्नोबिलला भेट देणाऱ्या आता पर्यटकांची संख्या वाढते आहे. काय आहेत त्याची कारणं?

एकेकाळी चेर्नोबिल हे नाव उच्चारण्याचं टाळलं जात होतं, त्याच्या आसपास जाण्याचाही विचार कोणी करत नव्हतं. पण गेल्या काही काळात जगभरातील साहसी, उत्साही पर्यटकांनी चेर्नोबिलकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यातल्या काहींनी तर स्थानिक सरकारी हॉस्टेलमध्ये राहण्याचं धाडसही केलं आहे.

युक्रेनची राजधानी असलेल्या क्यीवपासून दोन तासाच्या अंतरावर चेर्नोबिलमधलं 30 किमीचं प्रतिबंधित क्षेत्र आहे. ही पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा मानली जाते. तिथं किरणोत्साराची बाधा होण्याचा धोका असल्यानं लोकांना मर्यादित काळासाठीच थांबता येतं.

तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी विशेष परवानगीचे सोपस्कार तर पूर्ण करावेच लागतात. शिवाय, सोबत रेडिएशन मॉनिटर घेऊनच जाता येतं.

डिसेंबरमधला कडाक्याच्या थंडीचा काळ असूनही बरेच जण तिथं आमच्या आधीच पोहोचलेले होते.

सरकारी हॉस्टेल खुलं

दर दिवशी, बसमधून सकाळी इथं येणाऱ्यांना हा सगळा परिसर दाखवण्यासाठी खास गाईडही तयारच असतात.

फोटो कॅप्शन,

सरकारी हॉ़स्टेल

सन 2011मध्ये युक्रेनच्या सरकारनं चेर्नोबिल, प्रिपिएट ही दोन शहरं पर्यटकांसाठी खुली केली. गेल्या सहा वर्षांत आतापर्यंत हजारो पर्यटकांनी या भागाला भेट दिली आहे.

परदेशी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारनं याच भागात नवीन हॉस्टेल सुरू केलं. तिथं एका रात्रीसाठी 500 रुपये भरुन राहाता येतं.

96 खाटांच्या या हॉस्टेलची कमाई चांगली होते. कारण तिथं अमेरिका, ब्राझील, पोलंड, युके इथले पर्यटक येऊन मुक्काम करतात.

फोटो कॅप्शन,

हॉस्टेलमधल्या खोल्या

"पर्यटक इथे आले की, आम्ही त्यांना हॉस्टेलच्या बाहेर जास्त काळ राहणं धोक्याचं असल्याचं सांगतो," असं हॉस्टेलच्या मॅनेजर स्वेतलाना ग्रेत्सेन्को यांनी स्पष्ट केलं. त्यांनी आम्हाला हॉस्टेलमधल्या खोल्याही दाखवल्या. बहुतांश चर्नोबिल सोव्हिएत काळातच थांबलेलं आहे. पण हे नवीन हॉस्टेल मात्र वायफायसारख्या अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असल्याचं स्वेतलाना आवर्जून सांगतात.

चेर्नोबिलची भेट हा एक वेगळाच अनुभव आहे. तिथं आपण पू्र्ण काळ एकदम सावध असतो.

प्रत्येकलाच रेडिएशनच्या तपासणीतून जावं लागतं. लहान मुलांना इथं प्रवेश नाही. कोणत्या भागात जायचं याचे नियम एकदम कडक आहेत. कोणतीही वस्तू उचलण्यावर बंदी आहे.

कडक नियम

आमचा गाईड ओलेक्सांडर यानं आमच्याकडून सगळ्या नियमाचं पालन करण्याचा फॉर्म भरून घेतला. या प्रवासात काही खाणं तर सोडाच, पाणी पिण्यासही मज्जाव केला. धूम्रपानही करायचं नाही, कोणत्याही वस्तूला हातही लावायचा नाही, असं त्यानं आम्हाला सांगितलं.

फोटो कॅप्शन,

चेर्नोबिल, प्रिपिएट या दोन्ही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे.

या भागातून बाहेर पडताना रेडिएशनच्या चाचणीत जर आपले बूट पात्र ठरले नाहीत, तर ते इथंच सोडून द्यावे लागतील, असंही त्यानं आम्हाला सांगून टाकलं.

एवढ्या अटी असल्या तरीही पर्यटकांचा इथं येण्याचा उत्साह आटलेला नाही. किम हॅमविन आणि तिचा भाऊ रेयान हे दोघे ऑस्ट्रेलियातून इथं आले.

"माझ्या मित्रानं मला या जागेविषयी सांगितलं. मी त्यापूर्वी कधीच त्याविषयी ऐकलं नव्हतं. इथं यायलाच हवं होतं, "असं किम म्हणाली.

फोटो कॅप्शन,

चेर्नोबिलचं प्रवेशद्वार

चेर्नोबिलच्या प्रवेशद्वारापाशी किम हॅमविन आणि तिचा भाऊ रेयान यांनी फोटो काढला.

26 जून 1986ला काय घडलं?

प्रिपिएटमध्ये भडक, ताज्या रंगात रंगवलेली ती एकमेव पाटी वगळता बाकी सगळं जुनं, 26 एप्रिल 1986 रोजी मध्यरात्री नंतर जसं होतं, तसंच आहे. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट चारमध्ये स्फोट झाला. अणूभट्टी फुटली आणि किरणोत्साराचे ढग आसमंतात पसरले.

आठवडाभरात, कामगार आणि आप्तकालीन पथकातील कर्मचारी असे 30 जण किरणोत्साराची बाधा झाल्यानं दगावले. अख्खं प्रिपिएट हे शहर आणि आसपासचा परिसर मिळून सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.

फोटो कॅप्शन,

पाळणा 'त्या' दिवशी होता तसाच आहे.

विखुरलेल्या, होत्या तशाच सोडून दिलेल्या इमारती, बर्फानं झाकल्या गेलेल्या गाड्यांचे बम्पर, पिवळा रंग राखून असलेला आकाश पाळणा या सगळ्या खुणा पाहात आम्ही पुढे आलो. त्या सगळ्या प्रवासात, बालवाडीच्या वसतिगृहात एका गंजलेल्या बेडवर एक बाहुली तशीच पडलेली आहे, ते दृश्य हृदय पिळवटणारं होतं.

फोटो कॅप्शन,

हे दृश्य पाहून आपण मनातून हलतो.

सगळ्या नियमांचं पालन केलं तर हा भाग तितका धोकादायक राहिलेला नसल्याचं युक्रेन सरकारमधले पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे मंत्री ओस्ताप सिमिराक यांनी बीबीसीला सांगितलं. "काळजी घेतली नाही तर मात्र प्राणावर बेतेल", असंही ते सांगतात.

फोटो कॅप्शन,

अणुभट्टीवरचं आच्छादन

अणुभट्टीवर आच्छादन टाकण्याचं काम दहा हजार कामगार सलग चार वर्षं करत होते. त्यामुळे किरणोत्सार नियंत्रणात आणणं शक्य झालं. तेही कामगारांच्या सुरक्षेची सगळी खबरदारी घेऊन, असंही सिमिराक म्हणाले.

यूकेमधील इकॉलॉजी आणि हायड्रॉलॉजी केंद्राचे प्रोफेसर निक बेरेस्फोर्ड यांनीही तिथल्या धोक्याची पातळी नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं.

पर्यटक या भागात एक किंवा दोन दिवसच असतात. या काळात होणाऱ्या किरणोत्साराचं प्रमाण तुलनेनं कमी असतं. त्याच्यापेक्षा जास्त किरणोत्सार विमान प्रवासात असतो, असंही त्यांनी सांगितलं.

चेर्नोबिल सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रयत्न झाले. युरोपियन बँक ऑफ रिक्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हल्पमेंट आणि आंतरराष्ट्रीय दात्यांना दिलेल्या निधीतून इथं बरंच काम झालं. त्या प्रकल्पाच्या इमारतीवर टाकण्यात आलेल्या आच्छादनामुळे पुढील 100 वर्षं किरणोत्सार रोखला जाऊ शकतो.

त्या आच्छादनामुळे जुन्या बांधकामाचं आणखी नुकसान रोखलं जाऊ शकेल, असं ईबीआरडीच्या चेर्नोबिल मदत निधीचे प्रमुख सायमन इव्हान्स यांनी सांगितलं. अर्थात त्याच्यामुळे 30 किमी परिघातील किरणोत्सार कमी होईल, असा त्याचा अर्थ नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

फोटो कॅप्शन,

इव्हान सेमेन्यूक

किरणोत्साराच्या प्रभावाविषयी मतमतांतरे आहेत. 80 वर्षांचं इव्हान सेमेन्यूक हे या घटनेच्या दोन वर्षांनंतर त्यांच्या गावी परतले आणि तिथंच राहात आहेत. ते तिथेच शेती करतात आणि स्वत:पुरतं पिकवतात.

त्या भयानक दिवसाबद्दल सांगताना ते म्हणाले, "रात्री स्फोटाचा आवाज झाला. तसे आवाज नेहमीचेच असल्यानं आम्हाला वेगळं काही वाटलं नाही. आता ही जागा राहण्यास एकदम सुरक्षित आहे."

"पर्यटक इथं येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कोणतीही भीती बाळगू नका," असं ते आवर्जून सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)