स्पेन निवडणुकांमध्ये स्वतंत्र कॅटलोनियावादी पक्षांना बहुमत

स्पेन, कॅटलोनिया, युरोपियन युनियन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

स्वतंत्र कॅटलोनियाची मागणी करणारे पक्ष विजयाच्या मार्गावर आहेत.

स्पेनमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये स्वतंत्र कॅटलोनियाची मागणी करणारा पक्ष आघाडीवर आहे. या घडामोडीने स्पेन सरकारमध्ये आणि कॅटलोनियामध्ये त्यांच्या स्वायतत्तेचा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, कॅटलोनियाची अर्धस्वायत्तता त्यांना परत मिळावी आणि हा भाग स्पेनमध्येच असावा, या विचारांची सिटीझन्स पार्टी या निवडणुकीत सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

अशा समीकरणांमुळे आता कोणता पक्ष स्पेनमध्ये सरकार स्थापन करेल, हे स्पष्ट झालेलं नाही.

कॅटलोनिया प्रांताला स्वायतत्ता मिळावी की नाही, यासाठी ऑक्टोबर महिन्यात याच प्रदेशातल्या नागरिकांनी सार्वमत घेतलं होतं. कॅटलानचा दावा होता की 92 टक्के लोकांनी स्वातंत्र्य मिळण्याच्या बाजूने कौल दिला होता.

मात्र राजधानी माद्रिदने ही सार्वमत चाचणीच अवैध ठरवली होती. तसंच प्रशासनाने कॅटलोनियाची स्वायतत्ता रद्दबातल केली होती.

देशभरातली विविध ठिकाणची मतदान प्रक्रिया आटोपली असून, स्वतंत्र कॅटलोनियाच्या बाजूचे पक्ष मिळून सत्ता स्थापण्याची तयारी करत आहेत. Together for Catalonia' (JxCat), Republican Left of Catalonia (ERC) आणि Popular Unity (CUP) हे एकत्रित 70 जागा जिंकतील अशी शक्यता आहे. त्यामुळे बहुमत त्यांच्या बाजूने राहील.

स्वतंत्र कॅटलोनियाची मागणी रेटणाऱ्या पक्षांदरम्यान कॅटलोनिया प्रांताचे माजी अध्यक्ष कार्ल्स प्युजडिमाँ यांचा JxCat हा पक्ष मताधिक्यामध्ये ERCच्या पुढे आहे. ERC पक्षाचं नेतृत्व ओरिओल जुनक्युरस यांच्याकडे आहे.

फोटो स्रोत, AFP/getty images

फोटो कॅप्शन,

कार्ल्स प्युइगमाँइट कॅटलानचे अध्यक्ष आहेत.

"कॅटलान रिपब्लिकचा विजय झाला असून, स्पेनचा पराभव झाला आहे," अशा शब्दांत स्वयंघोषित विजनवासात असलेल्या प्युजडिमाँ यांनी ब्रसेल्समधून बोलताना सांगितलं. सुधारणा, बदल आणि परतफेडीची वेळ आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

प्युजडिमाँ हे स्वतंत्र कॅटलोनिया पुकारण्यात आलेल्या बंडामागचा चेहरा होते. स्पेनने त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला आहे.

जुनक्युरस यांच्यावरही अशाच स्वरूपाचे आरोप असून ते सध्या तुरुंगात आहेत.

सिटीझन्स (Cs) पक्षाला 25 टक्के मते मिळाली असून 135 सदस्यीय सभागृहात 37 जागा सिटीझन्स पक्षाकडे आहेत. पक्षप्रमुख इनेस अरिमादास यांनी बीबीसीला सांगितलं, "निवडणुकीत आम्ही विजयी ठरलो आहोत. पण युतीचं सरकार स्थापन करणं थोडं कठिण जाईल. पण आम्ही प्रयत्न करू."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अरिमादास सिटीझन्स पक्षाच्या प्रमुख आहेत.

कॅटलोनियाची स्वायतत्ता रद्दबातल ठरवणारे पंतप्रधान मारिआनो रहॉय यांना केवळ तीन जागा मिळतील, असा अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांना अकरा जागा मिळाल्या आहेत.

निवडणुकीत 80 टक्के मतदान झाले असून हा नवीन विक्रम आहे.

निवडणुका का झाल्या?

आधीच्या संसदेत स्वतंत्र कॅटलानची मागणी करणाऱ्या पक्षांचं प्राबल्य होतं. त्यांनीच 27 ऑक्टोबर रोजी कॅटलान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कॅटलान प्रांतात सार्वमत घेण्यात आलं होतं. मात्र स्पेननं ही सार्वमत चाचणी अवैध ठरवली होती.

सार्वमताची प्रक्रिया रोखण्यासाठी स्पेनच्या पोलिसांनी काही मतदान केंद्रांवर हल्ला केला होता. मात्र कॅटलान नागरिकांनी स्पेनच्या न्यायालय आणि पोलिसांची दंडेलशाही यांना न जुमानता मतदान केलं.

याची परिणती दोन गटांमधील संघर्षात झाली आणि हजारो नागरिक जखमी झाले. सार्वमतासाठी उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस आणि कॅटलान समर्थक यांच्यात झडप उडाल्याचे चित्र फुटेजद्वारे स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, Jeff J Mitchell/Getty images

फोटो कॅप्शन,

कॅटलान समर्थकांची संख्या वाढते आहे.

संयोजकांच्या मते 90 टक्क्यांहून अधिक कॅटलान जनतेने स्वायतत्तेच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र निम्म्यापेक्षा कमी लोकांनीच मतदान केल्याचं चित्र होतं.

झालं तेवढं पुरे झालं या भूमिकेपर्यंत आलेल्या प्युइगमाँट यांनी स्पेनपासून स्वतंत्र होत असल्याचं जाहीर केलं. परंतु पंतप्रधान राजोय यांनी कॅटलान सरकार बरखास्त केलं. कॅटलानमध्ये स्पेन सरकारची राजवट लागू केली आणि 21 डिसेंबरला निवडणुका घोषित केल्या.

स्वतंत्र कॅटलानची भूमिका घेणारे नेते स्पेनने देशद्रोही आणि बंडाला बळ ठरवले. प्युइगमाँट यांच्यासह अन्यचार नेते बेल्जियमला रवाना झाले. आरोप असलेल्यांपैकी कॅटलान स्वतंत्र होण्यासाठी उत्सुक दोन नेते तुरुंगात आहेत. सहा जणांना जामीन मिळाला आहे परंतु स्पेन सरकारची त्यांच्यावर करडी नजर आहे.

प्रतिक्रिया

गुरुवारी जाहीर होणाऱ्या निकालानंतरही कॅटलोनियाप्रती असलेली भूमिका कायम राहील, असं युरोपियन युनियनने स्पष्ट केलं.

"कॅटलोनिया संदर्भात घडणाऱ्या घडामोडी स्पेनचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्ही कॅटलोनियाबाबतची भूमिका काय असेल, हे आधीच स्पष्ट केलं आहे. यात बदल होणार नाही," असं EUचे कार्यकारी प्रमुख आणि प्रवक्ता अलेक्झांडर विंटरस्टेन यांनी स्पष्ट केलं.

"स्पेनमध्ये झालेल्या निवडणुकांबद्दल आम्ही काहीही भाष् करणार नाही," असंही युनियनने स्पष्ट केलं.

स्पेन सरकारने याविषयी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

आता पुढे काय?

स्वतंत्र कॅटलानला अनुकूल पक्षांना मिळालेल्या बहुमताने चेंडू स्पेन सरकारदिशेने गेला आहे. माद्रिद सरकारचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि फुटीरतावादी चळवळीचा जोर कमी होणार नाही', असं लंडनस्थित संशोधनसंस्था टेनेको इंटेलिजन्सचे अँटोनिओ बारेसो यांनी सांगितलं.

कॅटलानला स्वातंत्र्य का हवंय?

कॅटलोनिया हा स्पेनमधला सगळ्यात सधन आणि सुपीक असा प्रदेश आहे. कॅटलोनियाला हजार वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धापूर्वी कॅटलोनियाला मोठ्या प्रमाणावर स्वायतत्ता होती. हे स्वातंत्र्य जनरल फ्रान्सिस्को फ्रान्को यांच्या जुलमी राजवटीने हिरावून घेतलं.

फ्रान्को यांचं निधन झाल्यानंतर 1978 मध्ये कॅटलानला स्वायतत्ता बहाल करण्यात आली. लोकशाही प्रणाली अवलंबलेल्या स्पेनमध्ये कॅटलान प्रदेश आर्थिक, सामाजिकदृष्ट्या विकसित होत गेला.

2006 मध्ये कॅटलोनियाला आणखी अधिकार देण्यात आले. यामुळे कॅटलोनियाची आर्थिक ताकद वाढली. एखाद्या देशाप्रमाणे कॅटलोनियाचा उल्लेख करण्यात आला. चार वर्षांनंतर म्हणजे 2010 मध्ये स्पेनच्या संविधान न्यायालयाने हा निर्णय मागे घेतला.

फोटो स्रोत, Jeff J Mitchell

फोटो कॅप्शन,

स्पेनमध्ये निवणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

आर्थिक मंदी आणि नागरिकांवर सरकारतर्फे करण्यात येणारा खर्च कमी झाल्याने कॅटलानमध्ये असंतोष बळावला. यामुळे फुटीरतावादी चळवळीला खतपाणी मिळाले.

नोव्हेंबर 2014 मध्ये कॅटलानमध्ये सार्वमत घेण्यात आलं. ही प्रक्रिया स्पेन सरकारने बेकायदेशीर ठरवली. फुटीरतावादी गटाने 2015 निवडणुका जिंकल्या आणि त्यांनी पुन्हा सार्वमत घेतलं. 1 ऑक्टोबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या सार्वमतात 90 टक्क्यांपेक्षा जनतेने कॅटलान स्वतंत्र व्हावा अशी भूमिका घेतली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)