पाकिस्तानात कसा वाढतोय चीनचा प्रभाव?

  • उपासना भट
  • बीबीसी मॉनिटरिंग
चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांच्यासह पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

फोटो स्रोत, Getty Images

चीनची पाळंमुळं सध्या पाकिस्तानात अधिकाधिक घट्ट होत चालली आहेत. पाकिस्तानी माध्यमांमध्ये चीननं शिरकाव केला असून तिथल्या बातम्याच नव्हे तर मनोरंजन क्षेत्रातही चीन लक्षणीयरीत्या प्रभाव टाकत आहे.

'China Pakistan Economic Corridor' (CPEC) हा चीन आणि पाकिस्तानमध्ये होऊ घातलेला 62 अब्ज डॉलरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात संपूर्ण पाकिस्तानात महामार्ग बांधणी, ऊर्जा आणि औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.

पाकिस्तानात हा प्रकल्प उभारायला गेल्या काही वर्षांमध्ये बरेच चीनी नागरिक कामानिमित्त आले आहेत. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान आता केवळ पारंपरिक शेजारी न राहता आर्थिक संबंध घनिष्ठ करत आहेत.

आणि जसजशी चीनी नागरिकांची पाकिस्तानात लोकसंख्या वाढत आहे, तसतसा चीनी माध्यमांचा पाकिस्तानात सहभाग वाढीस लागला आहे.

पाकिस्तान त्यांच्या देशातली इमिग्रेशन माहिती देत नाही. पण एका वृत्तानुसार सध्या पाकिस्तानात जवळपास 4 लाख चीनी नागरिक आहेत. आणखी एका वृत्ताने याचं वर्णन 'चीनी क्रांती' असं केलं आहे.

'पाकिस्तानात चायनीज टीव्ही ड्रामा'

पाकिस्तानात चीनी माध्यमांच्या वाढत्या सहभागाचं सर्वांत ताजं उदाहरण म्हणजे 4 नोव्हेंबरपासून सुरू झालेला पहिला चीनी टीव्ही ड्रामा.

'Beijing Youth' नावाची ही 36 भागांची मालिका PTV Home वाहिनीवर उर्दू भाषेत दर शनिवारी प्रसारित होत आहे.

फोटो स्रोत, YOU TUBE

PTV Home ही पाकिस्तान सरकारच्या पाकिस्तान टेलिव्हीजन (PTV) मार्फत चालवली जाणारी मनोरंजन वाहिनी आहे, जसं एकेकाळी आपल्याकडे दूरदर्शनचं डीडी मेट्रो होतं, अगदी तसंच.

हा पाकिस्तानी टीव्हीवर पहिला असा प्रयोग नव्हे. Geo न्यूज वेबसाईटनुसार, यापूर्वीही चीनच्या Belt and Road प्रकल्पांतर्गत अनेक लघुपट आणि अॅनिमेटेड मालिकांचं चीनीमधून उर्दूत भाषांतर केलं गेलं आहे.

जाहिराती आणि सिनेमा

मनोरंजन क्षेत्राबरोबरच पाकिस्तानातल्या जाहिरात व्यवसायावरही चीनचा प्रभाव दिसून येतो.

उदाहरणार्थ, सुप्रसिद्ध मसाल्यांच्या एका जाहिरातीतलं हे एक दृश्य : एक चीनी जोडपं लाहोरला स्थायिक होतं. ते दोघंच आपल्या भाषेत बोलत नूडल्स खात असतात.

मग नवरा आपल्या बायकोला म्हणतो, "तू इथे काही मित्र-मैत्रिणी का बनवत नाहीस?" उदास होऊन त्याला म्हणते, "इतकं सोपं नाही इथं. आपलं अन्नही त्यांच्या पदार्थांसारखं नाही"

मग तिला एक कल्पना सुचते. ती पाकिस्तानातली सर्वप्रिय अशी मटण बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करते, आणि आपल्या शेजाऱ्यांची मनं जिंकते.

खाद्यपदार्थ किंवा खाद्यसंस्कृती माणसांना एकत्र आणते, हा विचार समोर ठेऊन बनवण्यात आलेल्या या जाहिरातीत इंग्रजी आणि उर्दूमध्ये सबटायटल्सही आहेत.

फोटो स्रोत, BBC MONITORING

त्याचबरोबर, एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या 'चले थे साथ' या पाकिस्तानी चित्रपटात एका चीनी तरुण आणि पाकिस्तानी तरुणीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

डिसेंबर 2016 पासून दोन्ही देशांनी मिळून FM98 'दोस्ती' हे रेडिओ चॅनलही सुरू केलं आहे. पूर्वी काही तासांसाठी सुरू असलेलं हे चॅनल आता 24 तास सुरू झालं आहे. आणि त्याता आता एक तासाचा 'चीन भाषा शिका' हा कार्यक्रमही प्रसारित करण्यात येतो.

चीनी भाषेतली वृत्तपत्रं

Huashang हे पाकिस्तानात चीनी भाषेतलं पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र आहे. इस्लामाबादमधून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राची एक इंग्रजी आवृत्तीही आहे.

या साप्ताहिकाच्या फेसबुक पेजनुसार चीनच्या Belt and Road कार्यक्रमांनंतर ते सुरू करण्यात आलं आहे. चीन आणि पाकिस्तानची व्यावसायिक भागीदारी आणखी दृढ व्हावी, यासाठी ते कार्य करत असल्याचं सांगतात.

दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या साप्ताहिकाच्या 10,000 प्रती चीनी आणि इंग्रजीत प्रकाशित होतात, आणि संपूर्ण पाकिस्तानात त्यांचे जवळजवळ 60,000 वाचक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

याचबरोबर पाकिस्तानी माध्यमं चीनच्या बातम्यांना अधिक जागा देत असून चीनी वृत्तपत्रांमधल्या बातम्या देखील पाकिस्तानी माध्यमांमध्ये अधिकाधिक वापरण्यात येत आहेत. आणि दोन्ही देशांच्या राजनैयिक संबंधांबाबतचे विशेष लेखही पाकिस्तानी माध्यमांमध्ये छापून येतात.

डिसेंबरच्या सुरुवातीला 'द न्यूज' या इंग्रजी वृत्तपत्रानं 32 पानी 'चायना डेली'चं 'Asia Weekly' मासिक पाकिस्तानी वाचकांसाठी प्रसिद्ध केलं होतं. तसंच उर्दू वृत्तपत्र उम्मतने लहान मुलांसाठी चीनी भाषेचे काही मूलभूत नियम दर रविवारी छापण्यास सुरुवात केली आहे.

'सांस्कृतिक घर्षण'

पण पाकिस्तानात सर्वच या "चीनी क्रांती" बद्दल उत्साही आहेत, असं नाही. काही स्थानिक माध्यमांनी, पाकिस्तानच्या संस्कृती आणि उद्योगांवर होणाऱ्या या सामाजिक आणि आर्थिक बदलाविषयी, चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानातल्या चीनच्या वाढत्या प्रभावामागे आर्थिक फायदा असल्याचं ओळखून इंग्रजी वृत्तपत्र 'Dawn'ने एक प्रश्न उपस्थित केला आहे - "संपूर्ण पाकिस्तानात ही 'मेड इन चायना' उत्पादनं इतक्या सहज आणि स्वस्तात कशी काय मिळू लागली आहेत?"

  • पुढे Dawn सांगतं की यामागे पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेला मुक्त व्यापार करार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तान आणि चीनमधील CPEC मुळे देशात सांस्कृतिक घर्षण होण्याची अधिक शक्यता आहे, असं The Nation या प्रतिगामी वृत्तपत्रात आलेल्या एका लेखात म्हटलं गेलं आहे.

हा लेख लिहीणारे झाहरा नियाझी विचारतात, "CPEC मुळे पाकिस्तानला मोठा फायदा होणार असला तरी त्यातून निर्माण होणाऱ्या सांस्कृतिक घर्षणाचं काय?"

स्वस्त चीनी वस्तूंनी भरलेल्या स्थानिक बाजारपेठांवर पाकिस्तानी व्यवसाय आपलं वर्चस्व गमावण्याची शक्यता असल्याचं हा लेख अधोरेखित करतो.

'पाकिस्ता चीनसाठीसोन्याची खाण'

मात्र चीनच्या वाढत्या सहभागाला अनेकांनी एक सकारात्मक संधी म्हणूनही पाहिलं आहे. पाकिस्तानी लष्कराशी घनिष्ठ Pakistan Observer या दैनिकांनुसार, "दोन मोठ्या राष्ट्रांच्या एकत्रीकरणाने दोन समाज एकत्र येत आहेत. हा प्रदेश एका नव्या संस्कृतीचा उगम आहे."

Daily Express या उर्दू वृत्तपत्रानुसार, चीनी लोक स्थानिकांपेक्षा वेगळे आहेत. पण दोन्ही देशांमधली ही दरी भरून काढण्यासाठी हे वृत्तपत्र काही पर्यायही सांगतात.

"दोन्ही देशांनी एकमेकांचे चित्रपट एकमेकांच्या देशात दाखवायला हवेत. चीन आणि पाकिस्तानातलं आधुनिक तसंच पारंपरिक साहित्य एकमेकांच्या ग्रंथालयांमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, जेणेकरून दोन्ही देशांतल्या नागरिकांना एकमेकांच्या संस्कृतीबद्दल जाणता येईल," असं या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

Dawn मधल्या एका लेखात शाझिया हसन म्हणतात, "पाकिस्तानची भूमी चीनसाठी एका सोन्याच्या खाणीप्रमाणे आहे. त्यांना एक नवी संधी निर्माण झाली आहे. तसंच अनेक चीनी नागरिकांसाठी घरांपासून लांबचे घर हे पाकिस्तान असून त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी ही चांगली संधी आहे."

"CPEC मुळे दोन्ही देशांतील बंध हे दृढ होणार आहेत. पण हे संबंध भविष्यात कोणतं वळण घेतील, हे या दोन देशांच्या व्यवहारावर आणि आचरणावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, आजच्या सारखा पाकिस्तान यापुढे नसेल."

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)