कर्नाटकात अचानक का पसरतंय जातीय हिंसाचाराचं लोण?

परेश मेस्ता
प्रतिमा मथळा परेश मेस्ता

कर्नाटकात गेल्या काही दिवसांत अप्रिय घटना घडत आहेत, ज्यात काही हिंसक घटनांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये तिथं जातीय तणाव वाढण्याची चिन्हं आहेत. पुढच्या वर्षी कर्नाटकात निवडणुका आहेत. त्यामुळे या घटना चिंताजनक आहेत.

2013 साली उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. त्यात 62 जणांचा मृत्यू झाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हिंसाचार सध्याच्या कर्नाटकात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेशी समांतर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या चर्चेमुळे जनता दल (सेक्यलर) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारास्वामीसुद्धा चिंतेत आहेत.

"निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशात कायम जातीय तणाव आणि हिंसाचाराच्या घटना होत असत. पण लोकसभा निवडणुकांनंतर या घटना थांबल्या. गेल्या दोन तीन महिन्यांत लहानसहान भांडणांनासुद्धा खूप महत्त्व दिलं जात आहे. हे मुझफ्फरनगर इतकं चिंताजनक नाही पण काळजी करण्यासारखं नक्कीच आहे." कुमारस्वामी बीबीसीशी बोलत होते.

हिंसाचाराच्या घटना

उत्तर कर्नाटकातल्या सीमाभागात झालेल्या हिंसाचाराच्या आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. होन्नावर या किनारपट्टीच्या गावात मोटरसायकल आणि ऑटोरिक्षाचा अपघात झाला. या अपघातामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण झाला होता.

दुसऱ्या दिवशी परेश मेस्ता या 19 वर्षांच्या मुलाच्या पालकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार केली. दुसऱ्या दिवशी परेशचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत सापडला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

"गावात जमावबंदीचा आदेश असताना एका मच्छिमाराचा मृतदेह पाण्याच्या टाकीत कसा सापडू शकतो?" असा प्रश्न भाजपच्या लोकप्रतिनिधी शोभा करंदलाजे विचारतात. कर्नाटकात भाजप मुख्य विरोधी पक्ष आहे.

करंदलाजे यांनी केलेल्या ट्वीट्सवर खूप टीका होते आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांना उत्तेजन दिल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, परेश हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता हा करंदलाजे यांचा दावा परेशच्या कुटुंबीयांनी खोडून काढला आहे.

"जमावबंदीच्या आदेशाचं जाणूनबुजून उल्लंघन करण्यात आलं. जर होन्नावरमधल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं तर ते शेजारच्या कुमटा येथे हिंसाचार घडवून आणतात. तिथं नियंत्रण मिळवलं की, भाजपाचे कार्यकर्ते सिरसीमध्ये आंदोलन करतात," असं एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

"सिरसीमधल्या परिस्थितीवर पोलिसांनी योग्य प्रकारे नियंत्रण मिळवलेलं नाही. आम्ही शांतपणे आंदोलन करू असं सांगितलं तेव्हा त्यांनी आम्हाला अटक केली. त्यात माझाही समावेश होता. आम्हाला जामीन मिळाल्यावर त्यांनी आमच्यावर नवीन खटले दाखल केले" असं भाजपचे सिरसीचे आमदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी सांगितलं.

पहिलीच घटना नाही

पण कर्नाटकच्या किनारपट्टी परिसरातली ही अशी पहिलीच घटना नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांमधली काही प्रकरणं खणून काढली आहेत.

प्रतिमा मथळा कर्नाटकात जातीय हिंसाचाराच्या घटनांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

या वर्षीच्या सुरुवातीला मेंगलुरूमध्ये मोटरसायकलवरून जाणाऱ्या एकाची हत्या झाली."त्यानं दाढी ठेवली होती, तो मुस्लीम असल्याचे समजून त्याची हत्या करण्यात आली," असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

  • 21 जूनला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अशरफ कलायी यांना खून झाला होता. त्यामुळे दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या बंटवाल तालुक्यात जातीय तणाव निर्माण झाला होता.
  • 4 जुलैला शरथ माडीवाला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. केरळमध्ये सुडाच्या भावनेतून हत्या होते त्या प्रकारची ही हत्या होती. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत राजकीय वैमनस्य पसरवणाऱ्या दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
  • 3 डिसेंबरला म्हैसुरमध्ये स्थानिक खासदार प्रताप सिम्हा यांना अटक करण्यात आली. ज्या रस्त्यावर इद-ए-मिलादचा उत्सव सुरू होता त्याच ठिकाणी सिम्हा यांचे कार्यकर्ते हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत होते. या रस्त्यावर बॅरिकेड्स लावले होते. हे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न प्रताप सिम्हा यांनी केला. म्हणून त्यांना अटक करण्यात आली.
  • 4 डिसेंबरला चिंकमांगळूर जिल्ह्यात बाबा बुडानगिरी दर्ग्याच्या परिसरात एक जमाव आला आणि तिथं भगवे झेंडे फडकावले. पोलिसांनी लगेचच तिथं कारवाई केली.

हिंदू संघटनांनी गुहेत असलेला हा दर्गा हिंदू मंदिर घोषित करावं अशी मागणी केली. मुस्लीम आणि हिंदू या टेकडीवर अनेक शतकांपासून प्रार्थनेसाठी येतात. मुस्लीम सुफी बाबा बुडानगिरी दर्ग्यात प्रार्थना करतात. तर बाजुलाच असलेलल्या दत्तात्रय मंदिरात हिंदू भाविक पूजा करतात.

"हा वैयक्तिक फायद्यासाठी समाजात फूट पाडण्याचा कट आहे" असं एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

म्हैसूर विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक मुजफ्फर असादी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "हा एका सामान्य आणि सहिष्णू हिंदू माणसाला सांस्कृतिक हिंदू करून हिंदूत्वाचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न आहे."

असादी पुढे सांगतात, "राजकीयदृष्ट्या बघायचं झालं तर हा समाजाच्या धृवीकरणाचा प्रयत्न आहे, पण त्यामुळे फारशी मदत झालेली नाही. इथं जातीची उतरंड इतकी बळकट आहे की, उत्तर प्रदेशासारख्या राज्याशी त्याची तुलनासुद्धा होऊ शकत नाही."

"हनुमान जयंती आणि इद-ए-मिलाद याआधी अनेकदा एकाच दिवशी आले आहेत. पण इतका तणाव आजपर्यंत कधीच निर्माण झाला नव्हता. ते कर्नाटकात सुद्धा मुझफ्फरनगर करण्याचा प्रयत्न करत आहेत का?" असा सवाल कुमारस्वामी उपस्थित करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)