UNचे नवे निर्बंध म्हणजे आमच्याविरोधात युद्ध छेडण्याचा प्रकार : उत्तर कोरिया

किम जोंग उन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांचा उत्तर कोरियानं निषेध केला आहे.

"हे नवे निर्बंध म्हणजे आमच्याविरोधात युद्ध छेडल्याप्रमाणे आहे," असं उत्तर कोरियानं म्हटलं आहे.

या निर्बंधामुळे आमची आर्थिक कोंडी होईल असं उत्तर कोरियाच्या परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे.

उत्तर कोरियानं नुकत्याच केलेल्या बॅलेस्टीक मिसाईल चाचणीमुळे हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

अमेरिकेनं तयार केलेल्या या प्रस्तावानुसार आता उत्तर कोरियाला होणाऱ्या पेट्रोल निर्यातीत 90 टक्क्यांनी कपात केली जाणार आहे.

विशेष म्हणजे चीन आणि रशिया या उत्तर कोरियाच्या मित्र राष्ट्रांनीही या प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं आहे.

यापूर्वीच या देशावर अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय महासंघानं निर्बंध लादले आहेत. अमेरिकेनं उत्तर कोरियावर 2008 पासूनच निर्बंध लादण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित कंपन्यांची खाती गोठवण्यापासून ते त्या देशातली आयात थांबवण्यापर्यंतचे हे निर्बंध होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील दूत निक्की हॅले.

संयुक्त राष्ट्रांतल्या अमेरिकेच्या दूत निक्की हॅले म्हणाल्या, "हे निर्बंध लादून आम्हाला उत्तर कोरियाला स्पष्ट संदेश द्यायचा आहे. तरीही इथून पुढेही त्यांनी उद्दामपणा केला तर या पेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल."

फोटो स्रोत, Getty Images

चीनचे प्रतिनिधी वू हिताओ याबाबत म्हणाले की, "या प्रस्तावाला सगळ्यांनी केलेलं मतदान हे उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाविरोधातलं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरचं एकमत आहे."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या निर्बंध लादण्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. जगात शांतता हवी, मृत्यू नको असं मत त्यांनी ट्विटरवर व्यक्त केलं.

काय आहेत नवे निर्बंध?

जगभरातून दबाव आणि विरोध असतानाही उत्तर कोरियानं आपला आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू ठेवला आहे. त्यामुळे या वर्षी उत्तर कोरियाविरोधात आंतरराष्ट्रीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली होती.

नव्या निर्बंधांनुसार, उत्तर कोरियाला आता वर्षाला फक्त 5 लाख बॅरल इतर पेट्रोलियम पदार्थ आणि 40 लाख बॅरल क्रुड ऑईल मिळणार आहे. यापूर्वी हा इंधन पुरवठा यापेक्षा बराच अधिक होता.

फोटो स्रोत, Getty Images

तसंच जगभरात काम करणाऱ्या उत्तर कोरियाच्या नागरिकांना 2 वर्षांच्या आत त्यांच्या देशात परतावं लागणार आहे. कारण, त्यांच्या परदेशी चलन वापरावर मोठ्या मर्यादा येणार आहेत.

उत्तर कोरियातून केल्या जाणाऱ्या यंत्रसामुग्री आणि कच्च्या मालाच्या आयातीवर पूर्णतः बंदी लादण्यात आली आहे.

पाहा उत्तर कोरियाच्या सीमेवरून बीबीसीचे Facebook Live

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)