विज्ञानातील या 8 महत्त्वाच्या घटनांमुळे 2017 ठरलं लक्ष्यवेधी

दोन न्युट्रॉन तारे आदळल्याचे काल्पनिक चित्र Image copyright PA
प्रतिमा मथळा दोन न्युट्रॉन तारे आदळल्याचे काल्पनिक चित्र

विज्ञान क्षेत्रात सातत्यानं नाविन्यपूर्ण घडामोडी घडतात. सरतं वर्षही त्याला अपवाद नाही. कॅसिनी या अंतराळयानानं आपलं गंतव्य स्थान गाठलं आणि एका ऐतिहासिक प्रवासाची अखेर झाली.

दोन ताऱ्यांची टक्कर यंदाच्या वर्षाचं आकर्षण ठरलं. आईनस्टाईन यांनी मांडलेल्या गुरुत्वाकर्षण लहरींवर शिक्कामोर्तब झालं. यंदाच्या वर्षातल्या या काही प्रातिनिधिक घटना. विज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रातल्या आठ अद्भुत घडामोडींचा बीबीसीनं घेतलेला वेध.

1) अवकाशात ताऱ्यांची टक्कर

2017 मध्ये अवकाशात दोन मृत तारे म्हणजेच न्यूट्रॉन्स एकमेकांवर आदळले. यामुळे आईनस्टाईन यांनी मांडलेल्या गरुत्वाकर्षण लहरींचा स्त्रोत मिळाला. 2016 मध्ये advanced LIGO प्रयोगशाळेनं याविषयी कल्पना दिली होती.

या प्रयोगशाळेनं अवकाशात दोन कृष्ण विवरं विलीन होणार असल्याचं सांगितलं. अवकाशात होणाऱ्या घटनांचा गुरुत्वाकर्षण लहरींच्या माहितीच्या आधारे अभ्यास करता येणार आहे.

या शोधानंतर आता खगोलशास्त्राच्या एका नव्या शाखेचा उदय होणार आहे.

दोन न्यूट्रॉन तारे एकमेकात विलीन होण्याचा क्षण जगभरात विविध ठिकाणी शक्तिशाली दुर्बीणींच्या साह्यानं अनुभवता आला. हा उद्रेक पृथ्वीपासून अंदाजे हजारो अब्ज प्रकाशवर्ष दूर घडला. विशेष म्हणजे या चमचाभर न्यूट्रॉनचं वजन अब्जावधी टन असतं.

यावरून ही घटना किती प्रलयकारी असेल याची कल्पनाच केलेली बरी. या ताऱ्यांच्या एकमेकांवर आदळून विलीन होण्याच्या प्रक्रियेतून सोनं आणि प्लॅटिनम धातूंची निर्मिती झाली आहे, असं या घटनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं.

2) कॅसिनीला अलविदा

2004 मध्ये कॅसिनी अंतराळयानानं शनी गृहाच्या कक्षेत प्रवेश केला होता. 13 वर्ष शनीच्या भोवती घिरट्या घालून कॅसिनीनं शनी आणि त्याचे चंद्र अर्थात उपग्रहांविषयी सखोल अभ्यास करून आपल्याला तपशीलवार माहिती पुरवली.

या अंतराळानं शनीच्या 'एन्सेलाडस' या बर्फाळ उपग्रहावरील समुद्रातून पाणी शोषून घेणाऱ्या गिझरचा शोध लावला. तसंच तिथला सर्वांत मोठा चंद्र टायटनवरील मिथेनच्या समुद्राचं निरीक्षण करून पाठवलं.

Image copyright NASA/JPL-CALTECH
प्रतिमा मथळा शनिच्या वातारणात कॅसिनी फिरताना (प्रतिकात्मक चित्र)

दरम्यान, कॅसिनीचं इंधन संपत आलं होतं. त्यामुळं नासानं ते नष्ट करण्याचा निर्णय घेतला. कारण, बंद कॅसिनीला शनीच्या वातावरणात सोडून दिल्यानं ते जीवसृष्टीला धडकण्याची शक्यता होती.

15 सप्टेंबर रोजी कॅसिनी हे शनीच्या वातावरणात नामशेष झालं. त्यावेळीसुद्धा या यानानं नष्ट होण्याची माहिती पाठवली.

3) अमेरिकेचा पॅरिस करारतून काढता पाय

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालिन उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी जागतिक हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडेल असं जाहीर केलं होतं.

त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाल्यावर 1 जून रोजी डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमधल्या रोझ गार्डनमध्ये पत्रकार परिषद घेऊन अमेरिका या करारातून बाहेर पडल्याची घोषणा केली.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा डोनाल्ट ट्रंप

"अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांच्या संरक्षणासाठी युनायटेड स्टेट्स पॅरिस करारातून बाहेर पडत आहे. पण या करारात बदल करून पुन्हा सह्या करू किंवा याबाबत नव्या अटी-नियम घालू ज्या अमेरिकेच्या हिताच्या असतील," असं ट्रंप यांनी स्पष्ट केलं.

अपेक्षेप्रमाणे डेमोक्रॅटीक पक्षानं आणि जागतिक नेत्यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली.

ट्रंप प्रशासनाचा निर्णय नागरिकांच्या भविष्यावर गदा आणत असल्याचं माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितलं. तर माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी ही नेतृत्वाची हार असल्याचं सांगितलं.

4) आणखी एका पृथ्वीचा शोध

सूर्यमालेत एकूण 3,500 ग्रहांची नोंद झाली आहे. त्यापैकी काही अचंबित करणारे आहेत.

Image copyright NATURE
प्रतिमा मथळा एकाच वर्षी एकाच ताऱ्याभोवती सगळ्यात जास्त पृथ्वीच्या आकाराचे गृह ही पहिलीच घटना आहे (प्रतिकात्मक चित्र)

यावर्षी, खगोलशास्त्रज्ञांना नव्या ग्रहमालेचा शोध लागला. त्यामध्ये पृथ्वीच्या आकाराचे 7 ग्रह आहेत. त्यापैकी तीन ग्रह अधिवासाच्या पट्ट्यात येतात त्या ग्रहांच्या पृष्ठभागावर द्रव स्वरुपात पाणी असू शकतं.

आणि ज्याठिकाणी पाणी असतं त्याठिकाणी जीवसृष्टी निर्माण व्हायला वाव असतो.

5) आपल्या पूर्वजांचे अवशेष

उत्तर आफ्रिकेत संशोधकांना पाच आदिमानवांचे अवशेष सापडले. 'होमो सेपियन' मानवी प्रजाती कमीत कमी 100,000 वर्षांपूर्वीच्या आहेत.

यावरून मानवाचा उगम फक्त पूर्व आफ्रिकेत झालेला नाही तर, आधुनिक मानवाचा विकास हा संपूर्ण खंडात झाला असावा असं समजतं.

त्याचबरोबर, मानवी उत्क्रांतीसंदर्भात महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. 2017मध्ये नवीन मानवी प्रजातीचे 15 सांगाडे शास्त्रज्ञांच्या हाती लागले.

Image copyright PHILIPP GUNZ/MPI EVA LEIPZIG
प्रतिमा मथळा होमो सॅपियन प्रजातीची कवटी

दरम्यान हे सांगाडे किती वर्षांपूर्वीचे आहेत हे शास्त्रज्ञ सांगू शकले नाहीत, पण त्यांच्या गुणधर्मावरून 'होमो नालेडी' ही मानवी प्रजात 30 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी अशी शक्यता आहे.

6) अंधारातला दिवस

21 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यानं सूर्यग्रहण अनुभवलं.

सूर्यग्रहणाला पश्चिम किनाऱ्यावरून पूर्व किनारा गाठायला तब्बल 99 वर्षांचा कालावधी लागला. अतीदुर्मीळ असा हा ग्रहणयोगाचा क्षण अनुभवण्यासाठी लाखो लोक जमले होते.

Image copyright Getty Images

त्यावेळी बीबीसीचे प्रतिनिधी पल्लभ घोष याचं वर्णन करताना म्हणाले, "सकाळी सव्वादहा वाजता रात्रीसारखा काळोख पसरला होता. आकाशात एखादा स्माइली अवतरावा असंच दृश्य दिसत होतं"

7) सूर्यमालेबाहेरचा पाहुणा

आपल्या सूर्यमालिकेत बाहेरून काही अशनी येऊ शकतात असं भाकित शास्त्रज्ञांनी केलं होतं. 2017मध्ये ते भाकीत खरं ठरलं. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या 'पॅन-स्टार्स' टेलिस्कोपमधून हे दृश्य दिसलं.

या अशनीचा वेग आणि दिशेवरून तो सूर्यमालेबाहेरून आला असल्याचं समजतं. या अशनीला 'ओमूआमूआ' (Oumuamua) नाव देण्यात आलं.

Image copyright ESO/M. KORNMESSER
प्रतिमा मथळा ओमूआमूआ हे टेलेस्कोमधून दिसेनासं होत आहे

आपल्या सूर्यमालेच्याभोवती आढळणाऱ्या घटकांपेक्षा म्हणजे Kuiper Belt Objects (KBOs) हा अशनी वेगळा नव्हता.

हा अशनी दहापट मोठा होता म्हणजेच आपल्या सूर्यमालेत आढळणाऱ्या वस्तूंपेक्षा सर्वात लांब अंतरावर होता असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

8) महाकाय हिमनग अखेर तुटला

अंटार्क्टिकामधील 'लार्सन' या ठिकाणच्या C आकाराच्या महाकाय हिमनगाचे तुकडे झाले. पण शास्त्रज्ञ या हिमनगाला गेलेल्या तड्यांचा अभ्यास आधीपासून करत होते. त्याचा आकार 6,000 चौ. किमी असल्याचं सांगण्यात आलं.

Image copyright COPERNICUS SENTINEL (2017) ESA/ANDREW FLEMMING
प्रतिमा मथळा युरोपच्या सेंटिनेल - 1 सॅटेलाईट-रडार सिस्टिमने हिमनग तुटल्याची पुष्टी केली

हिमनगाचे तुकडे पडणे ही नैसर्गिक आहे. पण, संशोधकांच्या मते लार्सन C हा 11,700 वर्षां पूर्वीच्या हिमयुगातील एक छोटासा तुकडा होता.

तापमानवाढीचा यावर काय परिणाम होत आहे, यासाठी संशोधकांना अजून अभ्यास करण्याची गरज आहे, असं त्याचं म्हणण आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)