रशिया : पुतिन विरोधामुळे नेवलानी यांच्यावर निवडणुकबंदी?

अॅलेक्झी नेवलानी

फोटो स्रोत, AFP

रशियातील विरोधी पक्षनेते अॅलेक्झी नेवलानी यांना पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

नेवलानी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं ते अपात्र ठरल्याचं रशियातल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मात्र, आयोगाची ही कारवाई राजकीयदृष्टीनं प्रेरीत असल्याचं नेवलानी यांचं म्हणणं आहे.

म्हणून मार्चमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत मतदान करू नका, अशा सूचना नेवलानी यांनी त्यांच्या समर्थकांना दिल्या आहेत. 41 वर्षीय नेवलानी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना विरोध करणारे रशियातील एकमेव नेते आहेत.

"आम्ही मतदानच करायचं नाही असा निर्णय घेतला आहे. कारण, आता जे काही होत आहे त्याला आदर्श निवडणूक प्रक्रिया म्हणत नाहीत," असं नेवलानी यांनी या निर्णयानंतर सांगितलं. या निर्णयाविरोधात देशभरात आंदोलन करणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं.

पुतिन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आंदोलन आक्रमकपणे चालविणारे नेते अशी नेवलानी यांची ख्याती आहे. मात्र, सध्या त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं त्यांना निवडणूक लढविण्यास पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

"आम्ही कायद्यातील तरतूदींनुसार ही कारवाई केली आहे," असं आयोगाच्या प्रमुख एला पॅमफिलोवा यांनी स्पष्ट केलं. आयोगाच्या 13 पैकी 12 सदस्यांनी नेवलानी यांची उमेदवारी फेटाळून लावली आहे. तर, एका सदस्यानं नेवलानी यांनी सरकारी निर्णयात व्यक्तिगत लाभाच्या दृष्टीनं हस्तक्षेप केल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, EPA

निवडणूक लढवण्यावर बंदी घालणं म्हणजे खरं बोलण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचं नेवलानी यांनी सांगितलं. तसंच, या बंदीमुळे रशियातील लाखो नागरिकांच्या मतदानाचा अधिकार नाकारला जात असल्याचं मत त्यांनी मांडलं.

"पुतिन यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक कोणी लढवायची हे देखील ठरवून टाकलं आहे. ज्यांच्यापासून धोका नाही अशांचीच ते निवड करतात. रशियाच्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी दाद मागणार आहे," असंही नेवलानी यांनी स्पष्ट केलं.

रविवारी नेवलानी यांनी आपली उमेदवारी वाचवण्यासाठी 500 सह्या गोळा केल्या. जेणेकरुन याचा निवडणूक आयोगावर दबाव निर्माण करता येईल आणि निवडणूक लढविण्याची संधी त्यांना मिळू शकेल.

नेवलानी यांचा प्रचार कुठपर्यंत?

बीबीसीच्या मॉस्कोतील प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलेक्झी नेवलानी हे रशियातील फार मोठे पुतिन विरोधक नाहीत. मात्र, त्यांनी पुतिन यांच्याविरोधात सुरू केलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे रशियात विशेष गाजले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ते मतदारांना भेटण्यासाठी देशभर फिरत आहेत. आंदोलनं तसेच सभा घेऊन ते मतदारांना आवाहन करत आहेत. मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद दाखवून त्यांना प्रशासनावर निवडणूक लढवू देण्यासाठी दबाव आणायचा आहे.

पुतिन यांना निवडणुकीत स्पर्धा राहू नये यासाठी हे केल्याचंही रशियात बोललं जात आहे. पण, यामुळे नेवलानी यांना टीव्ही माध्यमात पुतिन यांच्याविरोधात नवे आरोप करण्याची संधी मिळणार आहे.

पण, सध्या निवडणुकीवर बंदी आणल्यानं निवडणुकीत मतदान करण्यात येऊ नये असा प्रचार नेवलानी यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे. त्यांनी यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचंही ठरवलं आहे. जेणेकरून पुतिन यांची लोकप्रियता घटेल असं त्यांना वाटतं.

मात्र, मतदान करण्यात येऊ नये ही मागणी अयोग्य असल्याचं निवडणूक आयोगानं सोमवारी जाहीर केलं. पण, नेवलानी यांच्यावर बंदी घातल्यानं भविष्यात निवडणुकीत होणारे धोके टाळले जातील असं 'क्रेमलिन'चं यामागचं गणित आहे.

2013 मध्ये 5 लाख डॉलर रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी नेवलानी यांना न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. किरोव्ह प्रांताच्या गर्व्हनरचे सल्लागार असताना लाकडाच्या एका कंपनीच्या साथीनं हा गैरव्यवहार त्यांनी केल्याचा आरोप होता.

मात्र, युरोपच्या मानवाधिकार न्यायालयानं (ECHR) हे आरोप धुडकावून लावत नेवलानी यांना त्यांची बाजू मांडण्यास योग्य संधी न मिळाल्याचं सांगितलं. याप्रकरणी रशियातील न्यायालयानं फेर सुनावणी घेत युरोपीयन न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता.

पुतिन आता चौथ्यांदा रशियाच्या सत्तेवर आरुढ होण्याच्या मनस्थितीत आहेत. असं झाल्यास जोसेफ स्टॅलिननंतर सगळ्यांत जास्त काळ रशियाची सत्ता राखणारे ते दुसरे नेते ठरतील. अजूनही त्यांची रशियात लोकप्रियता कायम असून ते यंदाची निवडणूक जिंकण्याचीही शक्यता दिसते आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)