उत्तर कोरियातल्या या आजी जगात सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत

उत्तर कोरिया, किम जोंग सुक Image copyright KCNA
प्रतिमा मथळा किम जोंग सुक यांचे छायाचित्र सोन्याच्या नाण्यांवर आहे.

क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी उत्तर कोरियाचं नाव जगभरात चर्चेत असतं. पण काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियात एका महिलेची शंभरी दणक्यात साजरी करण्यात आली. या महिलेचं नाव आहे किम जोंग-सुक. कोण आहेत या आजी?

सुक या उत्तर कोरियात युद्ध नायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. सुक म्हणजे कोणी सर्वसाधारण स्त्री नाही. उत्तर कोरियाचे संस्थापक किम द्वितीय सुंग यांच्या पहिल्या पत्नी आणि उत्तर कोरियाचे आताचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्या त्या आजी आहेत.

किम जोंग-सुक यांचा जन्म 1917 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी एका गरीब घरात झाल्याचं सांगितलं जातं. 1930 मध्ये जपानविरुद्ध झालेल्या लढाईत गनिमी काव्यानं आक्रमण करणाऱ्या सैनिकांशी त्यांनी मुकाबला केला होता.

1949 मध्ये अवघ्या 31व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अधिकृतरीत्या उपलब्ध कागदपत्रं प्रमाण मानली तर गनिमी काव्याची रणनीती अंगीकारलेल्या सैनिकांविरुद्ध लढताना त्यांचं निधन झालं.

लक्ष्यभेदी नेमबाज

त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं उत्तर कोरियातल्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. युद्धातील त्यांच्या कहाण्यांबद्दल सातत्यानं मजकूर छापून येतो आहे.

उत्तर कोरियातील वृत्तसंस्था KCNAच्या वृत्तानुसार सुक केवळ उत्कृष्ट महिला क्रांतीकारी नव्हे तर क्रांतीच्या जनक होत्या असं वर्णन करण्यात आलं होतं.

त्यांचा लक्ष्यभेद इतका अचूक असे की, त्यांच्या हातून मारले गेलेल्या प्रतिस्पर्धी सैनिकांची मोजदाद त्यांचे सहकारी करत असत असं या वृत्तात पुढे म्हटलं आहे.

Image copyright korean central tv
प्रतिमा मथळा किम जोंग सुक यांच्या कार्याची महती सांगणारे कार्यक्रम उत्तर कोरियात साजरे करण्यात येत आहेत.

किम जोंग-सुक यांच्या सन्मानार्थ पोस्टाच्या स्टँपसह सोनं आणि चांदीच्या नाण्यांचं अनावरण करण्यात आलं. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

विभिन्न व्यवसायाशी निगडीत तीन लाखांहून अधिक नागरिक तसंच अन्य देशात राहणाऱ्या कोरियाच्या नागरिकांनी किम जोंग-सुक यांच्या जन्मगावाला भेट दिली.

वारसा

किम जोंग-सुक यांच्या होणाऱ्या सन्मानाचं चित्र आणि आताच्या उत्तर कोरियातल्या महिलांची स्थिती हे विरोधाभासी चित्र आहे. उत्तर कोरियातला समाज पितृसत्ताक आहे आणि त्यांचं अस्तित्व चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित आहे.

एकीकडे उद्योग आणि नोकऱ्यांमध्ये महिलांचा टक्का वाढतो आहे. कम्युनिस्ट विचारधारा स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरते. असं असलं तरी देशाच्या राजकीय व्यवस्थेत महिलांचा नेतृत्वातला सहभाग नगण्य आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किम जोंग सुक या उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या आजी आहेत.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या भगिनी किम यो जोंग या सध्याच्या राजकीय व्यवस्थेतल्या एकमेव महिला नेत्या आहेत.

किम जोंग-सुक यांचं 'योगदान' म्हणजे त्यांनी किम जोंग इल यांचं संगोपन देशाच्या भावी नेतृत्त्वाच्या भावनेतून केलं. ऐतिहासिक नेतृत्त्वाचा वारसा पुढच्या पिढीनं चालवला तो इल यांच्यामुळेच.

महिलांचा लष्करातला सहभाग आजही खडतर आहे. कोरियाच्या सरकारनं 2015 मध्ये 17 ते 23 या वयोगटातल्या महिलांसाठी लष्करी सेवा सक्तीची केली आहे. लष्करातली महिलांची स्थिती संतापजनक असल्याचं एका माजी सैनिकानं सांगितलं आहे.

(बीबीसी मॉनिटरिंगच्या सौजन्यानं)

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)