अफगाणिस्तानमध्ये चीननं घेतलेला रस भारतासाठी किती धोकादायक?

परराष्ट्र मंत्री

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

पहिल्यांदाच तीन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बीजिंगमध्ये झाली आहे.

चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला अफगाणिस्तानपर्यंत वाढवणार असल्याचं चीननं म्हटलं आहे.

चीनच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. बीजिंग येथे झालेल्या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितलं की, इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे विकासाला आणखी गती मिळेल.

तीन देशात झालेली बैठक ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातलं शत्रुत्व कमी करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातं.

पाकिस्तान तालिबानला सातत्यानं प्रेरणा देत असल्याचं अफगाणिस्तानचं मत आहे. चीननं पाकिस्तानबरोबर इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये जवळजवळ 57 अब्ज डॉलर (5700 कोटी) इतकी गुंतवणूक केली आहे.

या प्रकल्पाअंतर्गंत चीन रस्ते, रेल्वे आणि पाईपालाईनचं जाळं पसरवत आहे. हे काम पाकिस्तानी पोर्ट ग्वादर आणि पश्चिम चीनच्या कॅशगरच्या दरम्यान होत आहे.

फोटो स्रोत, Reuters

अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान यांची अशा पद्धतीनं पहिलीच बैठक झाली आहे. दोन्ही देशांत मध्यस्थी करून तणाव कमी करण्याची चीनची इच्छा आहे.

जर चीन CPEC ( China Pakistan Economic Corridor) चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्यात यशस्वी झाला, तर त्याचा भारत अफगाणिस्तान संबंधांवर आणि चाबाहार बंदरावर काय परिणाम होईल? या तीन देशात झालेल्या बैठकीनंतर भारतानं सतर्क होण्याची गरज आहे का? अफगाणिस्तानाच्या धोरणावर त्यांचा प्रभाव कसा राहील?

हे सर्व प्रश्न आम्ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अध्ययन केंद्राच्या प्राध्यापक सविता पांडे यांना विचारले.

या प्रश्नावर त्यांचे उत्तर वाचा त्यांच्याच शब्दात.

पाकिस्तान आणि चीन यांच्या मैत्रीत अफगाणिस्तानचा समावेश हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे. चीनचे अफगाणिस्तानात आर्थिक हितसंबंध आहेत. अफगाणिस्तानात चीनला तांब्याच्या उत्खननाचा प्रकल्प मिळाला आहे. पण अशांतततेमुळे तो पुढे जाऊ शकलेला नाही. सध्या हा प्रकल्प चीनच्याच ताब्यात आहे.

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय चीन आणि अफगाणिस्तान यांचे संबंध कधीही बिघडले नाहीत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचे संबंध तणावपूर्ण आहेत. त्यामुळे आपलं निदान काम तरी चालू रहावं इतपत हे संबंध सुधारण्याचा चीनचा इरादा आहे.

CPEC ला अफगाणिस्तानात घेऊन जाणं हासुद्धा याच प्रयत्नाचा एक भाग आहे.

भारताच्या अडचणी वाढल्या

खरंतर CPEC मुळे अजूनही पाकिस्तान आणि चीनमध्ये अजुनही गुंतागुंत आहे. CPEC बाबत भारताला आक्षेप आहेतच, पण पाकिस्तानातही पण याबाबत अनेक समस्या आहेत.

इथे मुद्दा असा आहे की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या संबंधांपेक्षा अफगाणिस्तान आणि चीनचे संबंध वेगळ्या पातळीवरचे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अफगाणिस्तानात दबदबा तयार करण्यासाठी पाकिस्तानचा वापर करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. CPEC बाबत पाकिस्तानातच इतक्या समस्या आहेत की, चीनचं अफगाणिस्तानात पोहोचणं तितकं सोपं नाही. चीनला पाकिस्तानातच मार्ग बदलावा लागत आहे.

भारत आणि इराण यांच्यामधल्या चाबहार बंदराचा विचार केला तर त्यावर थेट प्रभाव पडणार नाही. आम्ही तर चाबहारचा वापर हा पाकिस्तानला वळसा घालण्यासाठी करत आहोत.

अफगाणिस्तान आणि चीनचे संबंध चांगले

इकॉनॉमिक कॉरिडॉरपेक्षा ग्वादर बंदरामुळे भारताच्या चाबहार अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान आणि चीन जवळ आले तर भारताच्या संबंधांना धक्का लागेल याबद्दल कोणतेच दुमत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

ज्या ग्वादर बंदराचा चीन विकास करत आहे ,त्यातसुद्धा इतक्या समस्या आहेत की तिथे सतत उशीर होत आहे. पाकिस्तानच्या जवळ असलेल्या बलूच भागातून त्याला सातत्यानं विरोध होत आहे.

चाबहार बंदराचे वेगळे फायदे आहेत. ग्वादर बंदरामुळे होणारे नुकसान चाबहारमुळे भरून निघण्याची शक्यता आहे. चीन आणि अफगाणिस्तानचे संबंध कधीच बिघडले नाहीत. चीनमधील PLA (People liberation army) हा सत्ताधारी पक्ष अफगाणिस्तानाशी चर्चा करत असतो. चीनचा अफगाणिस्तानमध्ये थेट हस्तक्षेप नाही. मात्र, भारतानं तिथं मोठी गुंतवणूक केली आहे.

जर अमेरिकेनं सैन्य परत बोलावले तर

जर अमेरिकेनं अफगाणिस्तानातून सैन्य पूर्णत: मागे घेतलं तर तिथं चीन सगळ्यात मोठं आव्हान ठरेल, ही भारताला भेडसावणारी सगळ्यात मोठी चिंता आहे.

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या कोणत्याही शेजारी देशाचा विचार केला तर असं लक्षात येत की ते सर्व देश 'चीन कार्डा'चा वापर करत आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका इतकंच काय मालदीवसुद्धा हेच करत आहे. आता भीती आहे ती अफगाणिस्तानंही चीन कार्ड वापरण्याची. भारताच्या या शेजाऱ्यांनी चीनला कोणत्याच प्रकारे दूर ठेवलेलं नाही.

नेपाळमध्ये देखील भारताची गुंतवणूक कमी नाही, पण तिथेसुद्धा चीनचा प्रभाव आहेच. त्याच दृष्टीनं आपण मालदीव आणि श्रीलंकेला देखील बघू शकतो. एकूणच काय भारताच्या सर्व शेजारी देशात चीनचा चांगलाच प्रभाव आहे.

त्यामुळे संधी मिळताच प्रत्येक देश या संबंधांचा वापर करण्याची दाट शक्यता आहे.

भारताचा दबाव कामात येणार नाही

अफगाणिस्ताननं चीनबरोबरचे संबंध असेच वाढवत ठेवले तर तिथं भारताच्या दबावाचा काही फरक पडेल, असं वाटत नाही. अफगाणिस्तानसुद्धा भारताच्या हिताचा का विचार करेल? तेसुद्धा आपलंच हित बघतील. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांवर परिणाम होईल असा कोणताही प्रयत्न चीननं केलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानचे तालिबानशी असलेले संबंध संपवण्यासाठी अफगाणिस्तान चीनवर दबाव टाकेल. अशा वेळी चीन काय करेल हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण अफगाणिस्तानच्या माध्यमातून इतर जगाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत.

1947 साली अस्तित्वात आल्यापासूनच, पाकिस्तानचे अफगाणिस्तानशी संबंध ताणलेले आहेत. गेल्या काही काळात दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडले आहेत. चीनला वाटतं आहे की, इकॉनॉमिक कॉरिडॉर यशस्वी होण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात चांगलं संबंध असणं गरजेचं आहे.

अमेरिका अफगाणिस्तानात तालिबानबरोबर अनेक वर्षांपासून लढत आहे. तर, तालिबानबरोबर त्यांचे संबंध आहेत याचा पाकिस्ताननं सातत्यानं इन्कार केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)