सोशल मीडियाबरोबरच ऑफलाईनही जगा : बराक ओबामा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
ट्रंप अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर ओबामांना कसं वाटलं?

सोशल मीडियाच्या बेजबाबदार वापरामुळे अनेक किचकट आंतरराष्ट्रीय प्रश्नं समजून घेण्यात अडचणी निर्माण होतात आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जाते, असं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं म्हणणं आहे. 'बीबीसी फोर'साठी प्रिन्स हॅरी यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान ओबामा बोलत होते.

राजसत्तेचे पाचवे दावेदार प्रिन्स हॅरी ख्रिसमसदरम्यान या कार्यक्रमाची सूत्रं सांभाळत आहेत. त्यात झालेल्या एका संभाषणादरम्यान ओबामा म्हणाले की इंटरनेट वर एक सुरक्षित व्यासपीठ तयार करण्यासाठी जगभरातील नेत्यांनी एकत्र यायला हवं.

"भविष्यात अशी परिस्थिती उद्भवेल जेव्हा तथ्यांना मूठमाती दिली जाईल आणि एखाद्या व्यक्ती किंवा गटाचं मत बाकी समाजावर लादलं जाईल," अशी भीती ओबामांनी व्यक्त केली.

"एकच विषय लोकांसमोर वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात येतो. त्यामुळे लोकांना चुकीची माहिती मिळते, ज्याने त्यांचा पूर्वग्रह बळावू शकतो तसंच त्याचा संभ्रम वाढू शकतो," असं ते पुढे म्हणाले.

"एकाच विषयावरची वेगवेगळी मतं मांडण्याचं स्वातंत्र्य असावं, अशी व्यासपीठं तंत्रज्ञान कसं पुरवू शकेल, याचा विचार व्हायला हवा. भिन्न मतप्रवाह एकत्र नांदू शकतील, असं वातावरण तयार करणं आपली जबाबदारी आहे. पण यामुळे समाजातल्या छोट्या घटकांचं विघटन व्हायला नको, याचीही काळजी घ्यायला हवी," असं ओबामा म्हणाले.

Image copyright Getty Images / Chris Jackson
प्रतिमा मथळा सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी ओबामा आणि प्रिंस हॅरी

ओबामा यांचे उत्तराधिकारी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ट्विटरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. पण ओबामा यांनी ट्रंप यांचं नाव घेणं टाळलं.

ट्रंप यांच्यावर ट्विटरचा अतिवापर तसंच एकाच विचारधारणेच्या लोकांना फॉलो करण्याचा आरोप केला जातो. मात्र आपण ट्विटरद्वारे अमेरिकेच्या असंख्य नागरिकांशी संवाद साधतो, असं ट्रंप यांचं म्हणणं आहे.

लोकांच्या भावनांचं ध्रुवीकरण टाळण्यासाठी सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष बोलणं उपयुक्त ठरेल, असं प्रतिपादन ओबामांनी केलं.

ते पुढे म्हणतात, "समान आवड जोपासणाऱ्या किंवा एकाच विषयाशी संलग्न व्यक्तींना एकत्र येण्यासाठी तसंच एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी शक्तिशाली माध्यम आहे. मात्र त्याचवेळी ऑफलाईन राहणं म्हणजे वास्तव जगात जगणंही महत्त्वाचं आहे."

"हॉटेलात किंवा बसस्टँडवर तसंच बिल्डिंगमध्ये एकमेकांना भेटून समजून घेणंही महत्त्वाचं आहे. कारण इंटरनेटवर भेटणारा माणूस आणि प्रत्यक्ष भेटणारा माणूस यात फरक असू शकतो," असं ओबामांनी सांगितलं.

अध्यक्षपदाचा दबाव काय असतो?

राष्ट्राध्यक्ष पदाचं दडपण कशा स्वरुपाचं असतं, असं विचारल्यावर ओबामा म्हणाले, "वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक होणं खूपच आव्हानात्मक असतं. फारसं आनंददायी नसतंच. अनेकदा ते जगणं खडतर होतं. तुमच्या कुटुंबीयांनाही सतत ठरावीक चौकटबद्ध वागावं लागतं. तुमच्या वागण्यावर बारीक नजर असते. त्यांचं स्वातंत्र्य हरपू शकतं."

ते पुढे म्हणतात, "राजकारणात प्रवेश करतानाच अशा आयुष्याची तयारी ठेवावी लागते. वैयक्तिक स्वातंत्र्याचा त्याग करावाच लागतो. त्याला पर्याय नाही. चांगले बदल घडवण्याच्या दृष्टीने काम करायचं असेल तर हा त्याग रास्त ठरतो."

कुटुंबीयांच्या सहकार्याबद्दल ओबामा यांनी ऋण व्यक्त केलं. पत्नी मिशेलचा आधार कारकीर्दीत मोलाचा ठरल्याचं त्यांनी सांगितलं.

अध्यक्षपद सोडल्यानंतर

"राष्ट्राध्यक्षपद सोडताना मनात संमिश्र भावना दाटल्या होत्या. कारण खूप काम बाकी होतं. देशाची वाटचाल कशी होईल, याविषयी चिंता होती. आता देशात शांतता आहे," असं ओबामा यांनी सांगितलं.

"राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी म्हणजे रिले रेस आहे. मी माझ्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता मी मशाल पुढच्या व्यक्तीकडे सोपवली आहे. मशाल हाती आली तेव्हा आणि मशाल सोपवली तेव्हा, यादरम्यान काही चांगले बदल घडले असतील तर समाधान वाटतं," असं ते म्हणाले.

"ओबामाकेअर हा असाच समाधानकारक उपक्रम आहे. जास्तीत जास्त लोकांना आरोग्यविषयक मूलभूत सुविधा मिळवून देणं या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं. हे उद्दिष्ट साध्य करता आलं हे समाधान देणारं होतं. व्यवस्थेद्वारे दुर्लक्षित 2 कोटी नागरिकांना आरोग्यविमा मिळवून देऊ शकलो," असं त्यांनी सांगितलं.

भविष्य काय आहे?

जगासमोर असंख्य प्रश्नं आहेत. मात्र त्यातून मार्ग काढण्यासंदर्भात ओबामा आशावादी आहेत.

"आपण जबाबदारी स्वीकारायला हवी. आपण एकमेकांशी बोलायला हवं. आपण सहभागी व्हायला हवं. प्रश्नं आहेतच पण त्यांची उत्तरं शोधणं आपल्याच हाती आहे."

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आरोग्यविषयक सुविधा आणखी जनतेपर्यंत पोहोचवता आल्याने समाधानाची भावना असल्याचं ओबामा यांचं म्हणणं आहे.

"इतिहासातल्या कुठल्या कालखंडात तुम्हाला जगायला आवडेल, असं विचारल्यावर बहुतांशी जण आजच्याच काळाची निवड करतील. कारण आज आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत, हातात पैसा खेळतो आहे, शिक्षणाच्या संधी खूप आहेत, हिंसेच्या घटना कमी झाल्या आहेत."

प्रिन्स हॅरी यांचं काय म्हणणं?

'बीबीसी फोर' कार्यक्रमाची सूत्रं सांभाळणारे प्रिन्स हॅरी यांनीच ओबामांची ही मुलाखती घेतली. ते म्हणाले, "मी अशा स्वरुपाच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत. पण हा अनुभव अनोखा होता. ओबामा यांना माझी मुलाखत घ्यायची होती. यातून मी खूप काही शिकलो. अनेक महत्त्वाच्या विषयांवर आमचं बोलणं झालं."

दरम्यान प्रिन्स यांच्या कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्य, तरुणांमध्ये गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण, हवामान बदल, लष्कर, अशा विषयांचा उल्लेख होता.

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)