काबुल : शिया केंद्रावर आत्मघातकी हल्ल्यात 40 ठार

काबूल आत्मघातकी हल्ला Image copyright AFP
प्रतिमा मथळा आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने हा परिसर सील केला आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या पश्चिम भागात असलेल्या शिया सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्रावर आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त जण ठार झाले असून 30 जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार या आत्मघातकी हल्ल्यानंतर याच भागात आणखी दोन स्फोट झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले दिसत आहेत.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अफगाणिस्तानमध्ये सोमवारीही आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात दहा जण ठार झाले होते.

या शिया संस्थेच्या आवारातून आतापर्यंत अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेक जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जात आहे. हे काम अजूनही सुरू असल्याचं अफगाण प्रेसतर्फे सांगण्यात आलं.

या केंद्रात आज चर्चासत्रासाठी काही विद्यार्थी आले होते. ते या हल्ल्याचे लक्ष्य ठरले आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये तथाकथित इस्लामिक स्टेटकडून अफगाणिस्तानमधल्या शिया केंद्रांना लक्ष्य केलं जात आहे. ऑक्टोबरमध्ये शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झाला होता.

या आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी, अफगाण गुप्तचर विभागाच्या कार्यालयाजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 10 जण ठार झाले होते. .

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)