तुमचा आयफोन स्लो झाला आहे का? अॅपलने मागितली माफी

अॅपल Image copyright Getty Images

काही वर्षांच्या वापरानंतर तुमचाही आयफोन 'स्लो' झाला आहे का? मग अॅपलने तुमची आता माफी मागितली आहे.

अॅपलने सांगितलं आहे की ते तुमच्या फोनची जुनी बॅटरी कमी पैशात बदलून देणार आहेत, तसंच नव्या वर्षात तुमच्या फोनचं सॉफ्टवेअर अपडेट करून देणार आहेत. या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही आता तुमच्या बॅटरीचं स्टेटसवर वेळोवेळी लक्ष ठेवू शकाल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

या आधीच काही ग्राहकांना संशय आला होता की अॅपल नवीन आयफोनची विक्री व्हावी म्हणून मुद्दामहून जुने आयफोन स्लो करत होता.

आयफोनला असं स्लो केल्याचं मान्य करत अॅपलने म्हटलं आहे की यामुळं तुमच्या आयफोनचं आयुष्य वाढेल.

Image copyright Getty Images

आता आयफोन 6 किंवा त्यापुढच्या आयफोनची बॅटरी बदलायची असेल तर अॅपलने बॅटरीचे दर 79 डॉलरवरून (अंदाजे 5000 रुपये) 29 डॉलरवर (अंदाजे 1900 रुपये) आणले आहेत.

"ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास हाच आमचा अनमोल ठेवा आहे. त्याला तडा जाईल, असं काम आम्ही कधीही करणार नाही. ग्राहकांच्या विश्वासामुळेच आमची आतापर्यंत भरभराट झाली आहे." असं अॅपलनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

"हा विश्वास कायम राहील असंच काम आम्ही करू. आम्ही ग्राहकांना कधीही गृहीत धरत नाहीत," असं अॅपलनं म्हटलं आहे. आयफोनची गती कमी झाल्यामुळं अमेरिका, इस्राइल आणि फ्रांसमध्ये अॅपलला ग्राहकांनी न्यायालयात खेचलं आहे.

एखाद्या फोनचं वय वाढलं तर आम्ही ते मुद्दामहून सावकाश करतो याची कबुली अॅपलनं डिसेंबरच्या सुरुवातीला दिली होती. आता माफी मागून त्यांनी बॅटरी बदलून देण्याचं देखील कबूल केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)