कुलभूषण जाधव प्रकरण : 'पाकिस्तानी पत्रकारांचं चुकलंच, पण... नेमकं काय घडलं?'

कुलभूषण जाधव Image copyright PAKISTAN FOREIGN OFFICE
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव त्यांच्या आई आणि पत्नीला भेटताना

25 डिसेंबरचा दिवस! पाकिस्तानमध्ये बहुतांश सगळे जण मस्त सुटीच्या मूडमध्ये होते. पण आम्हा पत्रकारांसाठी हा दिवस प्रचंड कामाचा होता. सकाळी लवकर उठून पहिलं विमान पकडून कामाला लागायचं, या विचारानेच झोप उडाली होती.

हे सगळं जमेला धरूनही पत्रकारांसाठी हा निर्विवाद मोठा दिवस होता. एखाद्या पत्रकाराला त्याच्या पेपरमध्ये, चॅनेलवर सगळ्यांत मोठी संधी मिळवून देणारा हा दिवस!

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय कैद्याचे कुटुंबीय त्यांना भेटणार होते. ही भेट अभूतपूर्व होती आणि त्याबाबत मीडियामध्ये सुरू असलेली चर्चाही अभूतपूर्वच होती.

पाकिस्तानमधल्या अशांत अशा बलुचिस्तान भागातून कुलभूषण जाधव यांना मार्च 2016मध्ये अटक केली. जाधव यांनी या भागात हेरगिरी करत इथलं वातावरण अस्थिर करण्यासाठीच्या कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

या कारवायांमुळे अनेक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगत या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.

हे प्रकरण दोन्ही देशांसाठी इतकं मोठं असल्याने जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबद्दल पाकिस्तानी मीडियामध्येही कुतूहल होतं.

भेटीच्या ठिकाणचं वातावरण!

हे कुतूहल एवढं जास्त होतं की, भेटीच्या नियोजित वेळेच्या तीन तास आधी बीबीसीची टीम तिथे पोहोचली, तर तिथे पाय ठेवायला जागा नव्हती. ही भेट कोणत्याही तुरुंगात नाही, तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात होणार होती.

तीन तास आधी पोहोचतोय, तर कॅमेरा मोक्याच्या ठिकाणी ठेवायला मिळेल, ही आमची आशा तिथली गर्दी पाहून मावळली. मंत्रालयाला पत्रकार, कॅमेरामन यांचा गराडाच पडला होता.

क्रिकेट मॅचच्या वेळी प्रत्येक बॉलचं समालोचन करतात, तसंच या सगळ्या घटनांचं थेट समालोचन सुरू होतं. जाधव यांची बायको आणि आई कोणत्या विमानानं येत आहेत, त्यांचा आसन क्रमांक काय आहे, त्यांच्याबरोबर कोण आहे, याची इत्थंभूत माहिती देणं चालू होतं.

Image copyright TWITTER/PAKISTAN FOREIGN MINISTRY
प्रतिमा मथळा कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी

परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकारांसाठी खास सोयही केली होती. जाधव कुटुंबीयांनी मीडियाशी बोलण्यात रस दाखवला, तर आपली काहीच हरकत नसल्याचंही पाक परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. तसंच याबाबत भारताची अधिकृत भूमिका निर्णायक असेल, असंही सांगण्यात आलं.

जाधव कुटुंबीय गाडीतून उतरण्याची जागा आणि मीडियातील लोक यांच्यात कोणतेही अडथळे ठेवण्यात आले नव्हते. पत्रकारांना एक सीमारेषा आखून दिली होती आणि त्या रेषेपुढे यायचं नाही, असं सांगण्यात आलं होतं.

पुढले दोन तास पत्रकारांची नुसती घालमेल सुरू होती. जरा कुठे गाड्यांचा आवाज आला की, कॅमेरामन एकदम जागा पकडून बसत होते.

त्या आल्या आणि एकच गलका झाला!

आणि अखेर प्रतीक्षा संपली. एक गाडी मंत्रालयाच्या आवारात शिरली आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन थांबली.

गाडी आल्याबरोबर एकच गलका सुरू झाला. चांगली दृष्य मिळावीत यासाठी कॅमेरामन ओरडून ओरडून पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बाजूला व्हायला सांगत होते आणि त्यांच्या आवाजावर आवाज चढवून पत्रकार आपले प्रश्न विचारत होते. पण कोणीही ती सीमारेषा ओलांडून पुढे गेलं नाही.

कुलभूषण यांच्याशी भेट आटोपून कुटुंबीय परत निघाले तेव्हाही याचीच पुनरावृत्ती झाली.

त्यांची आई आणि बायको गाडी येईपर्यंत प्रवेशद्वारापाशीच थांबल्या होत्या. पत्रकारांनी जोरजोरात त्यांच्या दिशेने प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरुवात केल्या. प्रचंड गलका सुरू झाला. पण त्या दोघीही खूप शांत होत्या.

आपल्या मुलाची आणि नवऱ्याची भेट घेऊन परतणाऱ्या त्या दोघींच्याही चेहऱ्यावरचे गंभीर भाव दुरूनही दिसत होते. त्यांना विचारले गेलेले प्रश्न असंयुक्तिक, अवमानजनक आणि पत्रकारितेच्या मूल्यांची पायामल्ली करणारे होते, तरीही त्यांचा संयम ढळला नाही.

"तुमच्या खुनी मुलाला भेटून तुम्हाला कसं वाटतंय?", एका महिला पत्रकाराने ओरडून विचारलं. "अनेक निष्पाप पाकिस्तानी नागरिकांच्या रक्ताने तुमच्या नवऱ्याचे हात माखले आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय आहे," दुसऱ्याने विचारलं.

परराष्ट्र मंत्रालयाच्या आवारातून त्यांच्या गाड्या बाहेर पडताना काही पत्रकारांनी तर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.

घडल्या प्रकाराचा निषेध खरं तर तिथल्या तिथेच झाला. तिथे उभ्या असलेल्या अनेक पत्रकारांनी या घोषणाबाजीवर थेट ताशेरे ओढले. या अशा घोषणा देणं पत्रकारितेच्या मूल्यांविरुद्ध आहे, असं तिथल्या तिथे सुनावण्यात आलं.

पाकिस्तानमधल्या इतर पत्रकारांनी त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला.

हे कृत्य काही मोजक्या लोकांचं आहे, पाकिस्तानमधले माध्यम प्रतिनिधी एकजात असे नाहीत, हे सगळ्यांना आणि खासकरून शेजारी देशातल्या पत्रकारांना कळावं, हादेखील यामागचा हेतू होता.

पण त्यानंतर तीन दिवस शेजारी देशात जे काही घडलं किंवा घडवण्यात आलं, तेसुद्धा तेवढंच अस्वस्थ करणारं होतं.

Image copyright RSTV
प्रतिमा मथळा सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका केली

प्रश्न विचारणाऱ्यांचे, घोषणा देणाऱ्यांचे आवाज वाढवण्यात आले, त्याला म्युझिकची आणि साऊंड इफेक्ट्सची जोड देण्यात आली, त्या व्हीडिओला अतिरंजित करून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलं. हे व्हीडिओ सारखे सारखे दाखवले जात होते.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधल्या पत्रकारांसाठी या बातमीचे राजकीय संदर्भ वेगळे होते. एका देशाचा 'हिरो' हा दुसऱ्या देशासाठी 'व्हिलन' असतो.

पाकिस्तानच्या नॅशनल प्रेस क्लबचे अध्यक्ष शकील अंजुमन म्हणतात, "हा प्रकार म्हणजे दोन देशांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होता. मीडियाला याचा भाग करण्यासारखी दु:खद गोष्ट नाही."

दोन्ही देशांमधल्या पत्रकारांमध्ये प्रशिक्षणाचा, जागरूकतेचा अभाव असणं, हा आणखी एक दोष आहे, असं त्यांना वाटतं. काही प्रश्न खूपच वाईट होते, पण त्यावरून पाकिस्तानमधल्या पत्रकारितेचा दर्जा जोखणं योग्य नाही, असंही ते म्हणतात.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)