बाप रे! त्याला मिळाली 13,275 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

Money Image copyright PAULA BRONSTEIN/GETTY IMAGES

थायलंडमधल्या कोर्टानं आर्थिक फसवणूक करणाऱ्याला एका व्यक्तीला तब्बल 13,275 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पुदित कित्तीथ्रादिलोक नावाच्या 34 वर्षांच्या व्यक्तीने गुंतवणुकदारांना अवाजवी व्याजदराचं आमिष दाखवून फसवलं. सुमारे 40 हजार लोकांनी त्याच्या कंपनीमध्ये 1021 कोटींची गुंतवणूक केली.

बेकायदेशीर कर्ज देणं आणि अफरातफरीची 2,653 प्रकरणं, अशा दोन गुन्ह्यांमध्ये कोर्टानं पुदितला दोषी ठरवलं. आणि त्याला 13,275 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली.

पण त्यानं स्वत:चा गुन्हा कबूल केल्यानं त्याची शिक्षा निम्म्याने कमी करून 6637 वर्षं करण्यात आली.

अर्थात, थायलंडमधल्या कायद्यानुसार, एका गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा देता येते.

थाई नियमांप्रमाणे अशा प्रकारच्या प्रत्येक दोन गुन्ह्यांसाठी 20 वर्षांची शिक्षा होते. पुदितच्या नावावर 2,653 गुन्हे आहेत. त्यामुळे त्याला दर दोन गुन्ह्यांसाठी 20 या न्यायाने 13,265 वर्षं शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, पुदीतची कंपनी वेगवेगळ्या विषयावरील चर्चासत्र आयोजित करायची.

त्यात तो सहभागी होणाऱ्यांना प्रॉपर्टी, वापरलेल्या गाड्या, सौंदर्य प्रसाधनं यांच्याशी निगडित व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यायचा.

बँकॉक पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, तो गुंतवणूकदारांना घसघशीत परताव्याचं आश्वासन द्यायचा, शिवाय आणखी सदस्यांना सोबत आणल्यास सवलती देण्याचं आमिषही दाखवायचा.

कोणत्याही पिरॅमिड योजनेप्रमाणे, नव्यानं आलेल्या पैशांतून तो जुनी देणी फेडायचा.

पुदितला ऑगस्टमध्ये अटक झाली होती. त्याला जामीन नाकारण्यात आल्यानं बँकॉकमधल्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

कोर्टानं त्याच्या दोन कंपन्यांना प्रत्येकी सुमारे 130 कोटींचा दंड ठोठावला. तसंच 2,653 जणांना 7.5 टक्के दरानं 108 कोटी रुपये परत करण्याचेही आदेश कोर्टानं त्याला दिले आहेत.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)