पॅलेस्टाईनची राजदूतांना अमेरिकेतून माघारी बोलावण्याची घोषणा

जेरुसलेम Image copyright Getty Images

अमेरिकेतून राजदूतांना परत बोलावण्याची घोषणा पॅलेस्टाईननं केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विचारविनिमयासाठी त्यांना परत बोलावण्यात आलं आहे.

जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर काही आठवड्यांतच पॅलेस्टाईननं ही घोषणा केली आहे.

पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या या भूमिकेनंतर ते अमेरिकेच्या कोणत्याच शांती योजना स्वीकारणार नाहीत.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा गाझा पट्टयात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विरोध

पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांनी पॅलस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) चे राजदूत हुसम जोमलोट यांना अमेरिकेतून बोलावून घेतलं आहे, असं वृत्त पॅलेस्टिनी वृत्तसंस्था 'वफा'नं दिलं आहे.

'जेरुसलेमला राजधानी मानणार नाही'

ट्रंप यांच्या जेरुसलेमबाबतच्या घोषणेनंतर गाझा पट्टयात अनेक चकमकी झाल्या. त्यात कमीत कमी 13 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. बहुतांश मृत्यू इस्राईलच्या संरक्षणदलांबरोबर झालेल्या चकमकींदरम्यान झाले होते.

यादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आलेल्या एका प्रस्तावानुसार अमेरिकेच्या जेरुसलेमला इस्राईलची राजधानी मानण्याच्या निर्णयाला बहुमताने नकार देण्यात आला होता.

पॅलेस्टाईन पूर्व जेरुसलेमला आपल्या आगामी स्वतंत्र राष्ट्राची राजधानी मानतं. शांतता प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात याबाबत चर्चा होणार असल्याचं मानलं जात होतं.

जेरुसलेम हा सार्वभौम इस्राईलचा अविभाज्य भाग आहे हे आंतरराष्ट्रीय समुदायानं अद्याप मान्य केलेलं नाही. अजूनही सर्व देशांचे दूतावास इस्राईलच्या तेल अवीव या शहरात आहेत. अमेरिकेचा दूतावास तिथून जेरुसलेमला हलवण्याच्या सूचना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)