अणूबाँबचं बटण माझ्या हातात : किम जाँग उन यांची नवी धमकी

किम जाँग उन यांचं भाषण ऐकताना नागरिक. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किम जाँग उन यांचं भाषण ऐकताना नागरिक.

"एक बटन दाबताच आपण हल्ला करू शकतो ज्यामुळे अमेरिकेला कधीच युद्ध सुरू करता येणार नाही", असं विधान उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग उन यांनी केलं आहे.

नववर्षाच्या निमित्ताने टीव्हीवरून दाखवण्यात आलेल्या एका भाषणात किम म्हणाले की, संपूर्ण अमेरिका उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या टप्प्यात आहे. "ही धमकी नाही, वास्तव आहे" असंही ते म्हणाले.

पण दुसरीकडे आपण दक्षिण कोरियाबरोबर चर्चेसाठी तयार असल्याचंही ते म्हणाले.

सोलमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक खेळांसाठी उत्तर कोरिया आपला संघ पाठवू शकेल असा संकेतही त्यांनी दिला.

किम यांच्या धमकीवर प्रतिक्रिया विचारली असता, "बघू काय करायचं ते", असं उत्तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिलं.

फ्लोरिडामधल्या मार-आ-लागो येथील आपल्या रिसॉर्टमध्ये 'न्यू यिअर्स इव्ह'च्या पार्टीत ट्रंप बोलत होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप.

अण्वस्त्र कार्यक्रमामुळे आणि सतत केल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे उत्तर कोरियावर गेल्या वर्षात अनेक निर्बंध लादले गेले.

राजकीयदृष्ट्या एकट्या पडलेल्या उत्तर कोरियाने ६ भूमिगत अण्वस्त्र चाचण्या केल्या आहेत, तसंच अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्र चाचण्याही केल्या आहेत.

नोव्हेंबरमध्ये उत्तर कोरियाने हॉसाँग-१५ या क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्याने 4475 किलोमीटर इतकी उंची गाठली जी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपेक्षाही अधिक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन.

पूर्ण क्षमतेची अण्वस्त्रं आपल्याकडे असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर कोरिया असा हल्ला करू शकेल की नाही याबाबत साशंकता आहे.

अण्वस्त्रसज्जतेवर आपल्या भाषणात भर देताना किम म्हणाले, "उत्तर कोरियाने अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती झपाट्याने करून ती वेगाने तैनात करावीत."

उत्तर आणि दक्षिण कोरियात तणाव कायम असला तरी येत्या वर्षात उभयपक्षीय संबंध सुधारतील असेही संकेत त्यांनी दिले.

"2018 हे दोन्ही कोरियांसाठी महत्त्वाचं वर्ष आहे. उत्तर कोरिया आपला ७० वा स्थापनादिवस साजरा करेल आणि दक्षिण कोरिया ऑलिंपिक खेळांचं आयोजन करत आहे" असा उल्लेख त्यांनी केला.

फेब्रुवारीत होणाऱ्या ऑलिंपिक खेळांसाठी उत्तर कोरियाचा संघ पाठवण्याचा आपण विचार करू, असंही किम यांनी सूचित केलं. दक्षिण कोरियाने या शक्यतेचं याआधीच स्वागत केलं आहे.

दक्षिण कोरियाप्रती वर्षभर आक्रमक पवित्रा घेतलेल्या किम यांच्या बोलण्यातल्या हा फरक लक्षात घेण्याजोगा आहे.

"उत्तर कोरियाचे खेळाडू ऑलिंपिक खेळात सहभागी झाल्यास त्यातून कोरियन लोकांचं ऐक्य दाखवण्याची एक चांगली संधी मिळेल. हे खेळ यशस्वी ठरावे अशा आमच्या शुभेच्छा," असंही किम यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

"चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने भेटावं", अशीही सूचना त्यांनी केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)