न्यूटनविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

न्यूटन Image copyright BBC iwonder

गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आईनस्टाईनला गणिताचा कुठलाही उपयोग झाला नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी केलं.

त्यानंतर काँग्रेसनं त्यावर ट्वीट करून आईनस्टाईने नाही, तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि त्यासाठी त्याला गणिताचा नक्कीच उपयोग झाला असं प्रत्युत्तर दिलं.

त्यानंतर सोशल मीडियावर आईनस्टाईन आणि न्यूटन यांच्याविषयी लोकांनी बोलायला सुरुवात केली. प्रत्यक्षात गुरुत्वाकर्षणाचा प्राथमिक शोध न्यूटननं लावला. आईनस्टाईननं त्यावर पुढे संशोधन केलं


आयसॅक न्यूटन नसता तर आपलं आयुष्य कसं असतं याची कल्पना करणं देखील अवघड आहे. न्यूटननं गती आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. न्यूटनचे शोध हे आजच्या आधुनिक युगाचा पाया समजले जातात.

न्यूटन हा प्रतिभावान होता यात शंका नाही, पण त्याच्या नावाभोवती गूढतेचं वलय होतं. "ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी समजून घेण्यास फक्त आपणच समर्थ आहोत," असं न्यूटनला वाटत असे.

जगाकडे पाहण्याचा एक बुद्धिवादी दृष्टिकोन देणारा न्यूटन, वैयक्तिक आयुष्यात मात्र तर्कनिष्ठ नव्हता, असं म्हटलं जातं. हेवेदावे, भांडणं आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वाट्टेल ते पणाला लावण्याची तयारी असं न्यूटनचं वर्णन केलं जात असे. बीबीसीच्या "iWonder" या वेबसाइटनं न्यूटनच्या गूढ व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या माहितीवर आधारित हा लेख.

न्यूटनचा जन्म

न्यूटनचा जन्म इंग्लंडमधील लिंकनशायरमधील वूल्सथॉर्प या ठिकाणी 4 जानेवारी 1643 रोजी झाला.

Image copyright Hulton Archive/getty
प्रतिमा मथळा लिंकनशायरच्या वूल्सथॉर्प या गावात न्यूटनचा जन्म झाला होता. ( न्यूटनच्या घराचं चित्र)

सध्या प्रचलित असलेल्या कालगणनेनुसार न्यूटनचा जन्म 4 जानेवारीचा. पण तत्कालीन दिनदर्शिकेनुसार तो ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेस 25 डिसेंबरला जन्माला आला.

जन्मल्यावर न्यूटनची प्रकृती अत्यंत नाजूक होती. न्यूटन जगेल की नाही हे सांगता येणं कठीण होतं. त्याबरोबरच इंग्लंडमध्ये गृहयुद्ध सुरू होतं. लिंकनशायरच्या वूल्सथॉर्प या गावात रोगराई पसरली होती. या गावाला प्लेगनं पछाडलं होतं. अशा स्थितीत न्यूटन वाचणार की नाही असं वाटत होतं.

सावत्र वडिलांचा तिरस्कार

न्यूटनची आई गरोदर असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. न्यूटन तीन वर्षांचा झाल्यानंतर न्यूटनच्या आईनं दुसरं लग्न केलं. न्यूटन आपल्या सावत्र वडिलांचा तिरस्कार करत असे. हा तिरस्कार इतका टोकाला गेला, "मी तुमचं घर जाळून टाकीन." अशी धमकी न्यूटननं दिली होती.

घरात कलहाची स्थिती असल्यामुळे न्यूटन आपला वेळ पुस्तक वाचण्यात घालवायचा. तो कधीच कथा, कादंबऱ्या आणि कवितांमध्ये रमला नाही. विज्ञान आणि गणिताची पुस्तकं वाचण्याचा त्याला छंद जडला होता. न्यूटनच्या आईला वाटत असे की त्याने आपलं शेत सांभाळावं पण न्यूटनच्या शिक्षकांनी त्याची प्रतिभा ओळखली होती. त्यानं पुढं खूप शिकावं असं त्याच्या शिक्षकांना वाटत असे.

ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश

केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्याच्या विचारांना दिशा मिळाली.

Image copyright Peter Macdiarmid/getty
प्रतिमा मथळा न्यूटनचं हस्ताक्षर

त्या ठिकाणी त्याची ओळख गणिताचे प्राध्यापक आयझॅक बॅरो यांच्यासोबत झाली. न्यूटनची अभ्यासातली गती पाहून ते भारावून गेले. गणितातील खूप कठीण प्रश्न ते त्याला सोडवण्यासाठी देत.

निरीक्षण क्षमतेवर विश्वास

1665 साली केंब्रिजमध्ये प्लेगची साथ पसरली आणि त्या काळात कॉलेज बंद झालं. नाईलाजानं न्यूटनला घरी परतावं लागलं. वाचनापेक्षा निरीक्षणाने ज्ञान मिळतं असं या काळात न्यूटनला वाटायला लागलं.

त्यामुळे न्यूटनने अभ्यास कमी करून वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. याच काळात न्यूटननं आधुनिक 'कॅलकुलस' या प्रणालीचा पाया रचला पण याबाबत त्याने कुठेही वाच्यता केली नाही.

टेलिस्कोपचा शोध

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा न्यूटनचं टेलिस्कोप आधीच्या टेलिस्कोप पेक्षा 10पट लहान होतं.

न्यूटनने पुन्हा संदर्भासाठी पुस्तकांचा संदर्भ घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. त्याचबरोबर प्रयोगही सुरू ठेवले. त्यातूनच एका नव्या प्रकारच्या टेलिस्कोपचा न्यूटनने शोध लावला.

हे टेलिस्कोप आधीच्या टेलिस्कोप पेक्षा 10 पट लहान होतं. पण त्याहून ते शक्तिशाली होतं. न्यूटनच्या शोधाबद्दल रॉयल सोसायटीला कळलं. त्यांनी न्यूटनचं कौतुक केलं होतं.

टीका सहन होत नसे

टेलिस्कोपच्या शोधानंतर न्यूटन रॉयल सोसायटीचा सदस्य बनला. रॉयल सोसायटीचं सदस्यत्व प्रतिष्ठित वैज्ञानिकांनाच दिलं जातं. एकमेकांच्या कार्याचा अभ्यास करणं आणि त्यावर अभिप्राय देणं अशी पद्धत इथं आहे.

पेशींचा शोध लावणारा वैज्ञानिक रॉबर्ट हूक हा न्यूटनचा समकालीन होता. न्यूटनच्या प्रकाश आणि रंगाच्या प्रयोगावर त्याने काही प्रश्न उपस्थित केले. त्या गोष्टीचा न्यूटनला राग आला. रॉबर्ट हूकसोबत असलेले त्याचे संबंध बिघडले ते बिघडलेच. न्यूटन खूप चिडत असे. आपणच बरोबर आहोत असा दृढविश्वास त्याला होता त्यामुळे तो कुणाचंच ऐकत नसे.

एकांतवास

न्यूटनला लोकांमध्ये मिसळणं आवडत नसे. त्यामुळे तो 1679मध्ये आपल्या वूल्सथॉर्पच्या घरी परतला. या काळात त्याने शिसे या धातूपासून सोनं बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगांना 'अलकेमी' असं म्हटलं जात असे.

काही लोकांची अशी धारणा होती की योग्य प्रयोग केल्यास शिशापासून सोनं तयार होऊ शकतं. न्यूटननं आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षं यासाठी खर्च केली. काही जण म्हणतात याच काळात त्याने गतीच्या आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा शोध लावला, पण त्याबाबत तो कुठं बोलला नाही.

जर्मन गणितज्ञ गॉटफ्राइड लीबनिझ याच्याशी वैर

जर्मन गणितज्ञ गॉटफ्राइड लीबनिझने कॅलकुलसचा सिद्धांत मांडला. तो प्रसिद्ध झाल्यावर न्यूटन म्हणाला ही पद्धत माझ्या कॅलकुलसच्या पद्धतीवरून चोरली गेली आहे.

Image copyright BBC i wonder
प्रतिमा मथळा न्यूटन आणि गॉटफ्राइड लीबनिझ या दोघांमध्ये हाडवैर होतं.

20 वर्षांपूर्वी आपण हा शोध लावला आहे असा दावा त्यानं केला. पण न्यूटननं त्याचं कार्य प्रसिद्ध केलं नव्हतं. आपल्या जुन्या वह्या त्यानं सर्वांना दाखवल्या आणि आपणच हा शोध लावला आहे असं त्यानं सर्वांना सांगितलं.

'प्रिन्सिपिया' या ग्रंथाचे प्रकाशन

फिलॉसॉफी नॅच्युरालीस प्रिंसिपिया मॅथेमॅटिक्स किंवा प्रिन्सिपिया हा न्यूटनचा ग्रंथ 1687 साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथावर आधुनिक विज्ञानाचा पाया रचला गेला आहे असं म्हटलं जातं.

Image copyright Daniel Berehulak
प्रतिमा मथळा फिलॉसॉफी नॅच्युरालीस प्रिंसिपिया मॅथेमॅटिक्स किंवा प्रिंसिपियाचं एक प्रत.

प्रिंसिपिया लिहिण्यासाठी न्यूटनला दोन वर्षं लागली. पण हा ग्रंथ न्यूटनच्या दोन दशकांच्या चिंतनाचं फळ होतं असं म्हणतात. याच पुस्तकात त्यानं गतीचे तीन नियम आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांची उकल केली होती.

राजकारणात प्रवेश

1689 पर्यंत न्यूटनला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या प्रसिद्धीचा वापर राजकारणासाठी करावा असा विचार त्याच्या मनात आला. तो खासदार म्हणून निवडून गेला. पण हाउस ऑफ कॉमन्समध्ये त्याला काही प्रभाव पाडता आला नाही.

मानसिक आरोग्यावर परिणाम

1693मध्ये तो निराशाग्रस्त झाला. त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. तो सलग पाच दिवस जागाच होता. बुद्धीला थकवा आल्यामुळे त्याला नैराश्य आलं. असं असलं तरी त्याचा परिणाम त्याच्या सार्वजनिक आयुष्यावर झाला नव्हता. त्याला एक नवी जबाबदारी मिळाली होती.

आर्थिक संकट सोडवलं

ब्रिटनमध्ये शाही टाकसाळीकडून (रॉयल मिंट) चलन वितरित केलं जात असे. 1696 ते 1699 या काळात न्यूटनने शाही टाकसाळीचा प्रमुख (वॉर्डन ऑफ रॉयल मिंट) ही जबाबदारी पार पाडली. त्या वेळी ब्रिटन एका विचित्र आर्थिक संकटातून जात होतं. त्यावेळी बाजारात 10 टक्के खोटी नाणी होती.

Image copyright Matt Cardy/getty
प्रतिमा मथळा 1696 ते 1699 या काळात न्यूटन रॉयल मिंटचा प्रमुख होता.

नाणं चलन म्हणून वापरण्यापेक्षा त्याला वितळवून धातू विकणं जास्त फायदेशीर ठरत असे. म्हणजे नाण्यातील धातूची किंमत दर्शनी मूल्यापेक्षा जास्त होती.

न्यूटनला ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने जुनी नाणी बदलून नवी नाणी बाजारात आणली. ते काम न्यूटननं खूप सफाईनं केलं. या कामामुळे न्यूटनला मास्टर ऑफ मिंट हे पद बहाल करण्यात आलं आणि या पदावर तो अखेरपर्यंत होता.

रॉयल सोसायटीचा अध्यक्ष

1703 मध्ये न्यूटन रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनला. अध्यक्ष बनल्यावर त्याने आपल्या शत्रुंचं महत्त्व कमी करण्यास सुरुवात केली. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी काहीही करण्याची न्यूटनची तयारी होती.

न्यूटनचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली होतं. नव्या पिढीतील वैज्ञानिकांना न्यूटनचं आकर्षण होतं. ते सतत त्याच्या भोवती गराडा घालत आणि आपल्या नव्या संकल्पना त्याच्याजवळ सादर करत.

इतिहासाचं पुनर्लेखन

रॉयल सोसायटीचं अध्यक्षपद आपल्या हाती आल्यावर आपल्या विरोधकांना नमवण्याची नामी संधी त्याच्या हाती आली. कॅलकुलसचा शोध कुणी लावला याचा तपास करण्यासाठी न्यूटननं एका समितीची स्थापना केली.

"जर्मन गणितज्ञ लीबनीजच्या आधी न्यूटनने कॅलकुलसचा शोध लावला," असा निर्वाळा या समितीनं दिला. लीबनीजने हा निर्णय मान्य केला नाही. आता असं म्हटलं जातं की या दोघांनीही स्वतंत्ररित्या कॅलकुलसचा शोध लावला आहे.

सफरचंदाच्या कथेचा जन्म

Image copyright Hulton Archive/getty
प्रतिमा मथळा सफरचंद खाली पडताना पाहून आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध.

न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. एक सफरचंद झाडावरून खाली पडलं आणि त्यातून त्याला गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची कल्पना सुचली अशी कथा तुम्ही ऐकली असेल.

असं म्हटलं जातं न्यूटननंच ही कथा पसरवली. रॉयल सोसायटीमध्ये जेवत असताना त्यानं ही कथा विल्यम स्टकलेला सांगितली. पुढे विल्यम स्टकलेनी न्यूटनचं चरित्र लिहिलं. त्यात या कथेचा उल्लेख आहे. तिथून पुढे न्यूटन म्हटलं की सफरचंद असं समीकरणंच बनलं होतं.

राष्ट्रीय नायक म्हणून गौरव

84व्या वर्षी न्यूटनचं निधन झालं. सरकारी इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यूटनने लावलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या आधारावरच आजच्या विज्ञानाचा पाया रचला गेला आहे.

न्यूटन हा धार्मिक होता. ईश्वराच्या शब्दांचा अर्थ लावण्यासाठीच आपला जन्म आहे अशी त्याची धारणा होती. धार्मिक पुस्तकं आणि विज्ञानाचा एकाच वेळी तो अभ्यास करत असे. या विश्वाचं कोडं उलगडण्यासाठी धर्मशास्त्र आणि विज्ञान आपल्याला मदत होईल असं त्याला वाटत असे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)