पाकिस्तान सुरक्षा समितीच्या बैठकीत अमेरिकेवर ताशेरे

शाहिद अब्बासी Image copyright GoP
प्रतिमा मथळा पंतप्रधान शाहिद अब्बासी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला उद्देशून केलेल्या ट्विटसमुळे जगभरात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेण्यात आली.

देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढच्या धोरणांचा निर्णय घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीला परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ, गृहमंत्री प्रा. अहसान इक्बाल तसेच लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती.

Image copyright Getty Images

अमेरिकेनं पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला. कट्टरवादाविरुद्ध पाकिस्ताननं मोठा लढा दिला आहे. पाकिस्ताननं केलेल्या बलिदानाकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करता येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं.

या बैठकीत या मुद्दयांवर चर्चा झाली -

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या दक्षिण आशियाच्या धोऱणामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी तसंच अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत झाली.
  • अमेरिकेनं पाकिस्तानबाबत केलेलं वक्तव्य हे अनाकलनीय आहे. या वक्तव्यामुळे प्रादेशिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना तडा जाणार आहे.
  • पाकिस्ताननं केलेल्या दहशतवाद विरोधी अभियानाची अमेरिकेनंही पूर्वी दखल घेतली होती. पाकिस्तानमुळेच अफगाणिस्तानात असलेल्या दहशतवादी संघटनांना लगाम बसला आहे.
  • अफगाणिस्तानातील कट्टरवादी संघटनांनी पाकिस्तानवर सीमेपलीकडून वेळोवेळी हल्ला केला आहे. त्यासाठी त्यांनी अफगाणिस्तान येथील निर्वासितांना सतत पाकिस्तानमध्ये पाठवलं. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक पातळीवर संघर्ष करावा लागला आहे.
  • पाकिस्ताननं दहशतवादाविरुद्धचा हा लढा स्वबळावर लढला आहे. हा लढा लढण्यासाठी पाकिस्तानातील अनेकांना जीव गमवावा लागला. मोठं आर्थिक नुकसान झालं. या सगळ्या लढ्याची किंमत पैशात करता येणार नाही.
  • अमेरिकेची ही वक्तव्यं म्हणजे पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या बलिदानाचा अपमान करणारी आहे.
  • अमेरिकेनं सुरू केलेल्या कट्टरवादविरोधी अभियानाला पाकिस्ताननं कायमच पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम संवाद साधत अभियानात पाकिस्ताननं सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून या भागातून अल कायदाचं अस्तित्व पूर्णपणे संपलं आहे.
  • अफगाणिस्तानात भ्रष्टाचार, राजकीय संघर्ष, ड्रग्जचं वाढतं उत्पादन आणि कट्टरवादी संघटनांचा वाढता वावर ही मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे शेजारी राष्ट्रांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी पाकिस्तानला जबाबदार धरणं चुकीचं आहे.

अशा निराधार आरोपांनंतर सुद्धा अफगाणिस्तानातील कट्टरवादाविरुद्ध लढा चालू ठेवणार असल्याच्या भूमिकेवर समितीत एकमत झालं. हा लढा फक्त पाकिस्तानच्या लोकांसाठी नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्याचा निर्धार समितीनं व्यक्त केला.

देशाच्या सुरक्षेसाठी आणि कट्टरवादाशी लढण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार समितीनं केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)