ग्राउंड रिपोर्ट : भीमा कोरेगावातली हिंसा नेमकी कशामुळे भडकली?

चेंबूर

भीमा कोरेगावात 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराचं मूळ वढू या गावात असण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कोणी केले यावरून दोन समाजगटांत अनेक वर्षांपासून वाद आहेत.

'भारिप' बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केले आणि गेल्या आठवड्यात कोरेगांव परिसरात घडलेल्या घटनांच्या चौकशीची मागणी केली आहे.

चौकशीची मागणी

दलित समाजातील गोविंद गायकवाड यांचं स्मरण म्हणून भीमा कोरेगावपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू येथे उभारण्यात आलेली शेड आणि माहिती फलक यावरून गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गटांमध्ये वाद सुरू होता.

"संभाजी महाराजांच्या समाधीचा हा वाद आहे. गोविंद गायकवाड नावाच्या व्यक्तीवरून हा वाद आहे. संभाजी महाराजांचं... सगळं तुकडे तुकडे झालेलं शरीर शिवून अंत्यविधी केला, त्या गोविंद गायकवाडांच्या संदर्भात त्या ठिकाणी वाद चाललेला आहे."

"ती जागा उद्ध्वस्त करण्यात आली. त्यामध्ये मिलिंद एकबोटे होते आणि त्यांच्याचबरोबर संभाजी भिडे होते. त्या प्रकरणात पोलिसांनी केसेस केलेल्या आहेत. एकंदरीत ४९ आरोपी आहेत, ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ जानेवारीच्या आठवडाभर आधी घडलेली आहे. त्याचा परिणाम इथं झाला का हा शोध घेणं त्याच्यातला भाग आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Image copyright BBC/MAYURESH KONNUR

काही स्थानिक गावकऱ्यांनी या ऐतिहासिक संदर्भांना आक्षेप घेतला होता.

"समाधीवरून काहीच वाद नव्हता. पण २८ तारखेला जो एका रात्रीत फलक तिकडे लागला त्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी होती. मग तो बोर्ड काढला गेला. गावात शांतता नांदावी म्हणून पोलिसांनी सगळ्यांची बैठक घेतली आणि गावात शांतता ठेवावी असं ठरलं. वाद फक्त फलकावरून होता आणि गैरसमजातून पुढच्या गोष्टी घडल्या", असं वढूचे ग्रामपंचायत सदस्य असलेले रमाकांत शिवले म्हणाले.

"गायकवाड आणि गावकऱ्यांचे संबंध चांगले आहेत, आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो. पण बाहेरच्या संघटना आल्या, काही वेगळं सांगितलं गेले आणि मग त्या केसेस दाखल झाल्या," असं रमाकांत शिवले म्हणाले.

दुसरी बाजू

या ऐतिहासिक तपशीलांच्या दुसऱ्या बाजूनंही प्रतिक्रिया आहे.

"जो इतिहास संभाजी महाराजांसोबत गोविंद गोपाळांचा होता तो पहिल्यापासून आहे. त्यात नव्यानं काही सांगितलेलं नाही. गोविंद गोपाळांची समाधी तिथं पहिल्यापासूनच आहे. इतिहासातही हा उल्लेख आहे. त्यामुळे नव्यानं काही सांगण्यात आलं हे चुकीचं आहे," पुणे महानगरपालिकेतील RPI आठवले गटाचे नेते डॉ सिद्धार्थ धेंडे म्हणाले.

"हे जे कोणी करत आहे त्यांना या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करायची आहे," असं डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले.

पोलिसांनीही भीमा कोरेगाव युद्धाच्या द्विशतकपूर्ती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा काढायचा प्रयत्न केला होता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी याविषयी 'बीबीसी मराठी'शी बोलताना सांगितलं, "दोन तीन दिवसांपूर्वी वढूमध्ये एका समाधीवरून वाद झाला होता. पण पोलिसांनी योग्य वेळेस हस्तक्षेप केला, कारवाई केली."

"नंतर आम्ही गावातल्या दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र आणून वाद मिटवला होता. काही समाजकंटकांनी जर जाणूनबुजून या मुद्द्यावरून चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस नक्की कारवाई करतील," असं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी याविषयी 'बीबीसी मराठी'शी बोलताना सांगितलं.

तरीही, स्थानिकांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी भीमा कोरेगाव परिसरात काही गटांकडून घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केली. परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली आणि दगडफेक सुरू झाली. अनेक गाड्यांचं नुकसान झालं, काही जण जखमी झाले आणि एका तरूणाचा मृत्यू झाला.

न्यायालयीन चौकशीचे आदेश

या घटनेमागे परिसरात अगोदर घडलेल्या वादांचं कारण आहे का याची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी 'ट्विटर'वर या घटनेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, "भीमा-कोरेगांवच्या लढाईला २०० वर्षं झाल्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील ही कल्पना होतीच. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगत आहेत."

Image copyright BBC/MAYURESH KONNUR

मंगळवारी संध्याकाळी पुण्यातील पिंपरी पोलिस स्टेशनध्ये अनिता साळवे यांच्या फिर्यादीनंतर 'शिवप्रतिष्ठान'चे संभाजी भिडे आणि 'समस्त हिंदू आघाडी'चे मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रोसिटी आणि दंगल घडवणे या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

"कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. हा प्रकार गैरसमजातून घडलेला आहे. झालेला त्रास, झालेल्या मालमत्तेचे नुकसान आणि दंगलीचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे समाजात दुही निर्माण करण्यामागे आणि अफवा पसरवण्यामागे ज्यांचा हात आहे, त्यांच्याबाबत तपास करून पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी समस्त हिंदू आघाडीची मागणी आहे," असं मिलिंद एकबोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)