भारताच्या दबावामुळे माझ्यावर कारवाई : हाफिज सईद

हाफिज सईद Image copyright Getty Images

जमात -उद- दावाचा प्रमुख हाफिज सईदचं म्हणणं आहे की, त्याच्या पक्षाच्या विरुद्ध सुरू असलेली कारवाई अमेरिका आणि भारताच्या दबावाखाली होत आहे.

काही राजकीय लोकांनी त्याच्याविरुद्ध प्रचाराची मोहीम उघडल्याचं हाफिज सईदनं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी बीबीसीशी बातचीत करताना सांगितलं होतं की, हाफिज सईद विरुद्धची कारवाई ही 'ऑपरेशन रद्द- उल- फसाद'चा भाग आहे.

बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी शफी नई जामई यांनी हाफिज सईदला यासंदर्भात विचारलं की, ऑपरेशन रद्द उल फसाद कट्टरवाद्यांविरुद्ध होतं, याचा अर्थ सरकारनं जमात उद दावाला कट्टरवादी संघटना म्हटलं आहे का?

या प्रश्नाला उत्तर देताना हाफिज सईदनं सांगितलं की, त्याच्याकडे अशी कोणतीही नोटीस आलेली नाही आणि या म्हणण्याला कोणताही आधार नाही.

पाकिस्तान भारत आणि अमेरिकेच्या दबावाखाली

बीबीसी उर्दूशी बोलताना हाफिज सईद म्हणाला, "मी तर स्पष्टपणे सांगतो की, अमेरिकेच्या दबावामुळे सर्व गोष्टी होत आहेत. भारत हे सगळं करत आहे आणि आता आमचे संरक्षण मंत्रीसुद्धा त्यांच्या बाजूनेच बोलत आहेत."

Image copyright AFP

त्यानं सांगितलं की, "न्यायालयानं माझी नेहमीच निर्दोष मुक्तता केली आहे, पण काही राजकीय लोक त्यांच्या अजेंड्यावर काम करत आहेत आणि म्हणून माझ्याविरोधात मोहीम सुरू आहे."

सईदनं सांगितलं, "आम्ही काय आहोत, हे साऱ्या जगाला माहिती आहे. जेव्हा पेशावरमध्ये लहान मुलांवर हल्ला झाला तेव्हा सगळ्यांत आधी आम्ही तिथे आम्ही पोहोचलो होतो."

"अशाच प्रकारे आमच्या प्रदेशात आम्ही दहशतवाद संपवण्यासाठी साहित्य छापलं. जागोजागी काम केलं. मला नाही माहीत हे लोक आता कोणत्या अजेंड्यावर काम करत आहेत."

'अमेरिकेशी भांडण नाही'

अमेरिका हाफिज सईदवर ड्रोन हल्ला करणार आहे, अशा आशयाच्या बातम्यांविषयी बीबीसीनं हाफिज सईदला विचारलं तेव्हा त्यानं या बातम्यांचं खंडन केलं.

हाफिज सईदनं सांगितलं, "अमेरिकेबरोबर आमचं कोणतंच भांडण नाही. आमच्यात काही वैमनस्य नाही. आमच्या विरोधात कोणी असेल तर तो भारत आहे आणि भारत अमेरिकेला उद्युक्त करू शकतो."

Image copyright AFP

जमात- उद- दावाच्या हक्कानी नेटवर्कच्या बरोबर संबंधांच्या प्रश्नावर हाफिज सईद म्हणाला की, जमात उद दावाचा हक्कानी नेटवर्क आणि अफगाणिस्तानातील परिस्थितीशी कोणताही संबंध नाही. अमेरिकेनं अफगाणिस्तानातून निघून जावं असं मत मात्र त्यानं व्यक्त केलं.

हक्कानी नेटवर्कबरोबर त्यांचं नाव जोडल्याच्या मुद्दयावर सईदनं सांगितलं, "हा हक्कानी लोकांचा प्रश्न आहे."

"ते अफगाणिस्तानात आपल्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहेत. जे काश्मिरमध्ये लढत आहे, त्यांची लढाई आम्ही समजू शकतो. पण त्याचा काही संबंध नाही", असं सईद म्हणाला.

भारत अमेरिकेचं साटंलोटं

हाफिज सईद म्हणाला, "मला याचं एक कारण असं वाटतं की अमेरिकेला हक्कानी नेटवर्कबरोबर अडचण आहे आणि भारताला आमच्याबरोबर अडचण आहे. भारत आणि अमेरिकेचं साटंलोटं आहे."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानची मदत बंद केल्याच्या घोषणेवर हाफिज सईद म्हणाला की, कठीण काळी पाकिस्ताननं अमेरिकेची मदत केली आहे पण अफगाणिस्तानच्या अपयशाचं खापर ते आमच्यावर फोडत आहेत.

Image copyright EPA

तो म्हणतो, "अमेरिका हाही आरोप आमच्यावर करत आहे हे अतिशय दु:खद आहे. तुम्हांला यशस्वी तर होता येत नाही पण तिथे अफगाणिस्तानात अयशस्वी झालात तरी सगळा आरोप तुम्ही पाकिस्तानवर लावत आहात. हे अतिशय निराशाजनक आहे."

'काश्मीरचा प्रश्न सुटायला हवा'

भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायला हवेत का, या प्रश्नावर हाफिज सईद म्हणाला की सध्याच्या काळात युद्ध हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही.

सईद म्हणाला, "भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायला हवेत. पण जो मूळ काश्मीरचा मुद्दा आहे तो आधी सुटायला हवा, इतकंच आमचं म्हणणं आहे. आमच्या मताची कोणी दखल घेत नाही हे फारच निराशाजनक आहे."

Image copyright ARIF ALI/AFP/GETTY IMAGES

"सध्याच्या काळात युद्धानं काहीच साध्य होऊ शकत नाही. हेच आम्ही अमेरिकेला सांगतो आणि तेच भारतालासुद्धा सांगतो. बोलून प्रश्न सुटतात."

"प्रत्येक देशाचे स्वत:चे मुद्दे असतात. पाकिस्तानवर बंधनं लादली जावी, युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हावी अशी आमची अजिबात इच्छा नाही. पाकिस्तान आणि भारताचे संबंध मात्र नक्कीच सुधारायला हवे." सईद पुढे म्हणाला.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी बीबीसी प्रतिनिधी फरहत जावेद यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, देशात जमात- उद- दावा यांच्यावर नुकत्याच झालेल्या कारवाईचा संबंध अमेरिकेशी नाही. हा ऑपरेशन रद्द-उल-फसाद चा भाग आहे.

त्यांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संघटनांवर बंदी घातली जात आहे पण याबाबतीत पाकिस्तान सावध पावलं उचलत आहे.

ट्रंप यांच्या ट्वीटवर सईद काय म्हणतो?

हाफिज सईद म्हणाला की, कठीणसमयी पाकिस्ताननं अमेरिकेची साथ दिली आहे. पण अमेरिकेच्या अपयशासाठी त्यांना जबाबदार धरलं जात आहे.

तो म्हणाला, "नाटो (NATO)चे सदस्य देश जेव्हा अफगाणिस्तानात आले त्याचबरोबर पाकिस्तानात सुद्धा आले. तेव्हा त्यांना आम्ही हवाईतळ दिले. कराची ते तुर्खमपर्यंत हे सगळे रस्ते आणि सगळं काही आम्ही अमेरिकेच्या हवाली केलं."

Image copyright Getty Images

"इतकं काम केलं, तरीही पाकिस्तानात दहशतवाद फोफावतो आहे. हे सगळे आत्मघातकी हल्लेखोर अफगाणिस्तानातून येत आहेत. पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या लोकांच्या कामाचा परिणाम आम्ही भोगत आहोत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)