अमेरिकेने पाकिस्तानची मदत रोखली, जुन्या मित्राविरोधात ही भूमिका का?

पाकिस्तान Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाकिस्तानी सैन्याला अमेरिकेकडून मदत मिळते आहे

अमेरिकेनं पाकिस्तानला देत असलेली सगळ्या पद्धतीची मदत रोखण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान आपल्या भूमीतून कट्टरवाद संपवण्यात अयशस्वी झाल्यामुळे ही कारवाई केली जात आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचं म्हणणं आहे.

हक्कानी नेटवर्क आणि अफगाणिस्तान तालिबानवर कारवाई करत नाही तेव्हापर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानी सैन्याला कोणतीच मदत केली जाणार नाही, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे.

याच आठवड्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या ट्वीटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानवर खोटं बोलल्याचा आणि कट्टरवाद्यांना थारा दिल्याचा आरोप केला होता.

अब्जावधी डॉलरची मदत घेऊनसुद्धा कट्टरवाद्यांना आसरा देत असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं.

निर्णायक पावलं आवश्यक

इतकंच नाही तर ट्रंप प्रशासनाच्या परराष्ट्र विभागाकडून पाकिस्तानला दिली जाणारी 2550 लाख डॉलरची मदत रोखली होती.

Image copyright EPA

पत्रकारांशी बोलताना अमेरिकच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हीथर नावर्ट म्हणाल्या, "जोपर्यंत हक्कानी नेटवर्क आणि अफगाण तालिबान समवेत अन्य कट्टरवादी गटांविरुद्ध निर्णायक पावलं उचलत नाही तोपर्यंत पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखली जाईल." नेमकी किती डॉलरची मदत बंद करणार याचा आकडा सांगायला त्यांनी असमर्थता व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, "आम्ही मानतो की हे गट देशाला अस्थिर करत आहेत आणि अमेरिकेच्या सैन्याला आणि अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत."

सुरक्षा धोरणात इशारा

नुकतंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात सांगितलं होतं, "आम्ही पाकिस्तानवर कट्टरवादाला संपवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना वेग आणण्यासाठी दबाव टाकणार आहोत. कोणत्याच देशाची कट्टरवादी आणि त्यांच्या समर्थनासाठी भूमिका असू शकत नाही."

अमेरिकेचं हे सुरक्षा धोरण समोर आल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी आपल्या अफगाणिस्तान दौऱ्यादरम्यान अफगाणिस्तान सरकारविरुद्ध लढणाऱ्या गटांना सुरक्षित स्थळी जाण्यास मदत न करण्याचं पाकिस्तानला पुन्हा एकदा सांगितलं होतं.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यानंतर पाकिस्ताननं तीव्र प्रतिक्रिया दिली होती. पाकिस्ताननं जारी केलेल्या निवेदनात सांगितलं होतं की उपराष्ट्राध्यक्षांचं हे वक्तव्य अमेरिकेच्या प्रशासनाशी होणाऱ्या सखोल चर्चेच्या विरोधात आहे आणि एकमेकांबरोबर असणारे लोक अशा प्रकारचे इशारे देत नाहीत.

पाकिस्तान कोणाला पाठिंबा देत आहे?

हक्कानी नेटवर्क शेजारच्या अफगाणिस्तानमधील बंडखोर गट आहे. गेली अनेक वर्षं हा गट सीमेपलीकडून कारवाया करत आहे.

हा गट अफगाण तालिबान या इस्लामी कट्टरवादी चळवळीशी संबंधित आहे. या गटापासून अफगाण सरकारला मोठा धोका आहे, असं मानलं जातं. पाकिस्तानी तालिबानी गट या अफगाण तालिबान गटाशी संबंधित आहे आणि ते पाकिस्तानात हल्ले करण्याचा त्यांचा इरादा असतो.

हक्कानी नेटवर्क आणि अफगाण तालिबनाननं अफगाणिस्तानात अनेक हल्ले केले. अनेक अमेरिकन सैनिक त्यात मारले गेले. या गटांना पाकिस्तान आणि विशेषतः त्यांची ISI ही गुप्तचर संघटना सुरक्षा देत असल्याचा दावा अमेरिकच्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच केला आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात मैत्रीपू्र्ण संबंध आहेत- पण हे संबंध काही महिन्यांत बिघडले आहेत.

हक्कानी नेटवर्कच्या एका सदस्याशी संपर्क साधण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अमेरिकेला मज्जाव केल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाईम्सनं दिलं होतं.

पाकिस्तान त्यांना का साथ देत होता?

आपल्या परराष्ट्र धोरणासाठी अफगाण तालिबानला वापरून घेत असल्याचा आरोप पाकिस्तानवर बऱ्याच काळापासून होत आहे. 1979 साली सोव्हिएतनं केलेल्या आक्रमणानंतर ISI नं अफगाणिस्तानातील कट्टरवाद्यांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण दिलं.

2001 सालापासून मात्र पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये झालेल्या युद्धात पाश्चिमात्य देशांना सैन्यबळ पुरवलं आणि अल कायदासारख्या संघटनांशी लढण्यासाठी पाश्चिमात्य देशांना मदत केली होती. असं असलं तरी विश्लेषकांच्या मते, पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या घुसखोरांना आसरा आणि पाठिंबा देणं सुरू ठेवलं होतं.

भारताचा अफगाणिस्तानातला प्रभाव कमी करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)