ऑलिम्पिक पदक गमावलं तर उत्तर कोरियामध्ये मिळते ही शिक्षा!

उत्तर कोरिया, अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, ऑलिम्पिक स्पर्धा Image copyright Reuters
प्रतिमा मथळा ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी 16 पदकं पटकावली आहेत.

उत्तर कोरियासाठी प्रतिमा हा कळीचा मुद्दा आहे. परंतु क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणं यक्षप्रश्न असतो.

उत्तर कोरियाच्या असंख्य खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना गौरवास्पद कामगिरी केली आहे. या खेळाडूंच्या माध्यमातून देशातल्या नेत्यांचं उदात्तीकरण केलं जाऊ शकतं.

परंतु पराभव पदरी पडला तर उत्तर कोरियाची जगभर नाचक्की होते. आणि हा पराभव कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जपान, अमेरिका तसंच दक्षिण कोरियाविरुद्ध झाला तर ते आणखी नामुष्की ओढवणारं असतं.

उत्तर कोरियाचा सख्खा शेजारी आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दक्षिण कोरियातल्या प्योअनचांगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक होणार आहे.

दोन्ही देशांतले संबंध ताणलेले असून, कधीही युद्ध भडकू शकतं अशी परिस्थिती आहे. ऑलिम्पिकच्या निमित्तानं या दोन देशातला संघर्ष निवळू शकतो.

अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रांच्या मुद्यावरून उत्तर कोरियाचा अमेरिका आणि दक्षिण कोरियाशी सातत्यानं संघर्ष सुरू आहे. अपमान आणि धमक्या अशा स्वरुपात दोन्ही देशांदरम्यानचे संबंध तीव्र झाले आहेत.

अशा परिस्थितीत उत्तर कोरियानं दक्षिण कोरियात होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर स्पर्धेतलं प्रदर्शन हा त्यांच्यासाठी राष्ट्रीय प्रतिष्ठेचा मुद्दा असेल. उत्तर कोरियाचे दोन खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

पदक तालिकेत आघाडीवर

उत्तर कोरियाचा संघ 1964 पासून हिवाळी ऑलिम्पिकमध्ये तर 1972 पासून उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. पण पदकतालिकेत ते पिछाडीवर नाहीत.

उत्तर कोरियानं ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 56 पदकांची कमाई केली आहे. यापैकी 16 सुवर्णपदकं आहेत. सकल उत्पन्न आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रदर्शन या निकषांनुसार उत्तर कोरिया सातव्या स्थानी आहे.

उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी बहुतांशी पदकं कुस्ती, वेटलिफ्टिंग, ज्युडो आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये पटकावली आहेत. विशेष म्हणजे हिवाळी ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाच्या नावावर केवळ दोन पदकं आहेत.

अपयशाचं प्रक्षेपण नाही

उत्तर कोरियात, क्रीडा स्पर्धांचं प्रक्षेपण नेहमी उशिरानं दाखवलं जातं. पुढील महिन्यात दक्षिण कोरियातल्या प्योअनचांगमध्ये होणार असलेल्या स्पर्धेत खेळाडूंची कामगिरी लौकिकाला साजेशी नसेल तर प्रक्षेपण लांबवण्यात येईल.

2014 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष फुटबॉलच्या अंतिम फेरीत उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया समोरासमोर उभे ठाकले होते.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा दक्षिण कोरियाची ली इन ज्यू आणि उत्तर कोरियाची होंग उन जाँग यांनी रिओ ऑलिम्पिकवेळी काढलेला हा सेल्फी ऐतिहासिक ठरला होता.

एकमेकांचे कडवे शत्रू असलेल्या दोन देशांचे खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळणार होते. वातावरण कमालीचं तापलं होतं. अत्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या लढतीत दक्षिण कोरियाने 1-0 अशी बाजी मारली. अतिरिक्त वेळेत झालेला गोल निर्णायक ठरला. या पराभवाची बातमी उत्तर कोरियात नाहीशी करण्यात आली.

अंतिम लढतीत कोण जिंकलं याचा उल्लेख उत्तर कोरियात प्रसिद्ध झालेल्या बातम्यात करण्यातच आला नाही असं बीबीसी मॉनिटरिंगचे उत्तर कोरियाचे विश्लेषक अॅलिस्टर कोलमन यांनी सांगितलं. त्यामुळे मॅचचं काय झालं हे उत्तर कोरियात समजू शकलं नाही.

हरलं तर काय?

अव्वल दर्जाच्या क्रीडापटूंना उत्तर कोरियात सन्मानाची वागणूक मिळते. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱ्या क्रीडापटूंना गाडी तसंच घरही मिळतं.

पदकविजेत्यांना खेळाडूंची मोठ्या शहरात भव्य मिरवणूक निघते. देशात कार्यान्वित असलेल्या शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे तसंच महान राजकीय नेत्यांमुळेच हे यश मिळालं आहे असा दावा केला जातो.

ऑलिम्पिक स्पर्धेत सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तुरुंगात पाठवलं जातं अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.

पराभवाची कठोरतेने चिकित्सा केली जाते. "अपयशी ठरलेल्या क्रीडापटूंना छळछावणी शिबिरांमध्ये पाठवलं तर क्रीडापटू घडणारच नाहीत याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली आहे," असं एनके न्यूजसाठी उत्तर कोरिया विशेषज्ञ म्हणून काम करणाऱ्या फ्योडोर टर्टिस्कीय यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचा फुटबॉल संघ

आधुनिक उत्तर कोरियात सर्वसाधारण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई केली जात नाही. त्यांची राष्ट्रीय पक्षातून हकालपट्टीही होत नाही. परंतु पुढच्या वैचारिक बैठकीत कठोर चिकित्सा केली जाते.

गेल्या काही वर्षांत गोष्टी बदलल्या आहेत. 1990 मध्ये बीजिंगमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पराभूत झालेल्या ज्युडोपटूला खाणीमध्ये काम करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. काही दिवसांनंतर या खेळाडूला दोषमुक्त करण्यात आलं.

ऑलिम्पिकमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दोषमुक्त केलं जात नाही. राजनैतिक अधिकाऱ्यांप्रमाणे खेळाडूंच्या कुटुंबीयांना स्पर्धेवेळी त्यांच्याबरोबर जाता येत नाही. त्यांना मायदेशीच राहावं लागतं.

बहिष्कार आणि बॉम्ब

साम्यवादी विचारसरणीचं पालन करणाऱ्या उत्तर कोरियासारख्या देशांनी 1984च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला होता.

रशियाच्या अफगाणिस्तानवरच्या आक्रमणाचा निषेध म्हणून अमेरिकेने 1980 मध्ये रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आयोजित ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता.

याला प्रत्युत्तर म्हणून साम्यवादी विचारसरणीच्या देशांनी अमेरिकेत आयोजित ऑलिम्पिकमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.

Image copyright Getty Images

मात्र चार वर्षांनी म्हणजेच 1988 मध्ये ऑलिम्पिक आयोजनाचा मान दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊला देण्यात आला. या निर्णयामुळे उत्तर कोरियात संतापाची लाट उसळली.

आयोजनाचा मान मिळालेलं शहर बदलावं किंवा आयोजनाचा मान उत्तर आणि दक्षिण कोरियाला संयुक्तपणे मिळावा यासाठी उत्तर कोरियानं मोहीम आखली.

दक्षिण कोरियाच्या ऑलिम्पिक आयोजनात विघ्न आणण्यासाठी उत्तर कोरियाच्या मध्यस्थांनी 1987 मध्ये दक्षिण कोरियात कार्यरत कोरियन एअरलाइन्सचं विमान बॉम्ब उडवलं. यामध्ये 115 जण मृत्यूमुखी पडले.

"विमान उडवण्याच्या कटामुळे दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजेल," असं या कटाचा भाग असणाऱ्या एका महिला मध्यस्थानं बीबीसीला 2013 मध्ये सांगितलं.

दोन देशांतला तणाव निवळणार?

उत्तर कोरियानं पुढील महिन्यात दक्षिण कोरियात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तर दोन खेळाडूंवर त्यांची भिस्त असेल. स्केटिंगपटू किम ज्यू सिक आणि रायोम टेई ओइक हे दोघे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

"हे दोघंही माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आले तेव्हा ते पैलू न पाडलेल्या हिऱ्यासारखे होते. परंतु विश्वविजेता होण्याचं त्यांचं ध्येय होतं," असं त्यांच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत स्वारस्य दाखवलं आहे.

क्षेपणास्त्र चाचणीच्या मुद्यावरून उत्तर कोरियाची अमेरिकेवर सातत्यानं शाब्दिक टोलेबाजी सुरू आहे. हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्तानं जागतिक स्तरावर उत्तर कोरियाची प्रतिष्ठा सुधारावी याकरता किम प्रयत्नशील आहेत.

उत्तर कोरियानं हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर स्पर्धा संहारक शस्त्रांच्या चाचणीविना पार पडेल अशी आशा दक्षिण कोरियाला आहे.

क्षेपणास्त्र चाचण्यांवर बंदी घालण्यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियातर्फे उत्तर कोरियावर सातत्यानं दबाव टाकला जात आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया या युतीला पाचर बसावी यासाठी किम ऑलिम्पिककडे निमित्त म्हणून पाहत आहेत.

हे वाचलं का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
आठवड्या भरातल्या अशा मजेदार गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)