खलील जिब्रानविषयी या 7 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

खलिल Image copyright AFP
प्रतिमा मथळा खलील जिब्रान यांच्या जीवनावर आधारित नाटकातील एक दृश्य.

"स्वतःला आरशात अनादीकाळासाठी न्याहाळणं म्हणजे सौंदर्य. पण तुम्हीच अनादी आहात आणि तुम्हीच आरसा आहात," यासारखी शेकडो वाक्यं लिहिणाऱ्या खलील जिब्रानचा आज (6 जानेवारी) जन्मदिन.

1923 मध्ये खलील जिब्राननं एका काल्पनिक प्रेषितावर आधारलेलं 'प्रॉफेट' हे पुस्तक प्रकाशित झालं आणि तेव्हापासून या काव्यसंग्रहानं जगाला भुरळ घातली आहे. जगातील सर्वांत जास्त विक्री झालेल्या कविता संग्रहामध्ये 'प्रॉफेट'चं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.

Image copyright Gibran national committee
प्रतिमा मथळा खलील जिब्रान

खलील जिब्रान केवळ कवीच नव्हता तर तो तत्त्ववेत्ता, चित्रकार आणि तत्कालीन स्थितीवर भाष्य करणारा एक समाजसुधारकही होता. लहानपणीच आपला देश लेबनॉन सोडून अमेरिकेत आश्रय घेण्याची पाळी त्याच्या कुटुंबीयांवर आली होती.

पण आपल्या देशाशी असलेली त्याची नाळ कधीही तुटली नाही. लेबनॉन आणि सीरियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे प्रयत्न जिब्राननं केले होते. त्याच्या या कार्याचा गौरव म्हणून लेबनॉन सरकारनं आपल्या देशात त्याच्या स्मरणार्थ भव्य संग्रहालय उभारलं आहे.

1. बालपण

६ जानेवारी १८८३ साली लेबनॉनच्या बशारी या गावात खलील जिब्रानचा जन्म झाला होता. तो बारा वर्षांचा असताना त्याच्या तीन भावंडांना घेऊन त्याच्या आईनं लेबनॉन सोडलं आणि अमेरिकेत आश्रय घेतला.

Image copyright Gibran national committee
प्रतिमा मथळा अरेबिक आणि फ्रेंच या दोन भाषांवर लहानपणीच त्याला अवगत झाल्या होत्या.

तीन वर्षांनंतर तो पुन्हा लेबनॉनला परतला. अरेबिक आणि फ्रेंच या दोन्ही भाषांत पारंगत झाल्यावर तो पॅरिसला गेला. तिथं त्यानं चित्रकलेचा अभ्यास केला आणि नंतर तो न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाला, अशी माहिती लेबनॉन सरकारच्या वेबसाइटवर आहे.

१९१८ साली त्याचा पहिला इंग्रजी कविता संग्रह प्रकाशित झाला. नंतर १९२३ला त्याचा प्रॉफेट हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता.

2. प्रॉफेट या काव्यसंग्रहाविषयी

एका गावात थोड्या वेळासाठी 'अल मुस्तफा' हा 'प्रेषित' येतो. त्याच्या बोटीची वेळ झाल्यावर तो निघून जाणार असतो. पण त्याआधी त्याला गावातले लोक भेटायला येतात आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या स्तरावर भेडसवणारे प्रश्न ते त्याच्यासमोर मांडतात.

Image copyright Khalil gibran
प्रतिमा मथळा 'प्रॉफेट' अल मुस्तफाचं जिब्राननं रेखाटलेलं चित्र

सर्वांना तो उपदेश देतो. त्या प्रेषिताचा उपदेश म्हणजेच 'प्रॉफेट' हा कविता संग्रह. जेव्हापासून हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे तेव्हापासून आजतागायत या पुस्तकाची जादू काही ओसरली नाही.

अॅमेझॉनवर देखील हे पुस्तक सर्वाधिक जास्त डाउनलोड झालेल्या पुस्तकांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. प्रॉफेट हा कविता संग्रह आतापर्यंत 50 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित झाला आहे.

3. इंग्रजी शिकून लिहिलं 'प्रॉफेट'

खलील जिब्रानची मातृभाषा अरेबिक होती. तसंच त्याला फ्रेंचही अवगत होती. पॅरिसमध्ये शिक्षण पूर्ण करून १९१०ला न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर त्यानं अरेबिकमधून लिखाणाला सुरुवात केली. आपल्याला इंग्रजीतून लिखाण करायचं आहे अशी इच्छा त्यानं आपली मैत्रिण मेरी हस्केलजवळ व्यक्त केली.

Image copyright Gibran national committee
प्रतिमा मथळा खलील जिब्रान हा उत्तम चित्रकार होता. लेबनॉनच्या राष्ट्रीय स्मारकात त्याच्या 400हून अधिक कलाकृती जपून ठेवण्यात आल्या आहेत.

तिनं त्याला या कामात सर्वतोपरी मदत केली. तो जे काही लिहित असे त्याला ती तपासून देत असे. तीन वर्षे इंग्रजीचा अभ्यास केल्यानंतर त्यानं 'मॅडमन' या कविता संग्रहाच्या लिखाणास सुरुवात केली.

पाच वर्षांच्या परिश्रमानंतर त्यानं आपला पहिला कविता संग्रह 'मॅडमन' प्रकाशित केला. या संग्रहाच्या पाच वर्षानंतर प्रॉफेट प्रकाशित झाला आणि नंतर इतिहास घडला, असं लेबनॉन सरकारनं आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे.

4. रविंद्रनाथ टागोरांशी भेट

खलील जिब्रान राष्ट्रीय संग्रहालयाच्या वेबसाइटनं म्हटलं आहे, "१९२० साली रविंद्रनाथ टागोर आणि खलील जिब्रान यांची अमेरिकेत भेट झाली होती."

Image copyright Getty Images

या भेटीबद्दल खलील जिब्राननं आपल्या मैत्रिणीला सांगितलं होतं, "रविंद्रनाथ टागोरांचं म्हणणं आहे की, अमेरिका हा भौतिकतावादी देश आहे. शरीर आणि आत्मा या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत तर एकच आहे. आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पाहता येऊ शकतं. भौतिकता आणि अध्यात्मिकतेमध्ये द्वंद्व नाही तर त्या गोष्टी एकमेकांना परस्परपूक आहेत."

5. सीरियातील संघर्षावर भाष्य

जवळपास चार वर्षें सीरियावर राज्य केल्यानंतर ओटोमन घराणं सीरिया सोडून जात होतं. हा काळ पहिल्या महायुद्धाचा होता. त्यावेळी जिब्राननं काढलेलं फ्री सीरिया हे चित्र प्रसिद्ध आहे. तसंच आपल्या लिखाणातून आणि नाटकांच्या माध्यमातून त्यानं वेळोवेळी या संघर्षावर भाष्य केल्याची अनेक उदाहरणं इतिहासात आहेत, असं जिब्रान राष्ट्रीय संग्रहालयाच्या वेबसाइटवर म्हटलं आहे.

6. खलील जिब्रान इतका लोकप्रिय आणि प्रभावशाली का आहे?

"खलील जिब्रान हा जगातील सर्वांत लाडक्या कवींपैकी एक आहे," असं ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक मोहम्मद सालेह ओमरी यांनी बीबीसी रेडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

"खलील जिब्रानची शिकवण ही कोणत्याही एका विशिष्ट धर्माची शिकवण नसून शाश्वत मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळेच तो सर्व धर्मियांमध्ये लोकप्रिय झाला," असं ओमरी यांनी म्हटलं.

Image copyright Central Press/getty
प्रतिमा मथळा 60च्या दशकात सुप्रसिद्ध असलेल्या बिटल्स या बॅंडवरही खलील जिब्रानचा प्रभाव होता.

"प्रसिद्ध रॉकबॅंड बिटल्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि इंदिरा गांधी यांच्यावर खलील जिब्रानचा प्रभाव होता," असं ओमरी यांनी या कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं.

7. खलील जिब्रानचा भारतावर प्रभाव

खलील जिब्रानच्या पुस्तकांचा मराठीत देखील अनुवाद झाला आहे. त्याबरोबरच इतर भारतीय भाषांमध्ये खलील जिब्रानचं साहित्य उपलब्ध आहे. "भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर देखील खलील जिब्रानचा प्रभाव होता. भारतातील इंग्रजी वाचकांमध्ये खलील जिब्रान कमालीचा लोकप्रिय आहे," असं दडके इंग्लिश अॅकेडमीचे संचालक संतोष दडके यांनी म्हटलं.

"खलील जिब्राननं आपल्या साहित्य आणि चित्रकलेच्या माध्यमातून सौंदर्य आणि सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून निर्माण झालेल्या शुद्धतेतून त्यांच्या विचारांचं बावनकशी सोनं आपल्याला मिळालं आहे. शाश्वताचा ध्यास असणाऱ्या प्रत्येकालाच तो आपलासा वाटतो. त्यामुळेच खलील जिब्रान हा भारतात लोकप्रिय आहे," असं दडके यांनी म्हटलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)