डोनाल्ड ट्रंप यांच्या मानसिक आरोग्यावर लोक एवढी चर्चा का करतायत?

डोनाल्ड ट्रंप Image copyright EPA

अमेरिकेचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी डोनाल्ड ट्रंप मानसिकदृष्ट्या कणखर आहेत का, हा प्रश्न ट्रंप यांच्या विरोधकांनी याआधीही उपस्थित केला आहे. पण आता त्यावर पुन्हा चर्चा झडू लागली आहे.

न्युयॉर्कच्या एका पत्रकाराने काढलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ट्विटरसह इतर अनेक माध्यमांवर ट्रंप यांच्या मानसिक आरोग्याची चर्चा सुरू झाली आहे.

ट्रंप यांचं तऱ्हेवाईक वागणं, अत्यंत खंबीर व्यक्तिमत्त्व आणि बोलण्याची ढब ही आतापर्यंतच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षापेक्षा वेगळी आहे. त्यांनी राष्ट्रध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अमेरिकेन राजकारणाचा चेहरा बदलला आहे.

पण त्यांच्या याच वैशिष्ट्यांमुळेच विरोधकांना आणि टीकाकारांना त्यांच्या कुवतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी मिळते. एवढंच नाही, तर ट्रंप यांच्या मानसिक आरोग्याचे दाखलेही पुराव्यादाखल दिले जातात.

लोक काय म्हणतात?

न्युयॉर्कमधले पत्रकार मायकल वोल्फ यांनी लिहिलेल्या 'Fire and Fury : Inside the Trump's White House' या पुस्तकानंतर या चर्चेला नव्याने ऊत आला आहे. या पुस्तकाच्या लेखन प्रक्रियेदरम्यान त्यांना अनेकदा व्हाईट हाऊसमध्ये जावं लागलं.

ट्रंप यांची मानसिक शक्ती क्षीण होत चालली आहे, असं त्यांच्या आसपास असलेल्या लोकांना हळूहळू जाणवायला लागल्याचं वोल्फ यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.

पुस्तकाच्या विक्रीसाठीच्या मार्केटिंगदरम्यान वुल्फ यांनी सांगितलं होतं की, 71 वर्षांचे ट्रंप अनेकदा स्वत:च्या गोष्टींची पुनरावृत्ती करतात. अशी पुनरावृत्ती करणं शॉर्ट टर्म मेमरी कमकुवत असल्याचं लक्षण आहे. त्याला इतर घटकही कारणीभूत असतात.

वयाच्या साठीनंतर होणाऱ्या स्मृतिभ्रंशामुळेही हे होत असावं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की, जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी पाच ते आठ टक्के लोकांना साठीनंतर स्मृतिभ्रंश होतो.

वोल्फ यांनी लिहिलं आहे की, "हे सगळ्यांनाच माहिती होतं की ट्रंप सातत्याने आणि अगदी सर्रास पुनरावृत्ती करत आहेत. आधी 30 मिनिटांच्या अंतरात ते त्याच तीन गोष्टी अगदी शब्दन् शब्द एवढंच काय हावभावांसकट पुन्हा सांगायचे. आता हेच प्रमाण 10 मिनिटांवर येऊन ठेपलं आहे."

या कथित पुनरावृत्तीचे इतर कोणतेही संदर्भ वोल्फ यांनी दिलेले नाहीत.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी या पुस्तकाची, त्याच्या लेखकासकट चिरफाड केली आहे. हे पु्स्तक कल्पित आणि असत्य घटनांनी भरलेलं असल्याचं सांगत, आपण वोल्फ यांना व्हाईट हाऊसमध्ये अधिकृतरीत्या कधीच प्रवेश दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुस्तकाच्या टीकाकारांनीही यातल्या गोष्टींच्या स्रोताबद्दलच शंका व्यक्त केली आहे. वोल्फनी वर्णन केलेले प्रसंग त्यांनी प्रत्यक्षात बघितले आहेत का, ते त्या प्रसंगांचे साक्षीदार आहेत का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या पुस्तकातले काही मजकूर हा तर 'कुचाळक्या' असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

ट्रंप काय म्हणतात?

ट्रंप यांनी वॉल्फ यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत आपण 'stable genius' असल्याचं म्हटलं आहे. एका ट्वीटद्वारे त्यांनी हे म्हणणं मांडलं आहे.

ट्रंप म्हणतात, "खरं तर माझ्या संपूर्ण आयुष्यात मानसिक स्थैर्य आणि माझं शहाणपण या दोन गोष्टी नेहमीच माझ्या बाजूने राहिल्या आहेत. विक्षिप्त हिलरी क्लिंटन यांनीही हेच आरोप करण्याचा प्रयत्न केला होता. पण काय झालं, ते लोकांना माहीत आहे. एक यशस्वी उद्योजक ते एक यशस्वी टीव्ही स्टार आणि आता राष्ट्राध्यक्ष, अशी माझी यशस्वी वाटचाल याचं द्योतक आहे."

या आधी काय बोललं गेलं?

अनेक मनोवैज्ञानिकांनी ट्रंप यांच्या वागणुकीतल्या काही लक्षणांबद्दल अंदाज व्यक्त केले होते. ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही काळातच अनेक पुस्तकंही आली होती.

ब्रँडी एक्स ली यांनी लिहिलेलं 'The Dangerous Case of Donald Trump', अॅलन फ्रान्सिस यांचं 'Twilight of American Sanity' आणि कर्ट अँडरसन यांचं 'Fantasyland' ही काही उदाहरणं देता येतील.

येल विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉ. ली यांनी गेल्याच महिन्यात डेमोक्रॅट पक्षाच्या सेनेटरशी बोलताना सांगितलं होतं की, ट्रंप हळूहळू मानसिकदृष्ट्या उघडे पडत आहेत आणि त्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

पण यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, या तिघांपैकी एकानंही ट्रंप यांच्यावर उपचार केलेले नाहीत, किंवा ट्रंप यांच्या मानसिक स्थितीबद्दल त्यांना अगदी जवळून माहितीही नाही.

ट्रंप यांच्यावर उपचार करणाऱ्यांपैकी कोणी काही बोललं, तर ते ना केवळ नीतिमत्तेच्या विरोधात असेल, ते केंद्रीय कायद्यांचंही उल्लंघन असेल.

याचं महत्त्वं काय?

तसं बघायला गेलं, तर या प्रकरणी ट्रंप यांना राष्ट्राध्यक्षपद सोडावं लागू शकतं.

अमेरिकन संविधानात 25व्या घटना दुरुस्तीनुसार जर राष्ट्राध्यक्ष त्यांची कर्तव्य बजावण्यात आणि त्यांच्याकडील अधिकारांचा वापर करण्यात कमी पडत असतील, तर उपाध्यक्षांकडे अधिकार सूत्र सोपवली जातात.

मंत्रिमंडळ आणि उपाध्यक्ष यांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया करावी लागते. अनेकांनी यासाठी आग्रह धरला, तरी हे होणं शक्य नाही.

मानसिक आरोग्यानं कुणी राष्ट्राध्यक्षपद सोडलंय का?

राष्ट्राध्यक्षांचं मानसिक आरोग्य ही समस्या बनण्याचा इतिहास थेट राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यापर्यंत पोहोचतो. लिंकन यांना आलेल्या नैराश्यामुळे त्यांची तब्बेत ढासळली होती.

Image copyright Getty Images

अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं, तर 1981 ते 1989 या काळात राष्ट्राध्यक्ष असलेल्या रोनाल्ड रेगन यांना गोंधळायला व्हायचं. अनेकदा आपण कुठे आहोत, हेदेखील त्यांना सांगता यायचं नाही.

राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पाच वर्षांनी त्यांना अल्झायमर झाल्याचं निदान झालं. पण ही 25वी घटनादुरुस्ती कार्यरत असलेल्या राष्ट्राध्यक्षांना पदच्युत करण्यासाठी कधीच वापरली गेलेली नाही.

ट्रंपबाबतचा पुरावा काय?

ट्रंप यांच्यावर उपचार करणाऱ्यांपैकी कोणीच जाहीरपणे याबाबत बोललेलं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करायला हवं. पण ट्रंप यांच्या वर्तनातील काही गोष्टी विकृत आत्मपूजकतेकडे (Narcissistic Personality Disorder किंवा NPD) झुकणाऱ्या आहेत, असं निरीक्षण काही लोकांनी नोंदवलं आहे.

'सायकॉलॉजी टुडे'च्या म्हणण्यानुसार अशा लोकांच्या स्वभावात खालील गोष्टी आढळतात -

  • स्वत:बद्दलच्या भव्यपणाच्या कल्पना, इतरांबाबत सहृदयतेचा अभाव आणि प्रशंसेची न शमणारी भूक
  • इतरांपेक्षा आपण वरच्या दर्जाचे आहोत, असं त्यांना वाटतं. तसंच सदैव सगळ्यांनी आपल्याला खास वागणूक द्यावी, अशी अपेक्षा असते
  • त्यांना नेहमीच अतिप्रशंसेची हाव असते आणि टीका सहन होत नाही

पण NPDवर लिहिणाऱ्या अॅलन फ्रान्सेस यांच्यानुसार ट्रंप यांना अशा प्रकारचा त्रास वारंवार होत नाही, हे लक्षात आल्यावर ट्रंप यांना NPD आहे, असं ठोसपणे सांगता येत नाही.

"ट्रंप यांना त्यांच्या आत्मस्तुतीमुळे, स्वप्रेमामुळे किंवा इतरांबद्दलच्या सहृदयतेच्या अभावामुळे आतापर्यंत कधीच त्रास झालेला नाही. उलट त्यांना त्याचा फायदाच झाल्याचं दिसतं. त्यांना त्रास होण्याऐवजी इतरांनाच त्याचा त्रास झाला आहे," फ्रान्सेस लिहितात.

वॉल्फ यांच्या पुस्तकामुळे आता काही जण ट्रंप यांच्या आकलनक्षमतेत घट झाली आहे का, असंही विचारू लागले आहेत. याला दुजोरा द्यायला लोक, ट्रंप यांची पुनरावृत्तीची सवय आणि त्यांची बोलण्याची पद्धतीचा दाखला देतात.

न्युरॉलॉजिकल तज्ज्ञांनी ट्रंप यांच्या भूतकाळातल्या काही क्लिप्स त्यांच्या सध्याच्या क्लिप्सबरोबर पडताळून पाहिल्या आणि त्यांना असं लक्षात आलं की, ट्रंप यांच्या बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.

पूर्वी ते अत्यंत गुंतागुंतीची, लांबलचक वाक्य रचना करायचे. लांबलचक विशेषणं वापरायचे. पण आता ते छोट्या छोट्या शब्दांची लहान वाक्यं वापरतात. ते बोलताना काही शब्द त्यांच्या तोंडातून निसटतात, मुद्दा सोडून ते भरकटतात आणि 'the best' सारखी टोकाची विशेषणं वापरतात.

काही तज्ज्ञांच्या मते हे अल्झायमरसारख्या आजारांमुळेही होऊ शकतं, किंवा हा फक्त वाढत्या वयाचा परिणाम असू शकतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ट्रंप यांनी एका भाषणादरम्यान पाण्याचा ग्लास असा विचित्र पद्धतीने उचलला होता.

आपल्या आकलनात झालेली घट लपवण्याचा प्रयत्न राष्ट्राध्यक्ष करतात, असं म्हणणारे आणखी काही प्रसंगांकडे लक्ष वेधतात. असे प्रसंग ज्या वेळी ट्रंप यांना स्वत:च्या हालचालींवर नियंत्रण ठेवणंही कठीण झालं होतं!

डिसेंबरमध्ये घडलेल्या एका प्रसंगात त्यांनी भाषण देताना अत्यंत विचित्र पद्धतीने दोन्ही हातांनी ग्लास उचलला होता. आणखी एका भाषणादरम्यान त्यांनी काही शब्द अक्षरश: बरळल्यासारखे उच्चारले.

घसा सुकल्यामुळे हे असं झालं, असं स्पष्टीकरण व्हाईट हाऊसने नंतर दिलं होतं. पण काही जणांच्या मते हे घसा सुकण्यापेक्षा काहीतरी गंभीर असल्याचं लक्षण असू शकतं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
इस्राईल आणि जेरूसलेमच्या मुद्द्यावर बोलताना ट्रंप यांच्या भाषणाने विशेष लक्ष वेधलं

बोलण्याचा संबंध मेंदुच्या पुढल्या बाजूशी असतो. वयोमानानं आवाज कमी होत जातो. तसंच आवाज खालावण्यासाठी एक विशिष्ट, तुलनेने दुर्मिळ स्मृतिभ्रंशही कारणीभूत असू शकतो.

UKच्या National Health Services नुसार चुकीच्या पद्धतीने किंवा उतावीळपणे वागणं, स्वार्थी किंवा असंवेदनशीलपणा दाखवणं, अतिशयोक्त प्रतिक्रिया देणं, खूप सहजपणे लक्ष विचलित होणं आणि एखादा शब्द बोलताना योग्य ध्वनी फुटण्यास त्रास होणं, ही अशा प्रकारच्या स्मृतिभ्रंशाची लक्षणं आहेत.

राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळायला सुरुवात केल्यापासून पुढच्या आठवड्यात पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रंप यांची शारीरिक चाचणी होणार आहे.

हा वाद योग्य आहे का?

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांच्या म्हणण्यानुसार या गोष्टीवर चर्चा करणं हास्यास्पद आणि लज्जास्पद आहे. "जर ते अपात्र असते, तर ते या पदावर बसूच शकले नसते. रिपब्लिकन पक्षाच्या एकापेक्षा एक सरस उमेदवारांचा पराभव करूच शकले नसते."

काही रिपब्लिकन नेत्यांच्या मते ट्रंप यांच्या मानसिक स्थितीबद्दल व्यक्त केली जाणारी भीती म्हणजे त्यांच्यावर चढवलेला हल्लाच आहे.

गेल्या फेब्रुवारीत ट्रंप यांच्याबद्दलची ही चर्चा ऐकल्यावर कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी डंकन हंटर आणि आयडेहोचे प्रतिनिधी माईक सिंपसन त्यांचं हसणं थांबवू शकले नाहीत. डेमॉक्रेटिक पक्षाकडून हा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचं वृत्त द हिल नावाच्या संकेतस्थळाने दिलं होतं.

हे दोघे वगळल्यास इतर लोक हतबल आहेत.

राष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीदरम्यान जेब बुश यांनी म्हटलं होतं की, ट्रंप यांना उपचाराची गरज आहे. टेनेसीचे प्रतिनिधी बॉब कॉर्कर यांनी या मताला दुजोरा दिला आहे.

बॉब कॉर्कर यांनी ऑगस्टमध्ये ट्रंप यांच्यावर हल्ला चढवत म्हटलं होतं की, राष्ट्राध्यक्षपदासाठी आवश्यक असलेलं मानसिक स्थैर्य दाखवण्यात ट्रंप अपयशी ठरले आहेत.

मानसिक रोगांनी पछाडलेल्यांसाठी हा वाद अत्यंत अन्यायकारक असल्याचं डॉ. फ्रांसिस यांनी म्हटलं होतं. "वाईट वर्तणूक हे काही मानसिक रोगाचं लक्षण नाही. मानसिक रोगी क्वचितच वाईट वर्तणूक करतात," ते म्हणतात.

"मनोरोगाने पछाडलेल्या लोकांची गणना ट्रंप यांच्याबरोबर करणं हा मनोरुग्णांचा अपमान आहे," फ्रांसिस सांगतात.

Image copyright Getty Images

इतरांनीही फ्रांसिस यांच्या म्हणण्याची री ओढली आहे. एका स्तंभलेखकाच्या म्हणण्यानुसार या सगळ्या वादामुळे मनोरुग्ण आणखी कोषात जाण्याची शक्यता जास्त आहे.

पण ट्रंप यांच्या मानसिक स्थितीबद्दल आपलं मत देणाऱ्या व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी हे असं करण्यामागे राष्ट्राला धोक्याची सूचना देण्याचा हेतू आहे.

गोल्डवॉटर नियमाचा भंग

पण हे असं उघड बोलून या मानसशास्त्रज्ञांनी त्यांचाच 'गोल्डवॉटर' नियम मोडला आहे. तुम्ही तपासणी करत नसलेल्या व्यक्तीच्या रोगाबद्दल निदान करणं, हे या नियमानुसार निषिद्ध आहे.

1964मध्ये अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातले दावेदार बॅरी गोल्डवॉटर या पदासाठी मानसिकदृष्ट्या कणखर आहेत का, हे जाणून घेण्यासाठी एका मासिकाने हजारो तज्ज्ञांना विचारलं होतं.

या मासिकात या तज्ज्ञांचं म्हणणं छापून आल्यानंतर बॅरी गोल्डवॉटर यांनी मासिकाच्या संपादकाविरोधात दावा ठोकला होता आणि ते जिंकले होते.

अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या मानसिक आरोग्याचं विश्लेषण करणं हे बेजबाबदार, कलंक लावणारं आणि अनैतिक असल्याचं अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशनने स्पष्ट केलं.

ट्रंप यांच्या मानसिक स्थितीचं निदान दुरून करणं नियमबाह्य आहे, असं मानलं, तरी अनेकांच्या मते, ट्रंप यांच्या मानसिक स्थितीचं निदान करण्याची काही तरी व्यवस्था हवी.

द अॅटलांटिकच्या मते, "राष्ट्राध्यक्ष पदावर असताना त्यांना भ्रम होऊ शकतात. डेव्हिड बोई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली, तर त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल वैद्यकीय जगताला दूरवरून अनुमान काढणं सहज शक्य आहे."

खरं तर त्याबद्दलचा एक कायदा आहे. या कायद्यानुसार ओव्हरसाइट कमिशन ऑन प्रेसिडेंशिअल कपॅसिटी या समितीद्वारे राष्ट्राध्यक्षांच्या एकंदरीत आरोग्याची तपासणी केली जाऊ शकते.

राष्ट्राध्यक्षांचं मानसिक आरोग्य या विषयाला इतकं महत्त्व देऊनही अनेक भाष्यकार याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. वॉशिंग्टन पोस्टमध्ये कार्लोस लोझादा लिहितात, "ट्रंप यांची गैरकृत्यं मानसिक आजार या सबबीखाली दडवणं हे सोपं आहे. हे त्यांना थेट दोषमुक्त करतं."

"आपल्याला एखाद्याचं राजकारण, धोरणं आवडली नाही, तर आपण त्याच्या विरोधात प्रचार करतो. त्याच्या विरोधात मानसशास्त्रीय यंत्रणा वापरत नाही," हार्वर्डमध्ये प्रोफेसर असलेले अॅलन डेरशोविट्झ लिहितात.

ट्रंप यांना पदच्युत करायला 25व्या घटनादुरुस्तीची मदत घ्यावी लागणं, हे म्हणजे आशावादाला वस्तुस्थितीपुढे ठेवण्यासारखं आहे, असंही ते म्हणतात.

पण ते सांगतात, एखादा मोठा मानसिक धक्काच असा क्षण आणू शकतो.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)