स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या मर्यादांना असं बनवलं होतं शक्तिस्थान

फोटो स्रोत, AFP
जगातल्या सर्वाधिक लोकप्रिय वैज्ञानिकांपैकी एक असणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांचं 14 मार्च 2018 रोजी वयाच्या 76व्या वर्षी निधन झालं होतं.
लुसी, रॉबर्ट आणि टीम या त्यांच्या तीन मुलांनी याबाबत माहिती देताना दुःख व्यक्त केलं आहे. "ते एक महान वैज्ञानिक आणि कर्तबगार व्यक्ती होते, त्यांच कार्य यापुढेही सुरू राहील," असं त्यांच्या मुलांनी म्हटलं आहे.
फक्त विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच नाही तर सामान्य लोकांनाही त्यांचं खूप आकर्षण होतं. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यावर आधारित 'थेअरी ऑफ एव्हरीथिंग' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
या विश्वाचं गूढ केवळ एका सिद्धांतामध्ये किंवा थेअरीमध्ये सांगता येईल का? यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं.
त्यांच्या प्रकृतीमुळं त्यांच्यावर अनेक मर्यादा आल्या, पण त्या मर्यादा ओलांडून त्यांनी आपलं कार्य सातत्यानं सुरू ठेवलं होतं.
त्यांच्या या विजिगीषू वृत्तीमुळेच ते लाखो जणांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
बालपण
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये 8 जानेवारी 1942 रोजी झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव.
फोटो स्रोत, Rex Features
स्टीफन हॉकिंग यांचे वडील संशोधक होते.
संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई-बाबांकडून मिळालं. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड.
विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत होते, म्हणून ते या विषयांकडे वळले.
ऑक्सफर्डमध्ये प्रथम क्रमांक
ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. याच ठिकाणी त्यांची ओळख आपली भावी पत्नी जेन यांच्याशी झाली.
जेन या आधुनिक भाषाविज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. न्यू इअर पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं.
फोटो स्रोत, Rex Features
त्यांना मोटार न्यूरॉन डिसीज आहे हे कळलं. या आजारामुळे हळुहळू आपलं शरीर पक्षाघातानं ग्रस्त होईल असं त्यांना समजलं.
"तुमचं आयुष्य केवळ दोन वर्ष उरलं आहे," असं त्यांना डॉक्टरांनी म्हटलं. त्यावेळी त्यांचं वय होतं 21 वर्षं. अशा परिस्थितीही जेन यांनी त्यांची साथ सोडली नाही.
हॉकिंग यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी हॉकिंग यांना हातात काठी घेऊन चालावं लागलं होतं.
मर्यादांनाच आपलं शक्तिस्थान बनवलं
मोटार न्यूरॉन डिसीजनं त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला होता, पण त्यांचं मन त्यांच्या पूर्ण नियंत्रणात होतं.
आपल्या शारीरिक मर्यादांवर विजय मिळवून ते पुढं चालत राहिले. हातांमधली शक्ती जशी क्षीण होऊ लागली तसं ते किचकट गणितं आपल्या मनातच सोडवू लागले.
गणिताची प्रमेयं ते आपल्या मनातच रचत असत. त्यांच्या या सवयीमुळेच स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केली, असं त्यांचे सहकारी सांगतात. आपल्या कमकुवत स्थानांनाच त्यांनी आपल्या शक्तिस्थानांमध्ये परावर्तित केलं.
बिग बॅंग थेअरीला मान्यता
विश्वाची निर्मिती ही बिग बॅंगपासून झाली आहे असा सिद्धांत 1940मध्ये मांडण्यात आला होता. पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी यावर अभ्यास केला.
फोटो स्रोत, NASA
स्टीफन हॉकिंग नासाच्या झिरो ग्रॅव्हिटी स्टेशनमध्ये.
विश्वाच्या निर्मितीला सुरुवात बिग बॅंगपासून झाली असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अनेकांनी बिग बॅंग थेअरीला मान्यता दिली.
भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधन
त्यांना असं जाणवलं की, कृष्णविवराचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपल्याला अनेक रहस्यांचा शोध लावता येईल.
क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला.
फोटो स्रोत, Getty Images
विज्ञानातील दोन वेगवेगळे सिद्धांत एकत्र करणं हे महाकठिण काम होतं. पण त्यांनी ते नेटानं सुरू ठेवलं होतं.
अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलं की, कृष्णविवरं चमकू शकतात. या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन म्हटलं जातं.
आयझॅक न्यूटनचे वारसदार
वयाच्या 35 व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं.
न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते. एव्हाना हॉकिंग यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवली होती, पण त्यांची प्रकृती खूप खालवत चालली होती. हालचाल करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा वापर सुरू केला.
फोटो स्रोत, BBC iwonder
हॉकिंग यांना न्यूटनचा वारसदार समजलं जातं.
वयाच्या 43व्या वर्षी त्यांना न्यूमोनिया झाला. हॉकिंग यांना जिनेव्हातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा आवाज गमवाल याची कल्पना डॉक्टरांनी त्यांनी दिली.
पण त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीनं ते अत्यावश्यक होतं. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपला आवाज गमवावा लागला. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक खास उपकरण तयार केलं. त्याआधारे ते बोलू लागले.
काळाचा संक्षिप्त इतिहास
1988 साली हॉकिंग यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम ( काळाचा संक्षिप्त इतिहास) हे पुस्तक लिहिलं. आपण केलेल्या अभ्यासाचा उपयोग सामान्य वाचकाला व्हावा असं वाटून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं.
विज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईमची गणना होते.
दुसरं लग्न
जेन आणि स्टीफन यांना तीन मुलं झाली. 25 वर्षं संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
फोटो स्रोत, Rex Features
स्टीफन हॉकिंग यांनी दोन लग्न केली.
त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसनसोबत लग्न केलं. त्यांचं लग्न 11 वर्षं टिकलं त्यानंतर ते वेगळे झाले.
स्टीफन हॉकिंग नाव घराघरात पोहोचलं
1999मध्ये स्टीफन हॉकिंग यांचं नाव घराघरात पोहोचलं. याचं कारण म्हणजे एका प्रसिद्ध अॅनिमेशन सीरिजमध्ये त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं.
गंमत म्हणजे आपल्यावर आधारित असलेलं हे पात्र हॉकिंग यांना खूप आवडलं. त्यानंतर त्यांच्यावर आलेल्या स्टीफन हॉकिंग्स युनिव्हर्समुळे ते आणखी लोकप्रिय झाले. सामान्य वाचकांसाठी त्यांनी खूप पुस्तकं लिहिली.
फोटो स्रोत, Getty Images
हॉकिंग यांच्या आयुष्यावर थेअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट 2014मध्ये येऊन गेला.
निवृत्तीनंतरही सुरु होतं कार्य
2009 मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी ते 67 वर्षांचे होते.
पण यापुढे देखील आपण काम करत राहू असं ते म्हणाले. केंब्रिजमध्येच ते दुसऱ्या पदावर रुजू झाले. संशोधन आणि अध्यापनाचं कार्य ते शेवटपर्यंत करत होते.
हॉकिंग यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर आपलं काम सुरूचं ठेवलं होतं. आपल्या 'द ग्रॅंड डिजाइन' या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, "फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात. त्यामुळे या विश्वाचं गूढ उकलण्यासाठी केवळ एकच 'थेअरी ऑफ एव्हरीथिंग' लागू होईल असं म्हणता येणार नाही."
म्हणजे गेली तीन दशकं त्यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले, अशी एकच थेअरी सापडणं हे कठीण काम आहे.
2014 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित 'थेअरी ऑफ एव्हरीथिंग' हा चित्रपट आला. त्यांची पहिली पत्नी जेन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं, त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती.
नुकताच केंब्रिज विद्यापीठानं त्यांचा शोधनिबंध विद्यापीठाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी खुला केला. हा शोधनिबंध तब्बल 20 लाख जणांनी पाहिला. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची आपल्याला कल्पना येऊ शकते.
हे वाचलं का?
स्टीफन हॉकिंग