तैवान : आई मुलाच्या पालन पोषणाचे पैसे मागते तेव्हा...

माणूस Image copyright PA

एखादा मुलगा आई-वडिलांना पैसे देतो कारण त्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं आहे, असं आपण कधी ऐकलं आहे का? ही गोष्ट थोडी विचित्र वाटते. मात्र, तैवानमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे.

तैवानच्या मुख्य न्यायालयानं एका व्यक्तीला आपल्या आईला पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीचं डेंटिस्ट होण्याचं स्वप्न आईनं पूर्ण केल्यानं त्याला त्याच्या आईला आता पैसे द्यावे लागतील, असं न्यायालयाचं म्हणणं आहे.

या आदेशामुळे या डेंटिस्टला आपल्या आईला 6 कोटी 10 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

आई-मुलांतील करार

मुळात या सगळ्यामागे एक वेगळीच कथा आहे. 1997मध्ये या व्यक्तीचा त्याच्या आईसोबत एक करार झाला होता. त्या वेळी त्याचं वय 20 वर्षं होतं. जेव्हा त्याला नोकरी लागेल तेव्हा त्यातील 60 टक्के रक्कम या व्यक्तीला आपल्या आईला द्यावी लागेल, असं करारनाम्यात म्हटलं होतं.

मात्र, हा करार होऊनही या मुलानं आपल्या आईला एक रुपयाही दिला नव्हता. या व्यक्तीची आई या कराराच्या हवाल्यानं एकीकडे हे पैसे मागत होती. तर दुसरीकडे मुलांचं पालन पोषण केलं म्हणून पालक पैसे का मागतात, अशी मुलाची बाजू होती. एखादी आई मुलाला मोठं करण्याचे पैसे घेते का? असा सवाल मुलानं उपस्थित केला होता.

मात्र, या कराराचा हवाला देत तैवानच्या मुख्य न्यायालयानं आईची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळेच आईला आजपर्यंत न दिलेले पैसे व्याजासहित द्यावेत असा आदेश न्यायालयानं त्या मुलाला दिला आहे.

मुलगा काय म्हणतो?

या प्रकरणातील आईचं आडनाव लुओ असं आहे. लुओ घटस्फोटित असून त्यांना दोन मुलं आहेत. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांचं एकटीच्या बळावर पालन-पोषण केलं.

आपल्या मुलांना डेंटिस्ट बनवण्यासाठी हजारो डॉलर खर्च केल्याचं लुओ यांचं म्हणणं आहे. आपली मुलं आपल्याला व्यवस्थित सांभाळतील की नाही, याची चिंता पहिल्यापासूनच त्यांना सतावत होती. या चिंतेमुळेच लुओ यांनी दोन्ही मुलांशी करार केला होता.

स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लुओच्या मोठ्या मुलानं आईसोबत पैशाची बोलणी करून कमी पैशांत आई आणि त्याच्यातलं हे प्रकरण मिटवून टाकलं आहे.

Image copyright PA

मात्र, लुओ यांच्या धाकट्या मुलांचं म्हणणं आहे की, जेव्हा हा करार झाला तेव्हा मी वयानं लहान होतो. त्यामुळे हा करार अवैध मानला जावा अशी त्याची मागणी आहे. डेंटिस्टची पदवी मिळाल्यानंतर अनेक वर्षं आईच्या क्लिनिकमध्येच काम केलं होतं.

त्यावेळी आईनं भरपूर पैसे कमावले होते. आता मागणी केलेली रक्कम त्या रकमेपेक्षा अधिक असल्याचं या मुलाचं म्हणणं आहे.

न्यायालय काय म्हणतं?

तैवानच्या मुख्य न्यायालयाच्या प्रवक्त्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "असा निर्णय देण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे मुलगा आणि आई यांच्यामध्ये झालेला करार हे आहे. त्यांचा धाकटा मुलगा या कराराच्या वेळी जाणत्या वयात होता आणि त्याच्यावर कोणता दबाव नव्हता."

तैवानच्या कायद्याप्रमाणे म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी ही त्यांच्या मुलांची असते. असं असूनही जी मुले ही जबाबदारी टाळतात. त्यांच्या विरोधात आई-वडील कोणती कारवाई करणं टाळतात.

पण, हे प्रकरण निराळंच असून आई- मुलात एक करार झाला आहे. आणि तो करार मुलाला पाळावा लागणार आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)