असमान वेतनाच्या मुद्द्यावरून बीबीसीच्या संपादकांचा राजीनामा

कैरी ग्रेसी
प्रतिमा मथळा बीबीसी चीनच्या संपादक कैरी ग्रेसी यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला आहे.

बीबीसीच्या चीनी सेवेच्या संपादक कॅरी ग्रेसी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीबीसीमधल्या असमान वेतनाच्या मुद्द्यावरून त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

बीबीसीमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिलं जातं, असं त्यांचं मत आहे.

गेली 30 वर्षं बीबीसीसोबत काम करणाऱ्या ग्रेसी यांनी बीबीसीवर 'गुप्त आणि बेकायदेशीर वेतन संस्कृती'चा आरोप केला आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, "दीड लाख पौंडापेक्षा अधिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांत दोन तृतीयांश कर्मचारी पुरुष असल्याचं समोर आल्यानंतर बीबीसीसमोर विश्वासाचं संकट उभं आहे."

तर बीबीसीचं मत आहे की संस्थेत महिलांबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही.

ग्रेसी संस्थेसोबत राहतील

ग्रेसी यांनी म्हटलं आहे की त्यांनी बीबीसीच्या चीनच्या सेवेचा राजीनामा गेल्याच आठवड्यात दिला आहे. पण त्या संस्थेसोबतच राहणार आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, "त्या टीव्ही न्यूजरूममध्ये त्यांच्या जुन्या भूमिकेत परत येतील. याठिकाणी त्यांना पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचं वेतन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे."

Image copyright BBCCARRIE

बझ फीडवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या खुल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, "बीबीसी ही लोकांची सेवा असून लोक त्यासाठी लायसन्स फी देत असतात."

त्यांनी म्हटलं आहे की, "माझं असं मत आहे की लोकांना हे माहीत करून घेण्याचा अधिकार आहे की बीबीसी समानतेचा कायदा मोडत आहे. तसंच पारदर्शक आणि निःपक्ष वेतन प्रणालीसाठी जो दबाव टाकला जात आहे, त्याला बीबीसी विरोध करत आहे."

7 जुलै 2017ला बीबीसीला दरवर्षी दीड लाख पौंडापेक्षा अधिक पगार घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन सार्वजनिक करावं लागलं होतं.

ग्रेसी म्हणतात की, बीबीसीमधल्या 2 आंतरराष्ट्रीय संपादकांना महिलांच्या तुलनेत 50 टक्के अधिक वेतन आहे.

बीबीसी अमेरिकेचे संपादक जोन सोपेल यांना 2 ते 2.5 लाख पाऊंड इतकं वेतन मिळत होत. तर बीबीसी मध्यपूर्वच्या संपादक जेरेमी बावेन यांना दीड ते 2 लाख पाऊंड इतकं वेतन मिळत मिळतं होतं. या यादीमध्ये कैरी ग्रेसी यांचं नाव नव्हतं. याचाच अर्थ त्यांचा वार्षिक पगार दीड लाख पाऊंडपेक्षा कमी होतं.

खुल्या पत्रात ग्रेसी म्हणतात की, समान काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळालं पाहिजे. त्यांनी असंही म्हटलं आहे की त्यांना वेतनवाढ नको असून त्यांना समान वेतन हवं आहे.

बीबीसी मीडियाचे संपादक अमोल रंजन यांनी ग्रेसी यांचा राजीनामा म्हणजे बीबीसीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. रंजन म्हणतात, "बीबीसीनं समान वेतनाचं आश्वासन दिलं आहे, पण हे आश्वासन पोकळ असल्याचं ग्रेसीचं पत्र दाखवत."

ट्विटरवर बीबीसीच्या पत्रकारांसह अनेकांनी ग्रेसी यांचं समर्थन केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)