इम्रान खान तिसऱ्यांदा बोहल्यावर? तिसरी बायको आहे तरी कोण?

इम्रान खान Image copyright Getty Images

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक ए इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा पाकिस्तानात सुरू आहे.

गेल्या आठवड्यात एका वृत्तपत्राने इम्रान खान नव्या वर्षात तिसऱ्यांदा लग्न करणार आहेत, असं वृत्त दिलं होतं. त्यानंतर लोकांत इम्रान खान यांची नवी पत्नी कोण, याची चर्चा सुरू झाली. रविवारी तहरिक ए इन्साफने या संदर्भात खुलासा केला आहे.

पक्षाच्या वतीने या संदर्भातील खुलासा ट्वीट करण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे की, "इम्रान खान यांनी बुशरा मनेका नामक एका महिलेला लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. पण अजून त्याचं उत्तर आलेलं नाही. यावर उत्तर देण्यासाठी बुशरा यांनी मुदत मागितली आहे. आपले कुटुंबीय आणि मुलांशी बोलून त्या निर्णय घेणार आहेत."

कोण आहेत बुशरा?

पाकिस्तानात आता चर्चा सुरू आहे की या बुशरा मनेका आहेत तरी कोण?

पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' बुशरा मनेका यांची इम्रानसोबत पहिली भेट 2015मध्ये झाली होती असं म्हटलं आहे. 2015मध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत त्यांची ओळख झाली होती.

या वृत्तात म्हटलं आहे की बुशरा यांचं वय 40 असून त्यांना 5 मुलं आहेत.

बुशरा घटस्फोटित आहेत. खावर फरीद मनेका यांच्यापासून त्यांनी नुकताच घटस्फोट घेतला आहे. खावर कस्टम अधिकारी आहेत. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते.

बुशराची दोन मुलं इब्राहीम आणि मुसा यांचं शिक्षण लाहोरमधल्या एचिसन कॉलेजमधून झालं असून सध्या ते परदेशात शिक्षण घेत आहेत.

Image copyright IMRAN KHAN OFFICIAL
प्रतिमा मथळा इम्रान खान आणि त्यांची दुसरी पत्नी रेहाम खान

बुशरा यांना 3 मुली आहेत. सर्वांत मोठी मुलगी मेहरू पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील खासदार मियाँ अट्टा मोहंमद मनेका यांची सून आहे.

पूर्वीही नाव जोडलं होतं

पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, मनेका या वट्टू समुदायाशी संबंधित आहेत.

वृत्तात म्हटलं आहे की, शनिवारी रात्री 'जियो न्यूज'मध्ये एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या बुशरा यांच्या मुलानं बुशरा यांच्या लग्नाची बातमी अफवा असल्याचं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इम्रान आणि पहिली पत्नी जेमिमासमवेत

या कुटुंबाशी इम्रानचं नाव पहिल्यांदाच जोडलं गेलेलं नाही. 2016मध्येही या कुटुंबातील अन्य एका महिलेशी इम्रान खानचं लग्न झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या महिलेचं नाव मरियम असल्याचं सांगण्यात आलं होत. पण इम्रान खानने या वृत्ताचा इन्कार केला होता.

द न्यूज या वेबसाईटवर इम्रान खान बुशरा यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी जात होते, असं म्हटलं आहे.

इम्रान खानचं पहिलं लग्न जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याबरोबर झालं होतं. दोघांना 2 मुलंही आहेत. 2004मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

2014मध्ये इम्रान यांचं लग्न टीव्ही अँकर रेहाम खान यांच्याशी झालं होतं. रेहामचे आईवडील पाकिस्तानी आहेत, तर रेहामचा जन्म लीबियातला आहे. हे लग्न 10 महिनेच टिकू शकलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)