चीनमध्ये लहान मुलांच्या पॅंटला छिद्र का आहे?

चीन Image copyright BRUNO MAESTRINI

एकीकडे भारतात पंतप्रधानांपासून ते बॉलिवुडचे मोठे तारे स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात धडपड करत आहेत. पण चीनमध्ये मात्र स्थिती वेगळी आहे. इथं कुठल्याही गल्ली-बोळात किंवा एखाद्या पार्कमध्ये गेल्यावर तुम्हाला कुणी लहान मुलगा संडासाला बसलेला दिसण्याची शक्यता आहे.

कारण चीनमध्ये असं चित्र सर्वत्र उघडपणे दिसतं. आणि याला कारणीभूत, किंवा चालना देणारं माध्यम, आहे एक खासपद्धतीचा पारंपारिक ड्रेस. 'कई डांग कू' नावाचा हा ड्रेस, चीनमध्ये लहान मुलांना वावरताना कुठलीही अडचण येऊ नये याकरिता घातला जातो.

मूळत: ही खासपद्धतीची पँट असते जिच्या मागच्या बाजूला एक भलं मोठं छिद्र असतं. हे खरं आहे की, आधीच्या तुलनेत आता या पँटचा वापर कमी झाला आहे, पण तरी ही पद्धत अद्याप बंदही झालेली नाही.

चीनमध्ये वावरणाऱ्या परदेशी नागरिकांना तर अशी पँट पाहून नवलचं वाटावं. ती पँट का वापरतात, याचं कारण त्यांना समजेना. आधी तर त्यांना हेच वाटतं की, ही एक चांगली सवय नसून यामुळं लहान मुलांना त्रास सहन करावा लागत असेल.

Image copyright BRUNO MAESTRINI

ब्राझीलहून अलीकडेच चीनला स्थलांतरित झालेल्या एक वकिलांनी बीबीसीला सांगितलं की, "मागच्याच आठवड्यात मी बीजिंगच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये गेलो होतो. तेव्हा मी पाहिलं की, एक लहान मुलगा उपडा बसून तिथंच संडास करत होता. नंतर मग मी त्याच्या आईला ती संडास उचलतानाही बघितलं. मी हैराण झालो. माझ्यासाठी हे दृष्य विचित्र होतं."

तुम्हाला कदाचित ते वाचतानाही किळसवाणं वाटत असलं तरी, या पद्धतीचे फक्त तोटेच नाही तर काही फायदेही आहेत.

फायदे

चीनी नागरिकांना असं वाटतं की, या पँटच्या वापरामुळं लहान मुलं शौचालय वापरणं लवकर शिकतात. त्याच वेळी, डायपर घालणाऱ्या मुलांमध्ये वॉशरूमच्या वापरीची सवय उशिराने लागते.

जर मुलं चुकीच्या ठिकाणी संडासाला बसले तर मोठी मंडळी त्यांना यापासून रोखतात. चीनमध्ये तीन-चार महिन्याच्या बाळाला वॉशरूमला जाण्याची सवय लावण्यास सुरुवात होते. तर दुसरीकडे पश्चिमी देशांमध्ये मुलं एक ते दिड वर्षांची झाल्यावर त्यांना ही सवय लावली जाते.

Image copyright Getty Images

पण चीनमधल्या लहान मुलांचा हा पेहराव जगभरातल्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एवढंच काय तर यावर चर्चा करण्यासाठी इंटरनेटवर एक फोरमही तयार करण्यात आला आहे.

चीनमधल्या लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये विना छिद्राची पँट सापडणं कठीण आहे. 'कई डांग कू'ची लोकप्रियता यावरूनच ठरवता येऊ शकेल.

तोटे

या पँटचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत. तुम्हाला अनेक ठिकाणी, घरांबाहेर संडास करणारी लहान मुलं दिसतील. परिणामी, सार्वजनिक ठिकाणी घाण आणि दुर्गंधी पसरलेली दिसते, जे आरोग्यासाठी घातक आहे. शहरांच्या तुलनेत गावांमधली स्थिती तर याबाबतीत फारच वाईट आहे.

'कई डांग कू'चा वापर पर्यावरणासाठी योग्य आहे की अयोग्य? यावर आता जगभरात चर्चा झडत आहेत.

Image copyright REPRODUCTION/TABOBAO.COM

याचा वापर केल्यानं टनाने निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा धोका कमी झाला आहे, असंही म्हटलं जातं. अनेक युरोपीयन देशांमध्येही आता लहान मुलांना कपड्याचे डायपर घालावेत, असं सांगितलं जात आहे.

असं असलं तरी, डिस्पोजेबल डायपरचा वापर करणं जास्त फायद्याचं असल्याचं चीनमधले डॉक्टर आता सांगतात. अट फक्ट एकच आहे की, डायपर वेळच्यावेळी बदलावेत, जेणेकरून आजारांचा धोका कमी होईल.

याशिवाय डायपरचा वापर हा आता स्टेटस सिंबॉलही झाला आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)