राष्ट्राध्यक्ष ट्रंप खरंच अमेरिकेचं राष्ट्रगीत विसरले होते का?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप

अमेरिकेतल्या अटलांटामध्ये आयोजित एका कॉलेज फुटबॉल स्पर्धेदरम्यान डोनाल्ड ट्रंप पुन्हा वादाच्या मैदानात ओढले गेले. निमित्त होतं स्पर्धेआधी वाजवण्यात आलेलं अमेरिकेचं राष्ट्रगीत.

त्यांनी राष्ट्रगीत गाताना काही शब्द न म्हटल्यानं उपस्थित प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला. अनेकांनी सोशल मीडियावर हा विषय चवीनं चघळला.

ट्रंप यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, राष्ट्रगीत म्हणताना ट्रंप यांचा हात त्यांच्या छातीवर अभिमानानं ठेवलेला बघून आम्हाला आनंद झाला. मात्र त्यांच्या टीकाकारांनी अधोरेखित केलं की ट्रंप राष्ट्रगीतातले काही शब्द विसरल्याचं दिसत होतं.

ते खरंच शब्द विसरले?

ट्रंप यांनी राष्ट्रगीत म्हणताना नक्कीच काही शब्द गाळले. राष्ट्रगीत म्हणतानाच्या व्हीडिओमध्ये ट्रंप यांनी राष्ट्रगीताची सुरुवात हळू केल्याचं दिसतं. त्यांच्या तोंडाच्या हालचालीवरून ते काही शब्द गाळत असल्याचं दिसलं.

"...bright stars..." यांसारखे शब्द ते उच्चारताना दिसत होते. यातले "...the land of the free and the home of the brave..." हे शब्द त्यांनी हसत उच्चारलेही. मात्र, राष्ट्रगीतातल्या अन्य ओळी ते गाताना दिसले नाहीत.

ते शब्द विसरले होते किंवा त्यांनी शब्द गायले नाहीत हा नक्कीच वादाचा मुद्दा आहे.

यापूर्वी त्यांना राष्ट्रगीत गाताना पाहिलं गेलं आहे, त्यांचं चित्रीकरणही झालं आहे. मात्र यावर बीबीसीचे अँथोनी झर्कर यांनी एक सिद्धान्त मांडला आहे.

Image copyright TWITTER

त्यांचं म्हणणं आहे, "इतक्या कल्लोळात जोरानं राष्ट्रगीत गाणं दोन कारणांमुळे कठीण ठरू शकतं. एक तर त्यांना थो़डं कमी ऐकू येतं. आणि दुसरं म्हणजे, त्या स्टेडियममध्ये इतका गोंगाट असतो की धड ऐकूही येत नाही."

मात्र, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी ट्रंप यांना माफ न करता त्यांच्यावर टीका केली आहे.

Image copyright TWITTER

राष्ट्रपतींकडून काय अपेक्षा?

अमेरिकेच्या ध्वजसंहितेत राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र ध्वजसंहितेचं कोणावर बंधन नसून ती मोडल्यास शिक्षाही होत नाही.

ट्रंप ज्या पद्धतीने उभे राहिले होते त्यावरून ध्वज संहितेचे नियम दिसून येतात. या नियमांनुसार:

  • राष्ट्रगीत गाताना आणि झेंडा फडकत असताना युनिफॉर्ममधली व्यक्ती वगळता इतरांनी स्तब्ध उभं राहून छातीवर हात ठेऊन उभं राहणं अपेक्षित आहे.
  • मात्र युनिफॉर्ममधल्या व्यक्तींनी आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रगीत सुरू असताना सॅल्यूट करणं बंधनकारक आहे.

माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी 2008च्या निवडणुक प्रचारावेळी राष्ट्रगीत चालू असताना छातीवर हात ठेवलेला नव्हता. नंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं, की त्यांच्या आजोबांनी त्यांना असं करण्यास सांगितलं होतं.

Image copyright Getty Images

या ध्वज संहितेत राष्ट्रगीत सुरू असताना ते म्हटलंच पाहिजे, अशी सक्तीही नाही. मात्र शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

1942मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रगीत समितीनं स्पष्ट केलं होतं की, राष्ट्रगीत म्हणणं ही सन्मानाची बाब असून ते म्हटलं गेलं पाहिजे. मात्र ते म्हणणं ही व्यक्तीगत निवड आहे. राष्ट्रपतींनी ते म्हणावं किंवा नुसतं उभं राहावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.

बराक ओबामांनी या दोन्ही गोष्टी केल्या असून 2016 साली ते म्हणाले होते की, राष्ट्रगीत म्हणणं आणि झेंड्याचा मान राखणं या आपल्याला एकत्र बांधणाऱ्या गोष्टी आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्रगीताबद्दल माजी राष्ट्रपती रोनाल्ड रोगन एकदा म्हणाले होते की, "जगातल्या सगळ्या देशांच्या राष्ट्रगीतांचे शब्द मला माहीत नाहीत. मात्र एका प्रश्नाने आणि एका आव्हानाने संपणारं आपलंच राष्ट्रगीत संपत असेल, याता मी दावा करतो."

राष्ट्रगीताबद्दल ट्रंप काय म्हणाले?

आपण आपल्या देशाचा झेंडा आणि राष्ट्रगीत या दोन्हीचा सन्मान केला पाहिजे, असं ट्वीट सोमवारी ट्रंप यांनी केलं. त्यांनी त्या कॉलेजमध्ये राष्ट्रगीत म्हणतानाचा फोटो ट्विटरवर कव्हर फोटो म्हणून ठेवला आहे.

काही महिन्यांपूर्वी एका नॅशनल फुटबॉल लीगच्या खेळाआधी राष्ट्रगीतादरम्यान काही खेळाडूंनी गुडघ्यांवर उभं राहून वर्णद्वेषाविरोधात निषेध नोंदवला होता.

Image copyright TWITTER

त्यावेळीही ट्रंप यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)