झुल्फिकार अली भुत्तो : 'ही' चूक ठरली त्यांच्या मृत्यूचं कारण

  • रेहान फजल
  • बीबीसी प्रतिनिधी
झुल्फिकार अली भुत्तो

फोटो स्रोत, KEYSTONE

फोटो कॅप्शन,

झुल्फिकार अली भुत्तो

पाकिस्तानचं भारतासोबत 1965 आणि 1971 साली युद्ध झालं तेव्हा झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री होते. पुढे जाऊन ते देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाले खरे, पण तिथेच त्यांनी एक निर्णय घेतला, जो थेट त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.

झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्या अमेरिका दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना व्हाईट हाऊसमध्ये भेटण्यासाठी गेले होते. त्यांची ही भेट बरीच गाजली होती.

भुत्तो केनेडींना खूप मानायचे तर भुत्तोसुद्धा केनेडी यांच्या पसंतीचे. भेटीनंतर भुत्तो जेव्हा केनेडींचा निरोप घेत होते तेव्हा केनेडींनी म्हटलं, "जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असता तर मी तुम्हाला माझ्या कॅबिनेटमध्ये घेतलं असतं."

यावर भुत्तो उत्तरले, "राष्ट्राध्यक्ष साहेब, जर मी अमेरिकेचा नागरिक असतो तर मी तुमच्या मंत्रिमडळात नाही तर तुमच्या जागी असतो."

भुत्तो यांचा हजरजबाबीपणा संपूर्ण जगाला ठाऊक होता.

पीलू मोदी जवळचे मित्र

सिंध प्रांतातल्या लारकानामध्ये भुत्तो यांचा जन्म झाला होता. त्यांचं तरुणपण मात्र मुंबईत गेलं.

त्यांचे वडील शाहनवाज भुत्तो मुंबईत राज्यपालांच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य होते.

त्या काळी पीलू मोदी भुत्तोंचे सर्वांत जवळचे मित्र होते. पीलू मोदी हे स्वतंत्र पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध खासदार होते.

भुत्तो यांच्या कारकिर्दीवर लिहिणारे सैयदा सैयदेन हमीद सांगतात, "14-15 वर्षांचे असताना भुत्तो आणि पीलू मुंबईहून मसूरीला जायचे. तिथं ते शार्लेवेल हॉटेलमध्ये थांबायचे. जेव्हा जेवण वाढलं जायचं तेव्हा ही दोघं त्या अन्नातला काही भाग बाजूला काढून ठेवायचे, जेणेकरून नंतर भूक लागल्यास त्यांना ते खाता येईल. दोघंही मुंबईच्या प्रसिद्ध केथेडरल स्कूल मध्ये शिक्षण घेत होते."

आपल्या 'जुल्फी माय फ्रेंड' या पुस्तकात पीलू मोदी लिहितात, "सुटीच्या दिवशी आम्ही दोघं सकाळी 7.30 वाजता टेनिस खेळायचो. त्यानंतर बॅडमिंटन आणि स्क्वॉश खेळायचो. रात्रीच्या जेवणानंतर जुल्फी माझ्या घरासमोर येऊन शिट्टी मारायचा. मग आम्ही मध्यरात्रीपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर फिरायचो."

भुत्तो यांनी मुश्ताक अलींचं प्लास्टर कापलं

त्या काळी भुत्तोंच्या जवळच्या मित्रांमध्ये प्रसिद्ध क्रिकेट समालोचक ओमर कुरेशी आणि भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचा समावेश होता.

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

भारतीय क्रिकेटर मुश्ताक अली

मोदी त्यांच्या पुस्तकात सांगतात, "मुश्ताक एक सामना खेळायला मुंबईला आले होते तेव्हा भुत्तोंच्या घरीच थांबले होते. पण सामन्यादरम्यान शूते बॅनर्जी यांच्या एका वेगवान बॉलनं मुश्ताक यांना दुखापत झाली. मग त्यांच्या हातावर प्लास्टर लावण्यात आलं आणि काही दिवस 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'च्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं."

"रात्री त्यांना इतकं बेचैन वाटायला लागलं की त्यांनी फोन करून भुत्तोंना भेटायला बोलावलं. भुत्तो तिथं पोहोचले तेव्हा ते त्यांना म्हणाले, 'मला परत तुझ्या घरी घेऊन चल', रात्रीच त्यांनी भुत्तो यांना त्यांच्या हातातलं प्लास्टर कैचीनं कापायला लावलं, तेव्हा कुठं त्यांना झोप लागली."

नुसरत इस्फहानी यांच्यासोबतची पहिली भेट

मुंबईतल्या शालेय शिक्षणानंतर भुत्तो अमेरिकेला गेले. तिथं त्यांनी बर्कले विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतली. 1953 साली पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांची भेट नुसरत इस्फहानी यांच्याशी झाली.

फोटो स्रोत, Getty Images

इराणमध्ये जन्मलेल्या इस्फहानी यांच्यासोबत भुत्तोंच्या भेटीचं वर्णन स्टेनली वोलपर्ट यांनी त्यांच्या 'जुल्फी भुट्टो ऑफ पाकिस्तान' या पुस्तकात केलं आहे.

बेगम नुसरत यांनी वोलपर्ट यांना सांगितलं होतं की, "एकदा दागिने काढायला बँकेत गेले तेव्हा मी पहिल्यांदा भुत्तो यांना बघितलं. भुत्तोसुद्धा त्यांच्या आईसोबत दागिने काढायलाच तिथं आले होते. तिथंच त्यांच्या आईनं माझी ओळख झुल्फिकार यांच्याशी करवून दिली. पहिल्या नजरेत तर ते मला जराही आकर्षक वाटले नाही."

बेगम नुसरत पुढे सांगतात, "भुत्तोंच्या बहिणीच्या लग्नावेळी आमची दुसऱ्यांदा भेट झाली. लग्नानंतरच्या वलीमाच्या कार्यक्रमात ते माझ्यासोबत नृत्य करायला लागले. तेव्हा त्यांनी मला घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला. मी हळू आवाजात त्यांना सांगितलं, 'हा पाकिस्तान आहे, साहेब. अमेरिका नाही!"

"हे ऐकून झुल्फी हसायला लागले. त्यांची हिंमत तर बघा, जेवण संपायच्या अगोदरच मला घरी सोडण्यासाठी त्यांनी आग्रह केला. मी म्हटलं, 'मी माझी कार आणली आहे, तुम्ही त्रास नका करून घेऊ.' तरीही ते म्हणाले की, चला माझ्यासोबत आईस्क्रीम खायला. पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला."

सुरुवातीच्या नकारानंतर शेवटी नुसरत यांनी भुत्तो यांना हो म्हटलं आणि दोघांनी लग्न केलं.

भाषणांचे किमयागार

त्यानंतर भुत्तो यांनी राजकारणात प्रवेश केला. अयूब खान यांच्या मंत्रिमंडळात विविध पदांवर काम केल्यानंतर 34 वर्षांचे असताना परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची निवड झाली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

झुल्फिकार अली भुत्तो यांचा परिवार

सैयदा सैयदेन हमीद सांगतात, "परराष्ट्र मंत्री असताना भुत्तो यांनी भरीव कामगिरी केली. 1965 आणि 1971 साली संयुक्त राष्ट्रांत त्यांनी दिलेली भाषणं खूप गाजली. त्यांच्या भाषणात एक खास लय असायची, जणू शब्दांचा समुद्र ओघवत असे. तर्कांवर आधारित संवाद त्यात असायचा. एक लहान देश ज्याला जगाने जवळपास नाकारलं होतं, त्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या या योगदानाची खूप कमी ठिकाणी नोंद आहे."

हमीद सांगतात, "पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री सुरक्षा परिषदेच्या मंचावरून कागद फाडून वॉक-आऊट करेल आणि आरोप करेल की परिषद त्यांचं कर्तव्य निभावत नाही, अशी हिंमत भुत्तो यांच्यापूर्वी कुणी केली नव्हती. खरंतर ते तिथून संपूर्ण जगाला संबोधित करत होते, शिवाय तिथून त्यांच्या देशातल्या लोकांनासुद्धा संबोधित करत होते."

याह्या यांच्यानंतर राष्ट्रपती

भुत्तो यांच्या या वॉकआऊटला भारतात 'हूट', असं संबोधलं गेलं. पण युद्ध हरले तरी या भाषणामुळे ते पाकिस्तानात एका रात्रीत हिरो झाले. न्यूयॉर्कहून परताना ते रोममध्ये थांबले, जिथून त्यांना पाकिस्तानात येण्यासाठी PIAचं विमान पाठवण्यात आलं.

फोटो कॅप्शन,

याह्या खान

भुत्तो मंत्रिमंडळाचे सदस्य आणि पंजाबचे राज्यपाल राहिलेले गुलाम मुस्तफा खार सांगतात, "त्या रात्री संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅक आऊट होतं. मी दोन तास कार चालवत इस्लामाबादहून रावळपिंडीला पोहोचलो. याह्या खाना एका खोलीत एकटेच बसलेले होते. त्यांच्यासमोर स्कॉचचा एक ग्लास ठेवलेला होता. त्यांनी मला म्हटलं की, 'खार साहेब, काहीही होवो. तुम्ही भुत्तो यांना परत बोलवा. त्यांना भुत्तो यांना पंतप्रधान बनवायचं असलं तरी स्वत: मात्र राष्ट्रपती पदावर कायम राहायचं होतं."

खार सांगतात, "मग मी भुत्तो यांना रोममध्ये फोन केला आणि त्याना परत यायची विनंती केली. त्यांनी मला विचारलं, तुम्ही मला मारणार तर नाही ना? नेमकी काय झालंय?"

"फोनवर मी तुम्हाला जास्त तपशील देऊ शकत नाही, कारण इथले सर्व फोन टॅप होत आहेत," असं मी त्यांना सांगितलं. "मी फक्त एक सांगू शकतो की हा एक टर्न आहे. तुम्ही फक्त इकडं निघून या. बाकी सर्व ठीक होईल."

विमानतळावरून थेट प्रेसिडेंट हाऊस

भुत्तो यांना विमानतळावरून प्रेसिडेंट हाऊसला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना राष्ट्राध्यक्ष आणि 'चीफ मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रटर' ही पदं सोपवण्यात आली.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन,

गुलाम मुस्तफा खार

गुलाम मुस्तफा खार पुढे सांगतात, "मित्राची मर्सिडीज कार घेऊन भुत्तोंना घ्यायला मी विमानतळावर गेलो. ते कारमध्ये बसले आणि विचारलं की, 'कुठे जायचं आहे?' 'प्रेसिडेंट हाऊसला,' मी म्हटलं, आजच सत्ता तुमच्या हातात सोपवली जाईल."

प्रेसिडेंट हाऊसमध्ये याह्या खान भुत्तोंची वाट पाहत होते. त्यांनी म्हटलं आहे की, "पश्चिम पाकिस्तानातून तुम्ही निवडून आलेले नेते आहात, म्हणून तुमच्याकडे सत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रश्न हा होता की, सत्तेचं हस्तांतरण कसं व्हायला हवं?"

खार सांगतात, "आर्मीमध्ये एक कर्नल होते. त्यांचं नाव मला आता आठवत नाही, पण त्यांना जॅक म्हणून बोलवलं जायचं. त्याला बोलावण्यात आलं आणि त्यानं सांगितलं की, 'एकाच परिस्थितीत भुत्तो यांना सत्ता हस्तांतरित करता येईल, जेव्हा भुत्तो यांना चीफ मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रटरचे अधिकार देण्यात येतील. मग त्या प्रकारची कागदपत्रं बनवण्यात आली आणि त्यावर कॅबिनेट सचिव गुलाम इसहाक खाँ यांची स्वाक्षरी घेण्यात आली."

खार पुढे सांगतात, "भुत्तो म्हणाले, या महत्त्वाच्या प्रसंगी फक्त तू आणि मीच इथं उपस्थित आहोत. आपल्या पक्षाचे महासचिव जे. ए. रहीम यांनाही बोलावून घ्या. नंतर माहिती झालं तर त्यांना खूप वाईट वाटेल."

"ज्यावेळी भुत्तो पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळी तिथं फक्त तीन जण हजर होते. मी, जे. ए. रहीम आणि गुलाम इसहाक खाँ. पण याह्या खान यांच्या राष्ट्राध्यक्ष होण्याच्या इच्छेला भुत्तो यांनी नाकारलं. 'जर मी असं केलं तर राजकीय परिघात यामुळे मला खूप जास्त नुकसान होईल. शिवाय याह्या सुद्धा जास्त काळ राष्ट्राध्यक्ष राहू शकणार नाही."

तुमच्या जागी दुसरं कुणीतरी येईल, असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी याह्या खान यांना भुत्तो यांचं ऐकावं लागलं.

फोटो स्रोत, ARSHAD SAMI KHAN

इंदिरा गांधींच्या 'गरीबी हटाव' योजनेच्या धर्तीवर भुत्तो यांनी 'रोटी, कपडा और मकान' असा नारा दिला.

झोप न येण्याचा आजार

भारतासोबत शिमला करार करून 93,000 पाकिस्तानी कैद्यांना वापस पाकिस्तानात नेण्याच्या भुत्तोंच्या निर्णयाला पाकिस्तानच्या जनतेनं त्यांचं यश म्हणून पाहिलं.

भुत्तोंचे ADC राहिलेले अरशद शमी खाँ त्यांचं पुस्तक 'थ्री प्रेसिडेंट एंड एन एड'मध्ये लिहितात, "भुत्तोंची स्मृती एका सुपर संगणकासारखी होती. पण मला वाटतं त्यांना रात्री झोप न येण्याचा आजार असावा."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इंदिरा गांधींसोबत भुत्तो

अरशद पुढे लिहितात, "एकदा मध्यरात्री फोन करून त्यांनी मला जेवण करायला बोलावलं. जेवताना त्यांनी त्यांना भेटण्यास इच्छुक असलेल्या लोकांची नावं विचारली. जेवणानंतर मी त्यांना भेटण्यास इच्छुक असलेल्या लोकांची यादी दाखवली. त्यांनी त्यातल्या 14 लोकांच्या नावासमोर खूण करून प्रत्येकाला पंधरा मिनिटांसाठी बोलावून घ्यायला सांगितलं."

"तुमचे पुढचे काही दिवस खूप व्यग्र राहणार आहेत आणि त्यातही तुम्हाला कराचीला जावं लागणार आहे, असं मी त्यांना सांगितलं. कराचीहून परतल्यानंतर मी या भेटी ठरवेन, असं मी पुढे त्यांना सांगितलं."

भुत्तो त्यावेळी म्हणाले की, "समी, आता काय तू झोपेत आहेस का? मला असं म्हणायचं आहे की, मी या सर्व लोकांना आता या क्षणापासून सकाळच्या 4.14 वाजेपर्यंत भेटण्यास इच्छुक आहे. त्यानंतर 4.30 वाजता तुम्हाला माझ्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण समारंभाची तयारीसुद्धा करायची आहे."

"मला ही तयारी करण्यासाठी खूप झटावं लागलं. बऱ्याच जणांना असं वाटलं की, त्यांना बनवाबनवीचे फोन येत आहेत. एका दोघांनी तर असंही म्हटलं की, रात्री इतक्या उशीरा फोन केल्याबद्दल ते पोलिसांत माझ्याविरुद्ध तक्रार देणार आहेत."

स्टायलिश कपड्यांचा शौक

जगातले सर्वांत महागडे कपडे परिधान करणारे नेते म्हणून भुत्तोंची ओळख होती. त्यांचे सर्व सूट कराचीतले त्यांचे टेलर हामिद शिवायचे.

फोटो स्रोत, Getty Images

पण प्रचाराला ते सलवार कमीज घालून जायचे. 1971साली सत्तेत आल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळासाठी त्यांनी एक ड्रेसकोड बनवला होता - बंद गळ्याचा कोट आणि पँट. आणि या ड्रेसमुळे पत्रकार त्यांच्या मंत्र्यांची 'बँड मास्टर' अशी खिल्ली उडवायचे.

भुत्तो नेपोलियन बोनापार्ट यांना वेड्यासारखं फॉलो करत. त्यांच्या 70, क्लिफ्टन या निवासस्थानातल्या लायब्ररीतली सात कपाटं नेपोलियनवरच्या पुस्तकांनी भरलेली होती.

भुत्तो यांचं चरित्र लिहिणारे सलमान तासीर लिहितात की, "भुत्तो कधीच सकाळी नाश्ता करत नसत. 10 च्या सुमारास ते एक कॉफी घ्यायचे. त्यानंतर दुपारचं जेवणही साधंच करायचे. मग संध्याकाळचा आणखी एक कडक चहा झाला की ते रात्री पोटभर जेवायचे."

भुत्तो योग किंवा व्यायाम करत नसले तरी ते नेहमीच तंदुरुस्त दिसायचे. 5 फूट 11 इंच उंचीच्या भुत्तो यांना पोहोण्याची फार आवड.

एकदा इटलीची पत्रकार ओरियाना फलाची यांच्यासमोर शेखी मिरवत त्यांनी सांगितलं होतं की, ते इंदिरा गांधींपेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत आणि गांधींपेक्षा अधिक काळ जीवन जगणार आहेत.

पाकिस्तानची गरीबी असतानाही राष्ट्राध्यक्षासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून 'फॉल्कन जेट' खरेदी करण्यात त्यांना काहीही गैर वाटलं नाही.

भुत्तोंचा रेशीमी सदरा लंडनच्या प्रसिद्ध 'टर्नबुल अँड एस्सर' या कंपनीकडून खरेदी केला जायचा. त्यांचा रेशीमचा टाय 'YSL' आणि 'Christian Dior' चा असायचा. त्यांचे बूट 'गुची'चे असत नाहीतर 'बॅली'चे.

रात्री जेवणानंतर ते 'डेविडॉफ'चं एक सिगारेट प्यायचे. त्यांना एक सवय होती ती म्हणजे सिगारेट ओढण्याअगोदर ते तिला 'रेमी मार्टिन' ब्रांडीमध्ये बुडवायचे.

जियांना लष्कर प्रमुख बनवणं ही चूक

झुल्फिकार अली भुत्तो यांची सर्वांत मोठी चूक तेव्हा झाली जेव्हा त्यांनी लष्करातले एक कनिष्ठ अधिकारी जिया-उल-हक यांना लष्कर प्रमुख म्हणून नियुक्त केलं.

फोटो कॅप्शन,

जिया-उल-हक

गुलाम मुस्तफा खार सांगतात की, त्यांनी यासंदर्भात भुत्तो यांना अगोदरच इशारा दिला होता. खार सांगतात, "मी भुत्तोंना सांगितलं की, जिया या पदासाठी योग्य व्यक्ती नाही. तेव्हा भुत्तोंनी मला विचारलं की, 'तू असं कसं काय म्हणू शकतोस?' नंतर त्यांनी माझ्याकडे काही प्रश्नांची उत्तरं मागितली."

"जिया प्रभावशाली आहेत का? मी म्हटलं नाही. त्यांचा जन्म इथं झाला आहे का? मी म्हटलं नाही. ते चांगली इंग्रजी बोलू शकतात? मी म्हटलं नाही."

त्यानंतर ते म्हणाले, "पाकिस्तानचं सैन्य त्याच अधिकाऱ्यांचा स्वीकार करतं जे चांगली इंग्रजी बोलू शकतात, जे सैंडहर्स्टमध्ये शिकलेले असतात. हा तर बाहेरून आलेला माणूस आहे, जो इतका प्रभावहीन आहे की मला यापेक्षा दुसरा कुणी सूट नाही करणार."

फोटो कॅप्शन,

झुल्फिकार अली भुत्तो यांचं चरित्र लिहिणाऱ्या लेखिका सैयदा सैयदेन हमीद यांच्यासोबत लेखक रेहान फजल.

जियांच्या बाबतीतलं भुत्तोंचं आकलन पूर्णत: चुकीचं ठरलं. हेच जिया उल हक नंतर भुत्तोंच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. त्यांनी भुत्तो यांना सत्तेवरून पायउतारच नाही केलं तर एका वादग्रस्त खटल्यात त्यांना फासावरही चढवलं.

इथं विरोधाभास हा की, याच जिया यांच्या मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या मुलीच्या उपचाराकरता त्यांच्या पूर्ण कुटुंबाला भुत्तोंनी अमेरिकेला पाठवलं होतं.

ज्या दिवशी भुत्तोंना नजरकैद करण्यात आलं, त्या दिवशी संपूर्ण भुत्तो परिवार अमेरिकेतच होता.

हे वाचलं का?

हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)