ग्लासगोच्या मशिदीत हाफीज सईदने पुकारला होता जिहादचा नारा!

पाकिस्तान, मुंबई, दहशतवादी हल्ला Image copyright Reuters
प्रतिमा मथळा हाफीज सईद अनेक महिने पाकिस्तानात नजरकैदेत होता.

'मुस्लिमांनो, जिहादी व्हा!' या घोषणेसह जगातला सगळ्यांत वाँटेड कट्टरवादी हाफीज सईदने स्कॉटलंडला भेट दिल्याचं उघड झालं आहे. अमेरिकेवर 9 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यापूर्वी सईद स्कॉटलंडमधल्या ग्लासगो शहराला भेट दिली होती. 'बीबीसी इनव्हेस्टिगेशन'ने ही माहिती समोर आणली आहे.

बीबीसीच्या 'द रेडिओ फोर'ची डॉक्युमेंटरी 'द डॉन ऑफ ब्रिटिश जिहाद' नुसार सईदने 1995 मध्ये दोन वेळा ब्रिटिश मशिदींना भेट दिल्याचं उघड झालं आहे. मुस्लिमांमध्ये जिहादचा दृष्टिकोन आहे, कारण त्यांनी जगावर राज्य केलं आहे. मात्र आता त्यांना अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागत आहे, असे सईदने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये म्हटलं होतं.

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सईद प्रमुख संशयित आहे. 166 नागरिकांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचा दावा सईद करतो.

बीबीसीची डॉक्युमेंटरी 11 जानेवारीला रात्री प्रसारित होणार असून, जगाला हादरवून टाकणाऱ्या अमेरिकेतल्या दहशतवादी हल्ल्याच्या बरीच वर्षं आधीपासून ब्रिटिश मुस्लिमांना मूलतत्ववादी होण्याची प्रक्रिया कशी सुरू झाली, याचा आढावा घेण्यात आला आहे.

"हे सगळं नजीकच्या भूतकाळात सुरू झाल्याची समजूत होती, मात्र प्रत्यक्षात हे काम '80 आणि '90च्या दशकापासून सुरू होतं," असं साजिद इक्बाल यांनी बीबीसी स्कॉटलंडला सांगितलं. त्याकाळी सक्रिय असणाऱ्या लोकांशी बोलल्याचं साजीद यांनी सांगितलं. ते या कार्यक्रमाच्या सहनिर्मात्यांपैकी एक आहेत.

तो वेगळा काळ होता. त्यावेळी बोस्निया आणि अफगाणिस्तान हा जिहाद्यांचा बालेकिल्ला होता. त्यावेळी असं होण्याची काही सामाईक कारणं होती.

जिहादचं स्पिरीट

पाकिस्तानस्थित काश्मीरी जिहादी गट लष्कर-ए-तोयबा या कट्टरवादी संघटनेतर्फे प्रकाशित मासिकात हाफीजच्या 1995 मधील इंग्लंडच्या दौऱ्याचं सविस्तर वर्णन करण्यात आलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हाफीज सईद लाहोरमध्ये एका भाषणादरम्यान

ओल्डहममधल्या मशिदीचे इमाम त्यावेळी सईद बरोबर होते. उर्दूत असलेले हे लेख बीबीसीच्या हाती लागले आहेत.

त्यानुसार ग्लासगो शहरातल्या मुख्य मशिदीत प्रचंड जमावासमोर सईदचं भाषण झालं. सईद सातत्याने जिहादबद्दलच बोलत होता. इक्बाल यांनी सांगितलं की, "इंग्लंडमधील मुस्लिमांनी जिहादचा मार्ग स्वीकारावा यासाठी तो सातत्याने प्रोत्साहनपर बोलत होता."

ज्यू धर्मीय व्यक्ती हजारो-लाखो रुपये खर्च करून जिहाद ही संकल्पना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सईदने त्यावेळी केला होता.

कुख्यात कट्टरवादी

लोकशाहीच्या माध्यमातून मुस्लिमांना सत्तेच्या राजकारणात येण्याकरता ते उद्युक्त करत आहेत, असं इक्बाल यांनी सांगितलं. या कामासाठी मुस्लिमांना कर्ज मिळावं यासाठी ते इंटरनेट आधारित अर्थव्यवस्थेचाही उपयोग करून घेत आहेत.

"देवबंदीतर्फे संचालित ग्लासगोमधल्या मुख्य मशिदीचे दरवाजे कुख्यात कट्टरवादी असलेल्या सईदकरता खुलं होणं चकित करणारं होतं. देवबंदी अनुयायी मुस्लिम आणि सईदच्या अहल-ए-हदीथ हे इस्लाम धर्मातील दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. 1995 मध्येही तो कुख्यात कट्टरवादी होता. तो काश्मीरमध्ये सक्रिय होता', असं इक्बाल यांनी सांगितलं.

दरम्यान, ग्लासगोतल्या मुख्य मशिदीच्या व्यवस्थापनाने याप्रकरणी कोणतंही भाष्य केलेलं नाही.

या दौऱ्यादरम्यान सईदने बर्मिंगहॅमला भेट दिली. 'जिहादसाठी जागृत व्हा' असं सईदने आपल्या भाषणादरम्यान सांगितलं. याच भाषणादरम्यान सईदने हिंदूंची 'कुत्रे', अशा शब्दांत निर्भर्त्सना केली होती.

त्यानंतर लिस्टर येथे झालेल्या परिषदेत सईदने आपली भूमिका मांडली. या परिषदेला 4000 जण उपस्थित होते. परिषदेदरम्यान सईदने केलेल्या भाषणामुळे युवा मंडळींमध्ये चैतन्य पसरल्याचं उपस्थित सांगतात. शेकडो तरुणांनी जिहादचं प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं होतं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पाकिस्तानात न्यायालयातून बाहेर पडताना हाफीज सईद.

2001 मध्ये हाफीज सईदप्रणित 'लष्कर-ए-तोयबा' हा काश्मीरमधील कट्टरवादी गट दहशतवादी संघटना असल्याचं इंग्लंडच्या गृह मंत्रालयानं जाहीर केलं. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये अल कायदातर्फे अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये दहशतवादी हल्ले झाले.

2008 मध्ये मुंबईत जोरदार हल्ले करत 'लष्कर-ए-तोयबा'ने जागतिक जिहाद वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

'लष्कर-ए-तोयबा'चा संस्थापक आणि म्होरक्या हाफीज सईदने 90च्या दशकात इंग्लंडमधल्या मशिदींनी भेट दिली होती. आताच्या घडीला जगातल्या मोस्ट वाँटेड कट्टरवाद्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं.

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सईदवर कधीही खटला भरण्यात आला नाही. काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तान सरकारने त्याची नजरकैदेतून सुटका केली होती.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)