पाकिस्तान : झी समूहाच्या पत्रकाराच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

ताहा सिद्दीकी
प्रतिमा मथळा ताहा सिद्दीकी

झी समूहाच्या WION वाहिनीचे पाकिस्तान ब्युरो प्रमुख ताहा सिद्दीकी यांचं इस्लामाबादमध्ये काही शस्त्रधारी व्यक्तींनी हल्ला करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. बुधवारी सकाळी एका कॅबमधून विमानतळावर जाताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

देशातल्या सैन्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ताहा प्रसिद्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी लष्कराकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली होती आणि न्यायालयात याचिका दाखल केली होती.

एका मित्राच्या अकांऊंटवरून ट्वीट करताना ते म्हणाले की, 10 ते 12 सशस्त्र व्यक्तींनी त्यांची कॅब थांबवली आणि त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. "मी स्वत:ची सुटका केली आणि आता मी पोलिसांबरोबर आहे."

कॅब थांबवून मारहाण

"कोणत्याही प्रकारे पाठिंबा देऊ शकता," असंही त्यांनी #StopEnforcedDisappearances हा हॅशटॅग वापरत ट्वीट केलं. त्यांनी सांगितलं की, रायफल आणि रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या काही लोकांनी त्यांना कॅबमधून काढलं, मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

प्रतिमा मथळा कॅब थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली

बीबीसीला संपूर्ण घटनाक्रम सांगताना ताहा म्हणाले की, अपहरणकर्त्यांनी कॅब थांबवून त्यांना बाहेर काढलं. "मी जोरजोरात ओरडत होतो, मदत मागत होतो. तेव्हा त्यांच्यातल्या एकाने म्हटलं की, 'त्याला मारून टाका, त्याला पायावर गोळी मारा. हा खूप आवाज करतो आहे.'"

तेवढ्यात ताहा त्यांच्या तावडीतून निसटले. त्यांनी दूर पळून दुसरी कॅब थांबवली आणि घटनास्थळावरून निघून गेले.

प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

पाकिस्तानातल्या संरक्षण संस्थांवर टीका करणाऱ्या अनेक सोशल मीडिया कार्यकर्त्यांवर गेल्या वर्षभरात हल्ले होत असल्याचं सांगत हक्कांसाठी लढणाऱ्या गटांनी निषेध नोंदवला आहे. मागच्या वर्षी पाच पाकिस्तानी ब्लॉगर्स अनेक आठवड्यांसाठी बेपत्ता झाले होते. त्यांच्यापैकी चौघांची सुटका झाली आहे.

ताहा यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

देशातल्या पत्रकार संघटनांनी या घटनेवर नाराजी आणि निषेध व्यक्त केला आहे. अनेकांनी या घटनेविरुद्ध ट्विटरवर आपला पाठिंबा जाहीर केला आहे. रावळपिंडी इस्लामाबाद युनियन ऑफ जर्नलिस्टस यांनी एक निवेदन जारी करून या हल्ल्याचा निषेध केला आहे.

या हल्ल्यात पाकिस्तानच्या काही संस्थांचा हात असल्याचा आरोप ताहा यांनी व्यक्त केला आहे.

"मी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांत काम करायला सुरुवात केल्यामुळे आता मी मुक्तपणे व्यक्त करू शकतो. मी मानवी हक्क आणि देशातल्या सैन्याची स्थिती या विषयांवर वार्तांकन करतो. या विषयांवर ते हस्तक्षेप करू शकत नाही. त्यातच मी स्वत:ही कुठलीही गोष्ट दाबत नाही. त्याचीच शिक्षा मला मिळते आहे," असंही त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानच्या केंद्रीय तपास संस्थेनं ताहा सिद्दीकी यांचा छळ थांबवावा, असं Committee to Protect Journalists यांनी म्हटलं आहे. या केंद्रीय तपास संस्थेनं गेल्या वर्षी अनेक ऑनलाईन टीकाकारांना त्रास दिल्याचं CPJने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)